कळवण तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांचे फेब्रुवारी महिन्याचे वेतन रखडल्याने बुधवारी संबंधितांनी जिल्हा बँकेच्या मुख्य कार्यालयात धडक दिली. या वेळी बँक अधिकारी व कर्मचाऱ्यांनी उत्तरे देण्यास टाळाटाळ केल्याने दुपारी व्यवस्थापकांसोबत बैठक झाली. ३ मेपर्यंत वेतन जमा होईल असे आश्वासन बँकेने दिले. दुसरीकडे नाशिक शहरात संतप्त शिक्षकांनी बँकेच्या पंचवटी शाखेला टाळे ठोकले. वेतन मिळत नसल्याने अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत असल्याची तक्रार या वेळी करण्यात आली.

निश्चलनीकरणापासून अडचणीत सापडलेल्या जिल्हा बँकेचे आर्थिक व्यवहार ठप्प झाले आहेत. शेतकरी व शिक्षक संघटनांकडून आंदोलनाचे सत्र सुरू आहे. राष्ट्रीयीकृत बँका रोकड देत नसल्याने शिक्षकांचे वेतन देणे अवघड झाल्याचा दावा बँक व्यवस्थापनाकडून केला जात आहे. या एकंदर स्थितीत बुधवारी कळवण आणि नाशिकमधील शेतकऱ्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलन केले. पीटीए आणि टीचर्स असोसिएशनचे सरचिटणीस जयेश पटेल आणि मनसे शिक्षक सेनेचे पदाधिकारी यांच्या नेतृत्वाखाली पंचवटीतील २० शाळांमधील दीडशे शिक्षकांनी दुपारी जिल्हा बँकेच्या पंचवटी शाखेत धाव घेतली. या शाखेत सुमारे ४०० ते ५०० शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची खाती आहेत. बँकेतून एकावेळी एक ते दोन हजार हजार रुपये दिले जातात. त्यासाठी कित्येक तास तिष्ठत राहावे लागते. यामुळे शिक्षक कुटुंबीय आर्थिक अडचणीत सापडल्याची तक्रार करत शिक्षकांनी या शाखेला टाळे ठोकले. अचानक घडलेल्या प्रकाराने बँक कर्मचाऱ्यांची धावपळ उडाली. या वेळी शिक्षकांना प्रत्येकी दोन हजार रुपये देण्यात आले. उर्वरित रकमेची तजवीज गुरुवारी केली जाईल, असे आश्वासन या वेळी देण्यात आले.

दुसरे आंदोलन जिल्हा बँकेच्या मुख्यालयात झाले. कळवण येथील प्राथमिक शाळेतील ६५० शिक्षकांचे वेतन फेब्रुवारीपासून रखडलेले आहे. वेतन वेळेत न झाल्यामुळे शिक्षकांवर उपासमारीची वेळ आली असून मुलांचे शैक्षणिक शुल्क, गृहकर्ज हप्ते, वाहन कर्ज, पतसंस्थांचे कर्ज, सुरक्षित गुंतवणुकीतची हप्ते तसेच वैद्यकीय सुविधांपासून वंचित असल्याची तक्रार आंदोलकांनी केली. या संदर्भात आधी कळवण शाखेकडे दाद मागितली गेली, परंतु प्रतिसाद न मिळाल्याने शिक्षकांना मुख्यालयाकडे मोर्चा वळवावा लागला. या वेळी अधिकाऱ्यांना थेट जाब विचारायचा प्रयत्न शिक्षकांनी केला, मात्र कर्मचारी, सुरक्षारक्षक तसेच पदाधिकाऱ्यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. व्यवस्थापकांनी ३ मे रोजी शिक्षकांचे पगार होतील, असे आश्वासन दिले. या आश्वासनाची पूर्तता न झाल्यास संघटना मुख्यालयासमोर आमरण उपोषण करेल, असा इशारा संघटनेच्या प्रतिनिधींनी दिला. या वेळी संजय शिंदे, भास्कर भामरे, भाऊसाहेब आहेर आदी उपस्थित होते.