सेवांची शंभरी गाठणारा राज्यात नाशिक पहिलाच जिल्हा

नाशिक : जिल्हा प्रशासनाच्यावतीने आधीच्या २० आणि नवीन ८१ अशा एकूण १०१ सेवा प्रजासत्ताक दिनापासून सेवा हमी कायदा अधिसूचनेनुसार नागरिकांना देण्यात येणार आहेत. सेवांची शंभरी गाठणारा नाशिक हा राज्यातील पहिलाच आणि एकमात्र जिल्हा असल्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले. प्रजासत्ताकच्या ७० व्या वर्धापन दिनानिमित्त पोलीस कवायत मैदान येथे आयोजित राष्ट्रध्वज वंदन आणि संचलन सोहळ्यात भुजबळ यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजवंदन करण्यात आले.

यावेळी त्यांनी अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीची मदत मिळावी, यासाठी शासनाने महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या रुपाने मोठा दिलासा दिल्याचे नमूद केले.

शासन शेतकरी, कष्टकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यास कटिबध्द आहे. कर्जमुक्ती योजनेसाठी पात्र शेतकऱ्यांची आधार जोडणीसाठी जिल्हा प्रशासनाने  कमी वेळेत कार्यवाही पूर्ण केली आहे. जिल्ह्यातील एक लाख ३६ हजार शेतकरी या योजनेसाठी पात्र ठरणार आहेत. नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी विभागीय स्तरावर मुख्यमंत्री सचिवालय कक्ष कार्यान्वित करण्यात आला. यामुळे नागरिकांच्या समस्यांचे निराकरण विभाग पातळीवर कमी वेळात होईल, असे ते म्हणाले. पोलीस विभागामार्फत महिला सुरक्षिततेसाठी राबवल्या जाणाऱ्या निर्भया योजनेचे काम उत्कृष्ट असून, भरोसा सेल, क्यूआर कोडच्या आधारे करण्यात येणाऱ्या पर्यवेक्षणामुळे नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. तसेच नाशिक जिल्ह्य़ाने १५० व्या वर्षांत पर्दापण केले असून या निमित्ताने जिल्ह्याची गुणवैशिष्ठय़े, शक्तिस्थळे जगासमोर मांडण्यासाठी नागरिकांनी आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन भुजबळ यांनी केले.

कार्यक्रमात पोलीस दलाच्या मॅरेथॉन संकेतस्थळाचे अनावरण करण्यात आले. यावेळी परेड कमांडर सहाय्यक पोलीस आयुक्त समीर शेख यांच्या नेतृत्वाखाली शानदार संचलनाद्वारे राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली. संचलनात शहर, ग्रामीण पोलीस, गृहरक्षक दल, वाहतूक शाखा, वन विभाग, अग्नीशमन दल, भोसला सैनिकी शाळेतील विद्यार्थी, राज्य उत्पादन शुल्क, पर्यटन वाहन, वज्र वाहन, पोलीस बँड, श्वान पथक, जलद प्रतिसाद पथक, महिला-बाल विकास विभाग आदी पथकांनी सहभाग घेतला.

यावेळी विभागीय आयुक्त राजाराम माने, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, मनपा आयुक्त राधाकृष्ण गमे, विशेष पोलीस महानिरीक्षक छोरिंग दोरजे, पोलीस आयुक्त विश्वास नांगरे, जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. आरती सिंह आदी उपस्थित होते.

कोणती सेवा, किती दिवसात ?

सेवांची शंभरी गाठल्याबद्दल पालकमंत्र्यांनी जिल्हा प्रशासनाचे अभिनंदन केले. सर्व तहसील कार्यालयात सेवा हमी कायद्यात देण्यात येणाऱ्या सेवांबाबत फलक लावण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी या सेवा देण्यासाठी पुढाकार घेतला. त्या अनुषंगाने सर्व उपजिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदारांना निर्देश देण्यात आले. पूर्वीच्या २० आणि नवीन ८१ अशा एकूण १०१ सेवा दिल्या जातील. त्या देताना प्रत्येक सेवेसाठी कालमर्यादा निश्चित करण्यात आली. उत्पन्नाचा दाखला, अधिवास, राष्ट्रीयत्व दाखला, ज्येष्ठ नागरिक दाखला यासाठी तीन दिवस, सात-बारा उतारा, आठ अ उतारा सेतू कार्यालयातून १५ मिनिटात, विविध प्रतिज्ञापत्र ११ मिनिटे, वारस दाखला १० दिवस, जमीन मागणी प्रस्ताव सादरीकरणास ४५ दिवस, हॉटेल परवाना ३० दिवस, हॉटेल परवाना नुतनीकरण सात दिवस, नवीन शिधापत्रिका ३० दिवस अशी कर्मचारीनिहाय कायमर्यादा निश्चित करण्यात आली आहे.