सोमवारी ४०३ केंद्रांवर ५२ हजारांहून अधिक व्यक्तिंचे लसीकरण

नाशिक : सलग नऊ महिने वेगवेगळ्या कारणांनी गाजलेल्या आणि बहुतेकांना रांगेत तिष्ठत राहावे लागलेल्या करोना प्रतिबंधक लसीकरणात सोमवारी नाशिकने अर्धशतकाचा (पहिली मात्रा) टप्पा पार केला. जिल्ह्यात लसीकरणास पात्र असणाऱ्या ५२ लाख ४८ हजार ४५४ पैकी २६ लाख ३२ हजार १४६ जणांना (५०.१५ टक्के)पहिली मात्रा मिळाली आहे. तर दोन्ही मात्रा मिळालेल्यांची संख्या नऊ लाख ५४ हजार ८५ (१८.१८ टक्के) इतकी आहे.

करोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर, प्रशासनाने लसीकरणावर भर दिला आहे. या मोहिमेत सोमवारी महत्वाचा टप्पा गाठला गेला. जिल्ह्यात गेल्या १६ जानेवारी रोजी लसीकरणास सुरूवात झाली होती. दररोज एक लाख व्यक्तींच्या लसीकरणाची तयारी करण्यात आली. तथापि अपेक्षित लस पुरवठा होत नसल्याने तो पल्ला मात्र आजवर गाठला गेला नाही. अधिकतम दररोज ५० ते ६० हजार जणांचे लसीकरण शक्य झाले आहे. प्रारंभी, लसीबाबत अनेकांच्या मनात साशंकता होती. कित्येकांनी ती घेण्यास नकार दिल्याची उदाहरणे समोर आली. करोनाच्या दुसऱ्या लाटेने शहर व ग्रामीण भागात हाहाकार उडवला. रुग्णालयात खाटा, प्राणवायू मिळणे अवघड बनले. मृत्यू झालेल्यांची संख्या वाढली. करोनाच्या धसक्याने नंतर लसीकरणात वाढ झाली. जे लस घेण्यास नकार देत होते, ते देखील राजी झाल्याचे पाहायला मिळाले.

कित्येक महिने लसचा तुटवडा होता. पहिली मात्रा घेण्यासाठी देखील अनेकांना वारंवार खेटा माराव्या लागल्या. लसअभावी अधुनमधून लसीकरण बंद ठेवणे भाग पडायचे. लस घेण्यासाठी कित्येक तास रांगेत उभे रहावे लागे. लसीचा पुरवठा वाढल्यानंतर केंद्रांवर उसळणारी गर्दी आता काहीअंशी कमी होत आहे. नऊ महिन्यांच्या कालखंडानंतर पहिली मात्रा मिळालेल्यांची संख्या ५० टक्क्यांहून अधिक झाली. सोमवारी ४०३ केंद्रांवर ५२ हजार ५९३ व्यक्तींचे लसीकरण झाले. त्यात पहिली मात्रा घेणारे ३४  हजार ८३१ व दुसरी मात्रा घेणारे १७ हजार ७६२ व्यक्तींचा समावेश आहे. जिल्ह्यात पहिली मात्रा घेणाऱ्यांचे प्रमाण ५०.१५ टक्के असून दोन्ही मात्रा मिळालेले १८.१८ टक्के व्यक्ती आहेत. जिल्ह्याची लोकसंख्या ७२ लाख ८९ हजार ५२० इतकी आहे. लोकसंख्येच्या तुलनेत पहिली मात्रा घेणारे ३६.११ तर दोन्ही मात्रा मिळालेले १३.०९ टक्के इतकी आहे.

जिल्ह्यात पात्र लोकसंख्येच्या ५० टक्क्यांहून अधिक लोकांना लसीची पहिली मात्रा दिल्याचा टप्पा आज पार पडला. जिल्ह्यातील सर्व आरोग्य विभागातील डॉक्टर व कर्मचारी यांच्या अथक प्रयत्नातून हा टप्पा साध्य झाला आहे. उर्वरित पात्र नागरिकांचे देखील लसीकरण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. नागरिकांनी लसीकरणासाठी पुढे यावे.

गणेश मिसाळ (उपजिल्हाधिकारी)