नाशिक : शहरात करोनाचा संसर्ग वाढत असतांनाही मुखपट्टीचा वापर न करता भटकणाऱ्यांविरूध्द शहर पोलीस तसेच प्रशासनाने कारवाई सुरू केली असून शहर परिसरात आतापर्यंत १६ हजार ६९० बेशिस्तांविरूध्द कारवाई करण्यात आली आहे. टाळेबंदीचे नियम मोडणाऱ्यांविरोधातही कारवाई करण्यात येत आहे. नागरिकांनी नियम पाळून पोलीस तसेच प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

मार्चपासुन टाळेबंदी  लागु करण्यात आली आहे. या काळात करोना संसर्ग टाळण्यासाठी मुखपट्टीचा वापर करणे अनिवार्य असतांना काही जणांकडून त्याचा वापर टाळला जात आहे. त्यांच्या अशा वागण्यामुळे करोना संसर्गाचा धोका अधिक वाढत असल्याने अशा मुजोर नागरिकांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल करणे सुरू केले आहे. आतापर्यंत या अंतर्गत १६ हजार ६९० जणांविरोधात सार्वजनिक ठिकाणी मुखपट्टीचा वापर केला नाही म्हणून कारवाई करण्यात आली आहे. तसेच शहर वाहतूक शाखेच्या वतीने मोटार वाहन कायद्याच्या विविध कलमा अंतर्गत कारवाई करून एक कोटी, ९० हजार ९०० रुपये दंड करण्यात आला. त्यापैकी केवळ २२ लाख, २५ हजार १०० रूपये दंड वसूल करण्यात आला आहे. करोनाचा संसर्ग पसरू नये म्हणून पोलीस तसेच महापालिका प्रशासनाच्या वतीने विविध उपाययोजना करण्यात येत असल्या तरी त्यांना नागरिकांकडूनही सहकार्य मिळणे आवश्यक आहे. काही बेशिस्त नागरिकांमुळे इतर शिस्तप्रिय नागरिकांनाही करोना संसर्गाचा धोका संभवतो. करोनाचा संसर्ग टाळण्यासाठी नागरिकांनी विनाकारण बाहेर पडू नये, नियमांचे पालन करावे, असे आवाहन शहर पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे.