शिवसेना संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनी ठाकरे गटाची नाशिकच्या अनंत कान्हेरे मैदानावर जाहीर सभा पार पडली. या सभेत संजय राऊत, भास्कर जाधव, उद्धव ठाकरे यांच्यासह अनेक नेत्यांनी जोरदार भाषणे केली. या भाषणात गद्दारांना धडा शिकवू असा एल्गार सगळ्यांनी पुकारला. मात्र, भास्कर जाधव यांचं आजचं भाषण खास उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्यासाठी होतं. पक्षातील फाटाफूटीतून बाहेर पडण्याकरता रश्मी ठाकरेंनी आता बाहेर पडावं असं आवाहन भास्कर जाधव यांनी जमलेल्या समुदयासमोर केलं. यावेळी रश्मी ठाकरेही भावूक झाल्याचं कॅमेऱ्याने कैद केलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“मी या वेळेला रश्मीवहिनींकरता बोलणार आहे. मला माहित नाही उद्धव ठाकरेंना आवडेल की नाही? पण मी बोलणार आहे”, असं भास्कर जाधव म्हणाले. ते पुढे म्हणाले, “पुण्यात एका काँग्रेसच्या नेत्याने आदित्य ठाकरेंबाबत भाषण केलं होतं. बाळासाहेब ठाकरेंचे नातू म्हणून तुम्ही मला आवडत नाहीत, उद्धव ठाकरेंचे पूत्र म्हणून नाही, आमदार म्हणून नाही, मंत्री म्हणून नाही. पण ज्यावेळेला तुमच्या वडिलांना ४० जणांनी घेरलं होतं, तेव्हा तुम्ही वाघाची झेप घेतली आणि उभे राहिलात म्हणून तुम्ही आम्हाला आवडता, असं त्या नेत्याने म्हटलं.”

हेही वाचा >> Uddhav Thackeray Sabha Nashik : “जा त्या लबाड नार्वेकरांना सांगा…”, उद्धव ठाकरेंचं थेट आव्हान; म्हणाले, “दाढी खाजवत…”

“आज सकाळपासून मला वहिनी बसल्या आहेत तिथे माँसाहेब बसल्यासारखं भासत आहे. माँसाहेब अशाच बसायच्या. व्यासपीठावर एका बाजूला धगधगता अग्नीकुंड असायचा. बाळासाहेबांच्या रुपाने अग्नी तळपत असायचा आणि दुसऱ्या बाजूला चंद्राप्रमाणे शांतपणे समोर माँसाहेब बसलेल्या असायच्या. मुख्यमंत्रीपद गेल्यानंतरही रश्मी वहिनी शांत आणि संयमी असलेलं मी पाहिलं. उद्धव ठाकरेंवर एवढी मोठी जीवघेणी शस्त्रक्रिया झाली, तेव्हा कुठेही त्यांच्या चेहऱ्यावर मी भीती पाहिली नाही. आदित्य ठाकरेंवर खुनाचे आरोप झाले होते, पण कुठेही वहिनी डगमगल्या नाहीत. त्याहीवेळेला वहिनींना मी शांतचित्ताने पाहिलं”, असं भास्कर जाधव म्हणाले.

“पूर्व विदर्भात माझी निवड केली आहे, तेथील महिलांनी मला विनंती केली आहे की तुम्ही वहिनींना साकडं घाला आणि त्यांना बाहेर पडू द्या. वहिनी बाहेर पडायला पाहिजेत. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या सौभाग्यवती वेणूताई, शरद पवारांच्या सौभाग्यवती प्रतिभाताई पाटील, विलासराव देशमुखांच्या सौभाग्यवती वैशालीताई देशमुख अशाकाही माजी मुख्यमंत्र्यांच्या यादीमध्ये, त्यांच्या बरोबरीने विनम्र कोणी असेल तर त्या रश्मी ठाकरे असतील, असा लेख मध्यंतरी आला होता. आदर्श माता, आदर्श गृहिणी आणि आदर्श राज्यकर्त्याची पत्नी म्हणून त्या यादीत रश्मी वहिनींचं नाव आलं होतं. त्यामुळे वहिनी आता बाहेर पडायची वेळ आली आहे. विश्वासघात झाला आहे. आपल्या पक्षप्रमुखाला बाहेर गादीवरून ओढलं आहे. अशावेळी गप्प बसायचं नाही. याकरता सर्वांनी बाहेर पडलं पाहिजे. त्याकरता हे शिबिर निर्णायक ठरेल”, असं भावनिक आवाहनही भास्कर जाधव यांनी केलं. भास्कर जाधवांचं हे भाषण ऐकताना रश्मी ठाकरे भावूक झाल्याचंही दिसलं.

हेही वाचा >> “मुख्यमंत्री पदासाठी मिंधेपणा करणारे…”, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा ठाकरेंवर पलटवार; म्हणाले, “लबाड लांडग्याने…”

तेजस ठाकरे राजकारणात येणार?

तेजस ठाकरे काल पूजेला बसले होते, त्यामुळे पत्रकारांनी मला विचारलं की ते राजकारणात उतरणार आहेत का? मी उत्तर दिलं नाही. तेजस ठाकरेंना जेव्हा केव्हा वाटेल तेव्हा ते जरूर राजकारणात झेप घेतील. कारण तेही वाघाचाच बछडा आहेत”, असंही भास्कर जाधव म्हणाले.

तसंच, ज्यांनी विश्वासघात केला आहे त्यांना या देवभूमीत राजकीय दृष्ट्या गाडल्याशिवाय राहायचं नाही असं मी आवाहन करतो, असा एल्गारही त्यांनी पुकारला.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bhaskar jadhavs emotional appeal to rashmi thackeray vahini its time to come out sgk