नाशिक – महाविकास आघाडी आणि महायुतीकडून नाशिक लोकसभा मतदारसंघात मराठा समाजाच्या उमेदवारांना संधी दिली जात असताना वंचित बहुजन आघाडीने सकल मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक करण गायकर यांना मैदानात उतरविण्याची तयारी केली आहे. महाविकास आघाडीने राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी दिली तर, महायुतीची उमेदवार निश्चिती बाकी आहे. वंचितने मराठा समाजातील व्यक्तीला मैदानात उतरवण्याचे निश्चित केले असून केवळ औपचारिक घोषणा बाकी आहे.

वंचित आघाडीचे प्रमुख ॲड. प्रकाश आंबेडकर यांची करण गायकर यांनी अकोला येथे भेट घेतली. यावेळी उभयतांमध्ये नाशिक लोकसभेच्या जागेबाबत सखोल चर्चा झाली. वंचिततर्फे गायकर यांना उमेदवारी देण्याचे जवळपास निश्चित झाल्याचे वंचित आघाडीचे महानगरप्रमुख अविनाश शिंदे यांनी सांगितले. गरीब मराठा आणि श्रीमंत मराठा अशी ही लढाई असणार आहे. गरीब मराठ्यांना आरक्षणासाठी आंदोलन करावे लागते. त्यांचा प्रमुख राजकीय पक्ष आणि श्रीमंत मराठा विचार करीत नाही. गरीब मराठा सत्तेत गेला पाहिजे, या भूमिकेतून वंचित हा प्रयोग करीत असून लवकरच गायकर यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब होईल असे शिंदे यांनी सांगितले.

हेही वाचा – दिंडोरीत महाविकास आघाडीतील बंड रोखण्याची धडपड, माकपची जयंत पाटील यांच्याकडून मनधरणी

हेही वाचा – नंदुरबारमध्ये काँग्रेस धक्क्याच्या तयारीत ? – रजनी नाईक यांनी उमेदवारी अर्ज घेतल्याने चर्चा

मराठा आरक्षणाच्या लढ्यासह अनेक आंदोलनात गायकर हे सक्रिय होते. महायुतीकडून छगन भुजबळ मैदानात उतरल्यास त्यांच्या विरोधात उमेदवारी करणार असल्याचे त्यांनी आधी जाहीर केले होते. भुजबळांनी माघार घेतल्यानंतरही ते निवडणूक लढणार आहेत. गेल्या १५ वर्षांपासून आपण मराठा समाजासह, शेतकरी, कामगारांच्या न्याय हक्कासाठी लढा देत असून त्यासाठी अनेक गुन्हे अंगावर घेतले. आता वंचितची भक्कम साथ मिळणार असून मराठा, ओबीसींसह १८ पगड जातींना बरोबर घेऊन निवडणूक लढणार असल्याचे गायकर यांनी म्हटले आहे. मनोज जरांगे हे मराठा आरक्षणाची लढाई लढत असताना आंबेडकर यांनी वेळोवेळी मराठा समाजाला पाठिंबा दिला. याबद्दल गायकर यांनी आभार व्यक्त केले.