संपूर्ण गाव ‘इंडियन पोस्ट पेमेंट्स बँक’चे खातेधारक

खुंटेवाडी ‘आयपीपीबी’चे देशातील पहिले ‘डिजिटल ग्राम’

देवळा तालुक्यातील खुंटेवाडी येथे देशात सर्वप्रथम आयपीपीबीचे ‘डिजिटल ग्राम’ होण्याचा बहुमान मिळविल्याचे पत्र सरपंच मीना निकम, उपसरपंच भाऊसाहेब पगार यांच्याकडे देताना टपालअधीक्षक नागेश्वर रेड्डी, बँकेचे क्यूआर कार्ड दाखविताना खातेधारक तसेच इतर टपालअधिकारी.   (छाया- महेश सोनकुळे)

भारतीय डाक विभागाच्या माध्यमातून देवळा तालुक्यातील खुंटेवाडी गावातील प्रत्येक कुटुंब ‘इंडियन पोस्ट पेमेंटस् बँक’ (आयपीपीबी)चे खातेधारक झाले आहे. येथे कॅशलेस व्यवहाराची सुरुवात झाल्याने देशात सर्वप्रथम आयपीपीबीचे ‘डिजिटल ग्राम’ होण्याचा मान खुंटेवाडीने मिळविल्याची माहिती मालेगाव विभागाचे प्रमुख टपाल अधीक्षक नागेश्वर रेड्डी यांनी दिली. खुंटेवाडी येथे झालेल्या ‘माझा अभिमान-सक्षम ग्राम’ कार्यक्रमात टपालविभागाने यावर शिक्कामोर्तब केले.

‘सैनिकांचे गाव’ म्हणून ओळख असणाऱ्या खुंटेवाडीने टपाल बँकिंगचा पर्याय स्वीकारत त्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे. या गावात एकही बँक किंवा पतसंस्था नसल्याने कोणत्याही आर्थिक व्यवहारासाठी देवळा शहरात जावे लागत असे. परंतु टपाल बँकेमुळे आता गावात आर्थिक व्यवहार आणि तेही कॅशलेस सुरुवात झाली आहे.

या गावातील सर्व ३७८ कुटुंबातील ६७८ व्यक्ती आणि सहा व्यावसायिकांनी ‘आयपीपीबी’चे खाते उघडण्यात आले आहे. सर्व अनुदान, शिष्यवृत्ती या खात्यावर वर्ग करण्याचे नियोजन असून वीज देयक, विमा अशा सर्व प्रकारचा भरणा येथून करणे शक्य होणार आहे. ग्रामस्थांचा विश्वास आणि डाक विभागाचे सहकार्य यातून एक महिन्याच्या आत गावाने हे शक्य केले. यासाठी उपसरपंच भाऊसाहेब पगार यांनी विशेष प्रयत्न केले. मुंबईच्या पोस्ट मास्टर जनरल शोभा मधाळे यांचे मार्गदर्शन लाभले.

यानिमित्त झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच मीना निकम होत्या. उपविभागीय टपाल निरीक्षक डी. जी. उमाळे, आयपीपीबीचे वरिष्ठ प्रबंधक परमेश्वर क्षीरसागर, क्षेत्रीय प्रबंधक राजीव दुबे यांनी मनोगत व्यक्त करून गावाने मिळवलेल्या यशाबद्दल प्रमुख पदाधिकाऱ्यांचा सत्कार केला. देवळा नगरपंचायतीचे गटनेते जितेंद्र आहेर, प्रसिद्ध कांदा व्यापारी अमोल आहेर यांच्यासह टपाल कर्मचारी एस. के. पगार, के. एस. कुवर, मुख्याध्यापक पी. के. सूर्यवंशी, पोलीसपाटील कल्पना भामरे आदी उपस्थित होते. कार्यक्रमासाठी पोस्टमास्तर भिला भामरे, गौरव पगार, अनिल भामरे, गणेश भामरे आदींनी सहकार्य केले. सूत्रसंचालन मोठाभाऊ  पगार यांनी केले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व नाशिक बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Entire village account holder of the indian post payments bank abn

ताज्या बातम्या