नव्या व जुन्या गाण्यांचा सुंदर मिलाफ. उपस्थितांच्या आवडी-निवडीला सकारात्मक प्रतिसाद आणि त्यास डीजेच्या दणदणाटाची साथ. येथील गोदा तिरावर आयोजित ‘धूम मचा ले’ कार्यक्रमात आदितीने सादर केलेल्या गाण्यांनी अशी काही मोहिनी टाकली की, उपस्थित तरुणाईला ठेका धरणे भाग पडले. ‘रेड एफ एम ९३.५’ आणि ‘थोरात दूध’ यांच्या सहकार्याने गंगापूर रस्त्यावरील सुयोजित व्हॅली येथे शनिवारी रंगलेल्या या कार्यक्रमास तरुणाईचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. दै. ‘लोकसत्ता’ माध्यम प्रायोजक असलेल्या या कार्यक्रमाचा श्रीगणेशा आदितीने ‘धूम ३’मधील गाण्याने केला. ‘बेबी डॉल..’, ‘लेकिन पार्टी अभी बाकी है’, यांसारख्या गाण्यांबरोबर ‘पहला नशा पहला खुमार..’, ‘जय जय बजरंगी’, या गाण्यांनी कार्यक्रमाची रंगत वाढवत नेली. सूत्रसंचालनाची धुरा सांभाळणारे स्मिता आणि स्मृती यांनी थेट प्रेक्षकांमध्ये जाऊन त्यांची गाण्यांची पसंत जाणून घेतली. त्या अनुषंगाने आदितीने गाणी सादर केल्यामुळे जल्लोषात अधिकच भर पडली. आदितीच्या ‘सूरज डुबा है यारो’, ‘दो घूंट नशे के मारो’, या गाण्यांना दोन वेळा ‘वन्स मोअर’ मिळाला. प्रारंभी या कार्यक्रमाचे प्रायोजक सुयोजित बिल्डकॉनचे अनिल जैन, वैशाली जैन व जयश्री राजेगावकर, ऱ्हिदम् साऊंडचे मंगेश पठारे, सिक्स सिग्माचे आशीष जाधव आदींचा सत्कार करण्यात आला.