कारवाईचा बडगा उगारला जाण्याची शक्यता

महापालिका सर्वसाधारण सभेतील निर्णयाने समाधान न झालेले सभागृह नेते दिनकर पाटील यांनी छेडलेले आंदोलन सलग दुसऱ्या दिवशी म्हणजे बुधवारी कायम राहिले. आपल्या मागण्यांवर जोपर्यंत निर्णय होणार नाही, तोवर आंदोलन मागे घेतले जाणार नसल्याचा निर्धार पाटील यांनी केल्यामुळे भाजपच्या गोटात अस्वस्थता पसरली आहे. या सर्व प्रकाराची पालकमंत्र्यांना माहिती देऊन सभागृह नेत्यांवर कारवाईचा बडगा उगारला जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

महापालिकेची सर्वसाधारण सभा मंगळवारी झाली. पत्रिकेवरील विषयांशी निगडित काही प्रश्नांवर सभागृह नेते दिनकर पाटील यांनी वेगवेगळी पत्रे दिली होती. प्रारंभीच त्यांनी आपल्या पत्रांचे वाचन करण्याचा आग्रह धरला. महापालिका हद्दीतील सर्व जाती धर्माची स्थळे आहे त्याच जागेवर कायम करावीत. सिडकोतील एक ते सहा योजना महापालिकेकडे वर्ग झाल्या आहेत. त्यांना बांधकाम परवानगी मिळत नाही. त्यामुळे सिडकोतील नागरिकांना सिडकोच्या बांधकाम प्रणालीनुसार परवानगी मिळावी, अशी पाटील यांची मागणी आहे.

शासनाने महापालिका शाळा-खासगी अनुदानित शाळांना मध्यवर्ती स्वयंपाकगृहातर्फे माध्यान्ह भोजन देण्याचे निश्चित केले आहे, परंतु यामुळे शहरातील महिला बचत गटांचा रोजगार हिरावला जाईल. त्यासाठी खिचडी बनविण्याचे काम बचत गटांकडे ठेवावे, महापालिकेने ज्या मिळकती बेकायदेशीरपणे सील केल्या आहेत, त्या मिळकती कायमस्वरूपी खुल्या करून देताना १० रुपये चौरस फुटाने वार्षिक भाडे आकारणी करावी, याकडे पाटील यांनी लक्ष वेधले.  यातील काही विषयांवर महापौरांनी निर्णय जाहीर केले, परंतु त्यामुळे पाटील यांचे समाधान झाले नाही. या चार विषयांबाबत न्याय मिळत नाही, तोवर सभागृहात ठिय्या देण्याचे त्यांनी जाहीर केले होते. त्यानुसार रात्री सर्वसाधारण सभेचे कामकाज झाल्यापासून ते बुधवारी सायंकाळपर्यंत ते सभागृहातच ठाण मांडून होते. यापूर्वीही त्यांनी सभागृहात मुक्काम ठोकण्याचे आंदोलन केले आहे. आपल्या आंदोलनास राष्ट्रवादीचे गटनेते गजानन शेलार, मनसेचे सलीम शेख, भाजपच्या काही नगरसेविका आणि हिंदुत्ववादी संघटना, समता परिषद संघटना आदींनी पाठिंबा दिल्याचे पाटील यांनी सांगितले.  या आंदोलनामुळे भाजपची चांगलीच अडचण झाली आहे.  दुपापर्यंत महापौर किंवा भाजपचे इतर पदाधिकारी त्यांची समजूत काढण्यास गेलेले नव्हते. पाटील यांनी हे प्रश्न मार्गी लागेपर्यंत मागे हटणार नसल्याचा इशारा दिल्याने भाजपच्या अडचणी वाढल्या आहेत.

भाजपच्या अडचणीत भर

महापालिकेत सत्ता असताना सभागृह नेते दिनकर पाटील हे अनेकदा विरोधी भूमिका घेऊन भाजपलाच अडचणीत आणत असल्याचा सूर पक्षाच्या नेत्यांमध्ये उमटत आहे. यापूर्वी पाटील यांनी वेगवेगळ्या मुद्दय़ांवरून भाजपच्या आमदारांवर प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे शरसंधान साधले होते. पालिकेतील सर्व घडामोडींची माहिती अधिवेशनात व्यस्त असणारे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्यापर्यंत पोहचविण्यात आल्याचे वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी सांगितले. दिनकर पाटील यांच्याकडे सभागृह नेतेपद ठेवायचे की नाही, यावर गांभीर्याने विचार सुरू आहे. पालकमंत्र्यांनी हिरवा कंदील दिल्यास कोणत्याही क्षणी कारवाईचा बडगा उगारला जाईल, असे पक्षाच्या नेत्यांकडून सांगण्यात आले.