महिलांच्या सुरक्षिततेसाठी करण्यात आलेल्या कायद्यांमध्ये पुरूष हक्कांकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने महिलांकडून अशा कायद्यांचा गैरवापर होत असून तो थांबविण्यात यावा, या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी रविवारी दुपारी येथे रामकुंडावर वास्तव फाऊंडेशन आणि पुरूष हक्क संरक्षण समितीच्या वतीने मुंडन करण्यात आले.

कौटुंबिक हिंसाचारविरोधी कायद्यात पुरूषांच्या हक्काकडे दुर्लक्ष होत असल्याचे पुरूषांच्या हक्कासाठी लढणाऱ्या वास्तव फाऊंडेशनचे म्हणणे आहे.

अशा कायद्यांचा आधार घेऊन महिलांकडून अनेक खोटे गुन्हे दाखल करण्यात आल्याने पुरूषांवर अन्याय होत असल्याची फाऊंडेशनची तक्रार आहे. महिलांच्या अत्याचाराकडे ज्याप्रमाणे लक्ष देण्यात येते, त्याप्रमाणेच पुरूषांवर होणाऱ्या अत्याचाराकडे लक्ष देण्यात येत नसल्याबद्दल फाऊंडेशन आणि पुरूष हक्क संरक्षण समितीच्या पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. अशा प्रकारच्या खोटय़ा गुन्ह्य़ांमुळे अनेकांना त्रास सहन करावा लागत असून त्यापैकी शंभरपेक्षा अधिक जणांनी आंदोलनात सहभाग घेतला. मुंडन मात्र बोटावर मोजण्याइतपतच आंदोलकांनी केले. यावेळी मागण्यांचा फलक फडकावित घोषणाबाजी करण्यात आली.