११ ते २० वयोगटातील सहा हजार, २१ ते ३० वयोगटातील १२ हजार रुग्ण

नाशिक : शहरात करोनाबाधितांची संख्या एक लाख १३ हजारांचा टप्पा ओलांडण्याच्या मार्गावर असताना या आजाराच्या विळख्यात ११ ते २० वयोगटातील मुलांसह तरूणाईची संख्या वाढत आहे. आतापर्यंत ११ ते २० वयोगटातील पाच हजार ९७५ तर, २१ ते ३० या वयोगटातील १२ हजार ३४६ जणांना करोनाचा प्रादुर्भाव झाला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे शून्य ते १० वयोगटातील तीन हजार ३४५ बालकेही बाधित झाली. आतापर्यंत आढळलेल्या एकूण रुग्णांमध्ये ५५ टक्के पुरुष तर, ४५ टक्के महिला आहेत.

शहरात गेल्या वर्षभरात करोनामुळे १२७७ रुग्णांचा मृत्यू झाला. ९५ हजार ५०६ रुग्ण बरे होऊन घरी परतले. सध्या जवळपास १६ हजार रुग्ण उपचार घेत आहेत. वर्षभरातील बाधितांची आकडेवारी पाहिल्यास पहिल्या लाटेत ३१ ते ५० वयोगटातील रुग्णांची संख्या अधिक होती. ज्येष्ठांचाही काही प्रमाणात समावेश होता. पहिल्या टाळेबंदीत शाळा, महाविद्यालये बंद असल्याने बहुतांश बालके, तरूणाई घरी सुरक्षित होती. करोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर शाळा, महाविद्यालये, शिकवण्या सुरू झाल्या. विद्यार्थ्यांचे बाहेर फिरणे सुरू झाले. प्रादुर्भाव वाढल्यानंतर शाळा, महाविद्यालये, शिकवण्या बंद झाल्या. पण, अंशत: टाळेबंदीत तरूणाईची भ्रमंती काही थांबलेली नाही. कॉलेज रोड, गंगापूर रस्त्यासह अनेक भागात विनाकारण फिरणारे कमी नाहीत. हॉटेल, खाद्यपदार्थाच्या दुकानांवर त्यांची गर्दी असते. या सर्वाची परिणती या वयोगटातील रुग्णांची संख्या वाढण्यात झाल्याचा अनुमान आहे. शून्य ते १० वयोगटातील एकूण बाधितांमध्ये १७५६ मुले तर १५८९ बालिकांचा समावेश आहे. ११ ते २० वयोगटातील रुग्णांमध्ये ३१८९ मुले तर २७८६ मुलींचा समावेश आहे.

गेल्या वर्षी २१ ते ३० वयोगटातील बाधितांची संख्या पुढील वयोगटाच्या तुलनेत कमी होती. परंतु, आता पुढील गटातील रुग्णसंख्येची बरोबरी या गटाने गाठली आहे. या वयोगटातील एकूण १२ हजार ३४६ जण बाधित झाले. त्यामध्ये सहा हजार ३९० युवक तर पाच हजार ९५६ युवतींचा समावेश आहे. ३१ ते ४० वयोगटातील १२ हजार १६८ जण बाधित झाले. त्यात सहा हजार २७८ पुरूष तर पाच हजार ८९० महिलांचा समावेश आहे. ४१ ते ५० वयोगटातील सहा हजार ४७८ पुरुष तर सहा हजार सहा हजार ४७ महिला बाधित झाल्या. ५१ ते ६० वयोगटात आतापर्यंत ११ हजार ७६ जण बाधित झाले. त्यात पाच हजार ६९८ पुरूष आणि पाच हजार ३७८ महिलांचा समावेश आहे. ६१ वर्षांपुढील सात हजार ७५६ जण बाधित झाले. त्यामध्ये ४२६७ पुरुष तर ३४८९ महिलांचा समावेश आहे.

आतापर्यंत लहान मुलांमध्ये करोनाचे प्रमाण कमी होते. परंतु, यावेळी त्यांच्यातही प्रादुर्भाव वाढत असून मुलांसाठी हा प्राणघातक असल्याचे निरीक्षण महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या संचालिका डॉ. कल्पना कुटे यांनी नोंदविले आहे. आताचा करोना हा जास्त तीव्र स्वरूपाचा, लवकर पसरणारा आणि त्यामुळे जास्त मृत्यू होत आहे. करोना झालेल्या व्यक्तींच्या घरातील इतरांनी आपली तपासणी करणे, नकारात्मक अहवाल आला तरी आठ दिवस घराबाहेर न पडणे आवश्यक आहे. सर्व नागरिकांनी नियमाचे पालन केले तर ही साथ नक्कीच आटोक्यात येईल, याकडे त्यांनी लक्ष वेधले.