अस्मानी आणि सुलतानी संकटांनी ग्रासलेल्या कृषी क्षेत्रातील अस्थिरता कमी व्हावी, यासाठी गेल्या काही वर्षांत शेतीपूरक व्यवसाय करण्याकडे अनेकांचा कल वाढत आहे. बदलत्या तंत्रज्ञानाचा शेतकरी प्रामुख्याने उपयोग करत आहेत. टंचाईच्या संकटावर मात करण्यासाठी शेतात बांधलेल्या शेततळ्यांनी शेतक ऱ्यांना मदतीचा हात दिला. शेततळ्यात पूरक व्यवसाय म्हणून ‘मत्स्यशेती’ करण्याचा पायंडा आदिवासीबहुल नंदुरबार जिल्ह्यात पडल्याचे आशादायक चित्र आहे. सद्य:स्थितीत नंदुरबार जिल्ह्यातील एकटय़ा नवापूर तालुक्यात २२ हून अधिक शेततळ्यांत बहुतांश ठिकाणी मत्स्यशेती केली जात आहे.

सातपुडय़ाच्या पर्वतराजीत वसलेल्या नवापूरमध्ये पाणी मुबलक असले तरी उन्हाळ्यात टंचाई जाणवते. यामुळे शेतक ऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला जात. यावर मात करण्यासाठी सरकारी योजनेतून शेततळे ही संकल्पना मांडली गेली. शेतक ऱ्यांनी त्याचा लाभ घेतांना आपल्या शेतात शेततळे केले. त्याच्या पुढे जात त्यामध्ये मत्स्यबीज सोडत मत्स्यशेतीसाठी पाऊल उचलले.

दुर्गम, खडकाळ भागात शेती करताना अडचणींना तोंड द्यावे लागते. अडथळ्यांची शर्यत लक्षात घेऊन शेतक ऱ्यांनी आपल्या शेतातील शेततळ्यात मत्स्यशेती सुरू केली. पण हा प्रवास तेवढा सोपा नव्हता. मत्स्यशेतीतून मिळणारा आर्थिक लाभ महत्त्वाचा असला तरी मत्स्य संगोपन, त्यांचे खाद्य, खाद्य देण्याच्या नियोजित वेळा, पाणी र्निजतुकीकरणासह अन्य तांत्रिक गोष्टींचा अभ्यास महत्त्वपूर्ण ठरला. कृषी विभागाची भूमिका शेततळे खोदण्यापुरती सीमित राहिली. हा विषय कृषी किंवा पशुवैद्यकीय विभाग यांच्या अखत्यारीत येत नसल्याने संबंधितांचे सहकार्य नाही की विरोधही नाही, अशी यंत्रणांची भूमिका. यामुळे शेतक ऱ्यांना कृषी प्रशिक्षण देणाऱ्या खासगी संस्थांवर अवलंबून राहावे लागते.

नंदुरबार आणि नवापूर तालुक्यातील कृषी अधिकाऱ्यांनी शेतक ऱ्यांना मत्स्यशेतीसाठी प्रोत्साहन देत काय करता येईल याविषयी मार्गदर्शन करत क्षेत्र भेटीसाठी उद्युक्त केले. गुजरात येथील सिल्लोड पॅटर्नच्या धर्तीवर या ठिकाणी काम सुरू असल्याचे अक्कलकुवा येथील कृषी अधिकारी बापू गावित यांनी सांगितले. मत्स्यशेती हा शेतक ऱ्यांचा वैयक्तिक निर्णय असल्याने त्यात हस्तक्षेप करण्यास सरकारी यंत्रणेला मर्यादा येतात असे त्यांचे म्हणणे आहे. मात्र शेतकऱ्यांनी गुजरातमधील काही ठिकाणांचा अभ्यास करत चांगल्या पद्धतीने मत्स्यशेती करण्यास सुरुवात केली. स्थानिक शेततळ्यांमध्ये प्रामुख्याने, रोहकोटला, पंकज, मृगल मासे पाळण्यात येतात. यामुळे शेतीव्यतिरिक्त उत्पन्नाची नवीन संधी आदिवासी शेतकऱ्यांना उपलब्ध झाली आहे.

शेतकऱ्यांना काय वाटते?

वैयक्तिक शेतात अथवा सामूहिक शेतीत ४४ बाय ४४ मीटर आकारातील शेततळ्यांमध्ये एप्रिल महिन्याच्या अखेरीस मत्स्यबीज सोडले जातात. यामध्ये तळ्याचा आकार, खोलीचा अंदाज घेऊन तीन थरांत वेगवेगळ्या प्रकारचे मासे सोडले जातात. दिवसातून तीन वेळा मत्स्यखाद्य दिले जाते. आदिवासी पट्टय़ात नैसर्गिकरीत्या घरी तयार केलेल्या खाद्यपदार्थावर भर देण्यात आला आहे. नवापूर तालुक्यातील करंजी येथील सुरेश गावित यांनी याबाबत माहिती दिली. सामूहिक शेतीच्या माध्यमातून शेततळे आणि त्यातून मत्स्यशेती करण्यास सुरुवात केली. सुरुवातीचे वर्ष मत्स्यबीज आणून सोडले. पण नेमके त्या बीजाची वाढ कशी होते हे समजत नसल्याने पहिले सहा महिने त्याकडे दुर्लक्ष झाले. शेततळ्यातील पाणी बदलताना मोठय़ा आकारात तरंगणारे मासे पाहिले आणि आपण योग्य पद्धतीने काम करतोय याची जाणीव झाली. या शेतीबद्दल कोणतेही मार्गदर्शन नव्हते. केवळ ऐकीव माहिती आणि इंटरनेटच्या सहकार्याने काम केले. मत्स्यखाद्य छत्तीसगड, कलकत्ता, बंगळुरू किंवा गुजरात येथून मागविले जाते. साधारणत ३५ ते ४० रुपये किलो दराने महिन्यासाठी अंदाजे ५० किलो खाद्य लागते. मात्र वर्षांचा विचार केला तर सर्व खर्च वजा जाता एक ते दीड लाख रुपयांचे आर्थिक उत्पन्न मिळते. कॉमन कार्फ, पेंगासी, रघुकोटला शेततळ्यात सोडले. माशांनाही भाताचा तूस, सोया वापरून खाद्य देत असल्याचे गावित यांनी सांगितले. जयसिंग गावित हे तीन वर्षांपासून मत्स्यशेती करत आहेत. उपसरपंच आर. जी. मावची यांनी शेतकऱ्यांचा कल मत्स्यशेतीकडे वाढत असला तरी त्यांना योग्य मार्गदर्शन मिळत नसल्याची तक्रार केली. याबाबत वेळोवेळी कृषी मेळावे होण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

शेततळ्यातील पाण्याचा खत म्हणून वापर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शेततळ्यात मत्स्यशेतीमुळे मुबलक स्वरूपात मासे राहतात. या माशांची विष्ठा, पाण्यात तरंगणारे परजीवी कीटक, माशांना देण्यात येणारे खाद्य, तसेच पाणी जमा राहिल्याने तयार होणारे शेवाळे याचा फायदा शेतीसाठी सेंद्रिय खत म्हणून होत आहे. बहुतांश शेतकरी केवळ शेततळ्यातील पाण्याचा वापर करत सेंद्रिय पद्धतीने शेती करत खते किंवा रासायनिक पदार्थाचा वापर करत घेतलेल्या उत्पन्नापेक्षा अधिक उत्पादन घेत आहेत. नंदुरबार जिल्ह्यातील उकाई धरण परिसरात जिल्हाधिकारी व जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या प्रयत्नातून आदिवासी शेतक ऱ्यांसाठी मत्स्यबीज प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. सिल्लूडच्या धर्तीवर येथे मत्स्यशेतीसाठी पूरक अशी मत्स्यबीज निर्मिती होत असून यासाठी धरण परिसरात जाळीचे पिंजरे तयार करण्यात आले आहेत. बीज टाकल्यानंतर विशिष्ट वाढ झाल्यानंतर ते शेतक ऱ्यांना देण्यात येतात. या उपक्रमात सुधारणा करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे.

(सीएसई मीडिया फेलोशिपअंतर्गत केलेला अभ्यास)