कुटुंबीयांनाही लाभ मिळणार; खास रुग्णवाहिका व्यवस्थाही उपलब्ध

नाशिक : शहर पोलीस दलात पुढील काळात करोनामुळे एकही मृत्यू होऊ नये, यासाठी मुख्यालयात महापालिकेच्या सहकार्याने १०० खाटांचे करोना काळजी केंद्र सुरू केले जाणार असल्याचे नवनियुक्त पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी सांगितले. पोलिसांसाठी खास रुग्णवाहिका व्यवस्थाही कार्यान्वित होत आहे. करोनाविषयीची भीती दूर करून पोलीस यंत्रणेचे मनोधैर्य उंचावण्यासाठी प्रयत्न केले जातील. पोलिसांना मानसिक आणि शारीरिकदृष्टय़ा सक्षम करण्यावर लक्ष केंद्रित केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

करोनामुळे शहर पोलीस दलातील तीन जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या १८ पोलीस रुग्णालयात उपचार घेत असून २३ गृह विलगीकरणात आहेत. टाळेबंदी आणि निर्बंध शिथील होत असताना अवघे पोलीस दल रस्त्यावर काम करत आहे. पोलीस दैनंदिन कामात अनेकांच्या थेट संपर्कात येतात. शहरात मागील काही दिवसांत रुग्णसंख्या झपाटय़ाने वाढत आहे. या वातावरणात भीती दाटलेली असते. ती दूर करण्यासाठी प्रबोधनाचे काम हाती घेतले गेले असून पोलिसांसाठी खास करोना काळजी केंद्राची उभारणी करण्यात आली आहे. मंगळवारपासून हे केंद्र कार्यान्वित होईल. जोडीला रुग्णवाहिका सेवाही उपलब्ध करण्यात आली आहे. सौम्य वा प्राथमिक लक्षणे असणाऱ्या पोलिसांवर या केंद्रात उपचार केले जातील. १०० खाटांच्या केंद्रात ६० ते ७० टक्के खाटा पुरुष पोलीस आणि त्यांचे कुटुंबीय तर ३० ते ४० खाटा महिला पोलीस आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी राखीव असतील. यासाठी व्हॉट्सअ‍ॅप क्रमांक दिला जाणार आहे. कोणाला लक्षणे आढळून आल्यास ते उपरोक्त क्रमांकावर संदेश करतील. दोन तासांत रुग्णवाहिका त्या पोलिसास करोना केंद्रात दाखल करेल. तिथे प्रतिजन चाचणीची व्यवस्था राहील. कुणाला करोनाची तीव्रता अधिक वाटल्यास त्यांना रुग्णालयात दाखल करण्याची व्यवस्था शहर पोलिसांकडून केली जाणार असल्याचे पांडे यांनी सांगितले.

पोलीस दलातील करोना संक्रमण रोखून त्यांना मानसिक, शारीरिकदृष्टय़ा सक्षम करण्यावर भर दिला जाईल. मुख्यालयात पोलिसांसाठी हक्काचे करोना काळजी केंद्र उभारणीचा तो उद्देश आहे. करोना संक्रमण रोखण्यासाठी याआधी ऑर्थर रोड कारागृहात यशस्वी केलेल्या प्रयोगाची माहिती पांडे यांनी दिली. या कारागृहात १८० करोनाबाधित होते. त्यातील काहींना मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार, क्षयरोगसारखे विकार असणाऱ्यांचा समावेश होता. परंतु योग्य ती काळजी घेतल्याने तिथे एकाही करोनाबाधिताचा मृत्यू झाला नाही. त्याच धर्तीवर, करोनाकाळात पोलिसांच्या आरोग्याकडे प्राधान्यक्रमाने लक्ष दिले जाणार असल्याचे पांडे यांनी सांगितले.