डॉ. प्रताप दिघावकर यांचा इशारा

नाशिक : शेतकरी शेतात काबाडकष्ट करून द्राक्ष, डाळिंब, केळीसह तत्सम कृषिमाल पिकवतो. व्यापारी बनावट धनादेश देऊन संबंधितांचा माल घेऊन पलायन करतात. कष्टाचे पैसे बळीराजाला न मिळाल्यास तो १० वर्षे मागे जाईल. यामुळे परिक्षेत्रात शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल केले जातील, असा इशारा नाशिक परिक्षेत्राचे नवनियुक्त विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. प्रताप दिघावकर यांनी दिला. शेतकऱ्यांची फसवणूक थांबविणे आणि सोनसाखळी चोरीच्या घटना रोखण्यासाठी विशेष गस्त सुरू करण्यास प्राधान्य दिले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

मूळचे बागलाणचे भूमिपुत्र असणाऱ्या डॉ. दिघावकर यांनी बुधवारी विशेष पोलीस महानिरीक्षकपदाचा पदभार स्वीकारला. या वेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी कृषिमाल विक्री व्यवहारात शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूक थांबविण्यावर लक्ष केंद्रित केले जाणार असल्याचे मांडले.

व्यापारी कृषिमाल खरेदी करताना धनादेश देऊन अंतर्धान पावतात. धनादेश वटत नाही. व्यापारी गायब झालेला असतो. नाशिकमध्ये द्राक्ष, डाळिंब आणि जळगावमध्ये केळी खरेदीत फसवणुकीचे असे प्रकार वारंवार घडतात. शेतकऱ्यांनी पोलिसांकडे दाद मागितल्यास संबंधितास १३८ अन्वये न्यायालयात दावा दाखल करण्याचा सल्ला दिला जातो. परिक्षेत्रात व्यापाऱ्यांकडून फसवणूक झालेले असे किती अर्ज आले आहेत, याची माहिती मागविण्यात आल्याचे दिघावकर यांनी सांगितले. तक्रार अर्जानुसार व्यापाऱ्यास शेतकऱ्यांची रक्कम देण्यासाठी आठ दिवसांची मुदत दिली जाईल. त्या काळात पूर्तता न झाल्यास संबंधितावर थेट गुन्हा दाखल केला जाईल, असे त्यांनी सूचित केले. बागलाणमधील द्राक्ष उत्पादकांची परराज्यातील व्यापाऱ्यांकडून काही दिवसांपूर्वी फसवणूक झाली होती. त्यांची आठ कोटींची रक्कम आपण मिळवून दिल्याचा दाखला त्यांनी दिला.

परिक्षेत्रात काही पोलीस ठाण्यांच्या रस्त्यावरील गुन्ह्य़ांची संख्या अधिक आहे. यात महामार्गावर लूटमार, सोनसाखळी चोरीचा समावेश आहे. यावर नियंत्रण मिळवण्यासाठी विशेष गस्तीचे नियोजन केले जाईल. करोनाकाळात गुन्ह्य़ांचे प्रमाण कमी झाले. कायदा, सुव्यवस्था अबाधित राखणे सुसह्य़ झाले. निर्बंध शिथिल होत असताना नियमांचे तंतोतंत पालन होण्यासाठी पोलीस कार्यरत राहतील. परिक्षेत्रातील आवश्यकता भासेल तिथे खास पोलिसांसाठी करोना रुग्णालय उभारले जाईल. महानिरीक्षक कार्यालयामागील सभागृहात २५ खाटांच्या रुग्णालयासाठी जागा उपलब्ध आहे. गुजरात, मध्य प्रदेश राज्यालगतच्या सीमांवर तपासणी नाक्यांद्वारे लक्ष दिले जाईल. काही गुन्हेगार गुन्हे करून लगतच्या राज्यात पसार होतात. गुन्हेगारांच्या शोधासाठी माहितीचे आदानप्रदान महत्त्वाचे आहे. त्यासाठी त्या राज्यातील पोलिसांशी सीमावर्ती बैठका घेण्याकडे लक्ष दिले जाईल, असे दिघावकर यांनी सांगितले.

थेट संपर्क साधण्याचे आवाहन

शेतकरी, पोलीस कर्मचारी किं वा सामान्य नागरिक कोणीही आपल्या अडचणी, तक्रारींबाबत थेट ९७७३१४९९९९ या आपल्या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा. कार्यालयीन वेळेत कोणी पूर्वपरवानगी न घेताही आपणास प्रत्यक्ष येऊनही भेटू शकतो. कोणाला आपल्यावर अन्याय झाला असे वाटत असेल, स्थानिक पातळीवर दाद मिळत नसेल त्यांनीही संपर्क करावा. नागरिकांच्या अडचणी सोडविण्यासाठी आपण सदैव उपलब्ध असल्याचे डॉ. प्रताप दिघावकर यांनी सांगितले.