शासकीय आश्रमशाळा व वसतिगृहात रोजंदारीने काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी शुक्रवारी शहर परिसरातून पदयात्रा काढत आदिवासी विकास विभागाच्या मुख्यालयावर बिऱ्हाड आंदोलन सुरू केले. पदयात्रेमुळे शहरातील वाहतुकीचा बोजवारा उडाला.
महाराष्ट्र राज्य रोजंदारी वर्ग तीन व चार कर्मचारी संघटनेने आजवर अनेकदा आंदोलन केले आहे. परंतु, प्रशासनाच्या उदासीन कारभारामुळे कर्मचाऱ्यांना न्याय मिळाला नसल्याची तक्रार करत बिऱ्हाड आंदोलनाचे आयोजन करण्यात आल्याचे अध्यक्ष रितेश ठाकूर, हेमंत पावरा आदींनी सांगितले. कर्मचारी कुटुंबातील सदस्यांसह आंदोलनात सहभागी झाले. तत्पूर्वी, दुपारी मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील हॉटेल जत्रा येथून आदिवासी विकास भवनपर्यंत पदयात्रा काढण्यात आली. यामुळे वाहतुकीस ठिकठिकाणी अडथळे निर्माण झाले. मुख्यालयावर धडकल्यानंतर शिष्टमंडळाने आयुक्तांना निवेदन दिले. आश्रमशाळा रोजंदारीतील कर्मचाऱ्यांनी गतवर्षी आमरण उपोषण केले होते. त्या वेळी आदिवासी विकासमंत्र्यांनी सर्व समस्या सोडवण्याचे आश्वासन दिले. फेब्रुवारी २०१६ पर्यंत रोजंदारी कर्मचाऱ्यांना कायम सेवेत सामावून घेण्यात येईल. तोपर्यंत कोणतीही भरती किंवा बदली प्रक्रिया राबविली जाणार नाही, असे म्हटले होते. याबाबत शासन स्तरावर सकारात्मक प्रक्रिया सुरू असली तरी काही अधिकारी मनमानी कारभार करून बदली प्रक्रिया राबवत आहेत. त्याचा निषेध आंदोलकांनी केला. आश्रमशाळा, वसतिगृहातील सर्व रोजंदारी कर्मचाऱ्यांना कायम सेवेत सामावून घ्यावे, शासनाने दिलेले आश्वासन पूर्ण होत नाही, तोपर्यंत कोणतीही भरती व बदली प्रक्रिया राबविली जाऊ नये, सध्या सुरू असलेली भरती व बदली प्रक्रिया तात्काळ रद्द करावी, आदी मागण्या निवेदनात आंदोलकांनी केल्या आहेत.