मंगळसूत्र खेचून पलायन

या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

(संग्रहीत)

नाशिक : पत्ता विचारण्याचा बहाणा करीत दुचाकीवरून आलेल्या चोरट्याने महिलेच्या गळ््यातील मंगळसूत्र ओरबाडून नेल्याची घटना गंगापूर रस्त्यावरील सिरीन मिडोज भागात घडली. याबाबत भारती पाटील (सिरीन मिडोज) यांनी तक्रार दिली. पाटील हे मुलासह पायी जात असतांना घरापासून काही अंतरावरच दुचाकीने आलेल्या संशयिताने स्वरा हाईट्स इमारत कुठे आहे, अशी विचारणा करीत त्यांच्या गळ्यातील ७० हजार रुपये किंमतीचे मंगळसूत्र खेचून नेले. या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रिक्षा प्रवासात पोत लंपास

रिक्षा प्रवासात सहप्रवासी असलेल्या महिलांनी वृध्देच्या पर्समधून सोन्याची पोत हातोहात लंपास केल्याची घटना शालिमार ते जीपीओ रस्ता भागात घडली. याबाबत कामटवाडा येथील यमुना जगझाप यांनी तक्रार दिली. जगझाप या काही कामानिमित्त सराफ बाजारात आल्या होत्या. जुन्या पोतीत वाढ करून त्या घराकडे  शालिमार येथून रिक्षातून जात असतांना सहप्रवासी असलेल्या अनोळखी महिलांपैकी एकीने पर्स उघडून सोन्याची पोत असलेली डबी चोरून नेली. या डबीत सुमारे ४४ हजार रूपये किंमतीची पोत होती. या प्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वृद्धाकडून रोख रक्कम लंपास 

बँकेत पैशांचा भरणा करीत असताना मदतीचा बहाणा करीत संशयितांनी वृध्दाच्या हातातील २१ हजार रुपयांच्या नोटा लंपास केल्याची घटना शरणपूर भागात घडली. बँक ऑफ बडोदात ही घटना घडली. या बाबत विष्णू धनवंत (७३, खुटवडनगर) यांनी तक्रार दिली. धनवंत हे बँक ऑफ बडोदाच्या शरणपूर रोड शाखेत पैसे भरण्यासाठी गेले होते. ५० हजार रूपये भरणा करण्यासाठी त्यांनी पावती भरली. नोटांची मोजणी करत असताना दोन संशयितांनी त्यांना गाठले. मदतीचा बहाणा करत बंडलमधील ५०० रुपयांच्या ४२ नोटा हातोहात लंपास केल्या. ही बाब रोखपालाने पैसे मोजल्यानंतर निदर्शनास आणली. बंडलमध्ये १०० पैकी ५८ नोटा होत्या. संशयितांनी २१ हजार रुपये म्हणजे ४२ नोटा लंपास केल्या. या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गंगावाडीत युवकावर हल्ला

रस्त्याने पायी निघालेल्या युवकावर टोळक्याने कोयत्याने हल्ला केल्याची घटना गंगावाडी परिसरात घडली. शुभम खैरनार (१९) असे हल्ल्यात जखमी झालेल्या युवकाचे नांव आहे. याबाबत त्याचे वडील मधुकर खैरनार यांनी तक्रार दिली. शुभम गंगावाडीत राहणाऱ्या आपल्या मानलेल्या बहिणीस भेटण्यासाठी गेला होता. बहिणीस भेटून तो आपल्या घराकडे जात असतांना ही घटना घडली. सिध्देश मुर्तडक, गणेश कांडेकर आणि त्यांच्या साथीदारांनी त्यास अडवित जुन्या वादाची कुरापत काढून हल्ला केला. हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या शुभमची प्रकृती चिंताजनक आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व नाशिक बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Crime news theft fraud bike auto akp

ताज्या बातम्या