अवकाळी पावसामुळे भात पिकाचे नुकसान

इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर तालुक्यातील काही भागात अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने कापलेल्या भात पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले.

इगतपुरी तालुक्यातील कावनई परिसरात अवकाळी पावसामुळे भात पिकांचे नुकसान झाले.

इगतपुरी, त्र्यंबकेश्वरातील शेतकऱ्यांना फटका

नाशिक : इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर तालुक्यातील काही भागात अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने कापलेल्या भात पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले. भात खरेदीसाठी आदिवासी विकास महामंडळाचे दुर्लक्ष, त्यात विमा कंपन्या आणि अधिकाऱ्यांकडून न मिळणारे सहकार्य, हे सर्व कमी की काय  त्यात अवकाळी पावसाने झोडपल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. अवकाळी पावसामुळे परिसरातील भात शेतीसह नागली, वरई, उडीद पिकेही धोक्यात आली आहेत.

शेती मालाचे नुकसान झाल्यास ७२ तासांच्या आत विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांना कळविणे अपेक्षित असते. परंतु, दूरध्वनी केल्यावर परप्रांतीय अधिकाऱ्यांकडून उडवाउडवीची उत्तरे देऊन शेतकऱ्यांना दिलासा देण्याऐवजी बोळवण केली जाते. मागील वर्षी तक्रार करुनदेखील विम्याचा लाभ मिळाला नाही. शेतकरी बांधवांनी विमा कंपन्याना दूरध्वनी केल्यावर पिके शेतात राहू द्या, कंपनी

अधिकारी आल्यावर पाहणी करून न्याय मिळवून देतील, अशी उत्तरे देण्यात आली. धारगाव सजा, खैरगाव, घोटी सजेत अवकाळी पावसाने नुकसान झाले आहे.

३२ हजार भात क्षेत्र पिकांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव पसरलेला असतांना आता अवकाळी पावसामुळे समस्यांत भर टाकली असल्याचे प्रहार संघटनेचे उपाध्यक्ष सोपान परदेशी यांनी सांगितले. शेतकरी आणि शेतमजूर यांना न्याय मिळवून देण्यासाठी आंदोलन सुरू करण्यात येईल, असेही ते म्हणाले. तर तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी प्रशासनाने काम सुरू करावे, अशी सूचना जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्ष नैना गावित यांनी केली आहे.

त्र्यंबकेश्वर तालुक्यातही जोरदार पावसामुळे शेतीचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले असून शेतातील अन्नधान्याची मोठय़ा प्रमाणावर नासाडी झाली. बहुतेक शेतकऱ्यांनी सोंगून ठेवलेले भात पीक पूर्णपणे भिजले. काही खाचरे तुडूंब भरल्याने पिकाचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले.

तालुक्यात बहुतेक ठिकाणी भात कापणीला वेग आला असून काही शेतकरी हे यंत्राने कापणी करीत आहेत. परंतु, काही भात शेतीमध्ये पूर्वीचे पाणी आणि खूप ओलावा असल्याने कापणी यंत्र चालू शकत नसल्याने अशा शेतकऱ्यांना मजुराशिवाय पर्याय नाही. तालुक्यातील बहुतेक मजूर, अल्प भूधारक शेतकरी हे मजुरीसाठी स्थलांतरित किंवा ज्या ठिकाणी चांगली मजुरी मिळेल अशा ठिकाणी जात असतात. त्यामुळे तो प्रश्नही शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे. 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व नाशिक बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Damage paddy crop untimely rains ysh

Next Story
मोर्चेकऱ्यांच्या रास्ता रोकोमुळे कोंडी