अविनाश पाटील
नाशिक : आरक्षण आंदोलनामुळे सत्ताधारी भाजपवर मराठा समाजाची काहीशी नाराजी असताना मनोज जरांगे यांना त्याच भाषेत प्रत्युत्तर देणाऱ्या छगन भुजबळ यांनी कमळ चिन्हावर नाशिकमधून निवडणूक लढवावी, यासाठी थेट दिल्लीतून सूत्र हालविण्यात आल्याचे समजते. अन्य मतदारसंघांमध्ये ओबीसी मते भाजपकडे वळविण्यासाठी ही खेळी उपयोगी ठरेल, असा भाजपच्या धोरणकर्त्यांचा अंदाज असल्याचे सांगितले जाते. भुजबळ यांनी मात्र असा कोणताही प्रस्ताव नसल्याचे ‘लोकसत्ता’ला सांगितले. 

सलग दोन लोकसभा निवडणुकांमध्ये समीर भुजबळ आणि छगन भुजबळ यांचा पराभव केलेले शिंदे गटाचे खासदार हेमंत गोडसे यांचा तिसऱ्यांदा उमेदवारीसाठी नाशिक मतदारसंघावर हक्क आहे. उमेदवारी गृहित धरुन त्यांनी प्रचारही सुरु केला होता. काही दिवसांपूर्वी खासदार श्रीकांत शिंदे यांनी नाशिकमधील कार्यकर्ता मेळाव्यात गोडसे यांची उमेदवारी जाहीर केल्यानंतर महायुतीमधील वातावरण अचानक बदलले. भाजप आणि अजित पवार गटाकडून स्थानिक पातळीवर गोडसेंविरोधात सूर आळवला जाऊ लागला. उमेदवारी डळमळीत होत असल्याचे दिसताच गोडसे यांनी कधी ठाणे तर, कधी मुंबई गाठत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आर्जव करणे चालू ठेवले. शिंदे यांनीही प्रत्येक भेटीत गोडसे यांना नाशिकवर आपलाच दावा असल्याचे सांगत आश्वस्त केले. दरम्यानच्या काळात दिल्लीहून नाशिकसाठी आपल्या नावाचा विचार होत असल्याचे छगन भुजबळ यांनी जाहीर केले. भुजबळ यांनी भाजपकडून लढण्यासाठी पक्षश्रेष्ठी आग्रही असून तसा प्रस्तावही ठेवल्याचे सांगितले जाते. त्यासाठी पूरक कारणेही देण्यात येत आहेत.

हेही वाचा >>>नाशिक जिल्ह्यातून अल्पवयीन बालक, बालिकेचे अपहरण

नाशिक लोकसभा मतदारसंघातील सहापैकी तीन विधानसभा मतदारसंघ नाशिक शहरातील आहेत. तेथे भाजपचे आमदार असून महापालिकाही भाजपच्याच ताब्यात होती. जरांगे यांनी मराठा समाजास ओबीसीमधून आरक्षणाची मागणी केल्यानंतर महायुतीविरोधात मराठा समाजात वातावरण तयार झाले. त्यातच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ओबीसी नेते भुजबळ यांना प्रामुख्याने जरांगे यांनी लक्ष्य केले. भुजबळ यांनीही जरांगे यांना त्यांच्याच भाषेत प्रत्युत्तर दिले. आरक्षण आंदोलनादरम्यान काही ठिकाणी घरांच्या जाळपोळीच्या घटना घडल्यावर भुजबळ यांनी राज्यातील गृह मंत्रालयावर टीका करुन एकप्रकारे फडणवीस यांनाच धारेवर धरले. विशेष म्हणजे, भुजबळ हे राज्य सरकारला घरचा आहेर देत असताना त्यांना आवरण्याचा फडणवीस यांच्यासह कोणीच प्रयत्न केला नाही. मराठा समाजास ओबीसींमधून आरक्षणास विरोध करुन जरांगे यांच्यासह सरकारलाही अंगावर घेण्याच्या भुजबळ यांच्या आक्रमकतेस बळ देण्याचेच काम सत्ताधाऱ्यांच्या एका गटाकडून केले गेले. लोकसभा निवडणुकीत मराठा समाजाची नाराजी काही प्रमाणात महायुतीसाठी त्रासदायक होण्याची चिन्हे दिसताच भाजपकडून वंजारी समाजाच्या नेत्या पंकजा मुंडे, धनगर समाजाचे नेते महादेव जानकर यांना निवडणुकीच्या मैदानात उतरविण्यात आले. त्यांच्या जोडीला नाशिकमधून माळी समाजाचे भुजबळ यांनी भाजपकडून उमेदवारी केल्यास ओबीसी समाजाच्या तीन मोठय़ा नेत्यांना बळ देण्यात आल्याचा संदेश जाऊन ओबीसी समाज महायुतीमागे राहील, असा भाजपचा कयास आहे.

शिंदे गटात अस्वस्थता

खासदार हेमंत गोडसे यांना डावलून भुजबळांचे नाव पुढे येत असल्याने शिंदे गटात कमालीची अस्वस्थता आहे. महायुतीच्या बैठकीत थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाराजी व्यक्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली. भुजबळ यांना भाजपकडून उमेदवारीचा प्रस्ताव देण्यात आल्याच्या वृत्तास शिंदे गटाने दुजोरा दिला नसला तरी नाशिकची जागा आपल्याकडे ठेवण्यासाठी शिंदे गट प्रचंड आग्रही आहे.

भाजपकडून आपणास नाशिक मतदारसंघातून उमेदवारी करण्यासंदर्भात कोणताही प्रस्ताव देण्यात आलेला नाही. – छगन भुजबळ ,(ज्येष्ठ नेते, राष्ट्रवादी अजित पवार गट)