महापुरामुळे पंचवटी अमरधाम पूर्णपणे सुने

महापुराच्या तडाख्याने नागरी वसाहती आणि बाजारपेठांना जसा फटका बसला, तसाच तो शहरातील अमरधामलाही बसला. सरणासाठी लागणारी सामग्री पाण्यात वाहून गेली. विद्युतदाहिनीतही बिघाड झाला. यामुळे बुधवारी पार्थिव घेऊन आलेल्या नातेवाईकांना अंतिम संस्कारासाठी इतरत्र भटकंती करावी लागली. अमरधाममध्ये काम करणाऱ्या सुनीता पाटील यांचे घर व दुकानाचे मोठे नुकसान झाले. एका झटक्यात सर्व होत्याचे नव्हते होऊनही संबंधितांची पालिकेने दखल घेतली नाही.

मंगळवारच्या अतिवृष्टीत शहर परिसरातील सर्वच स्मशानभूमी पाण्याखाली गेल्यामुळे सरणासाठी आवश्यक साधनसामुग्री एक तर वाहून गेली अन्यथा काही ठिकाणी ती भिजली होती. त्याचा विपरीत परिणाम बुधवारी अमरधामच्या दैनंदिन कामावर झाला.

शहरात पंचवटी, सिडको, सातपूर, नाशिक रोड, अमरधाम, आनंदवली, मोरवाडी या ठिकाणी १० अमरधाम आहेत. त्यातील काही परिसर पाण्याखाली गेला होता. स्मशानभूमीच्या आवारात असलेली मोठी लाकडे पाण्यात भिजली. काठालगतच्या अमरधाम परिसरातून लाकडे गोदापात्रात वाहून गेली. गवऱ्या, मुखाग्नी देतांना लागणारे साहित्य पुरात वाहून गेले. त्यात सर्वाधिक नुकसान झाले ते अमरधाम  परिसराचे. पंचवटी अमरधाममधील कर्मचारी सुनिता पाटील यांचे घर आणि स्मशानात लागणारे साहित्याचे दुकान जमीनदोस्त झाले. एका झटक्यात त्याचे सर्व होत्याचे नव्हते झाले. अमरधाममधील कर्मचाऱ्यांवर बिकट स्थिती ओढावूनही त्याची कोणी दखल घेतली नाही. वास्तविक अमरधाममध्ये हे काम करणाऱ्या पाटील या पहिल्याच महिल्या. त्यांच्या या कामाची दखल घेऊन त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.

बुधवारी सकाळी या ठिकाणी दोन कुटुंबीय पार्थिव घेऊन आले. मात्र गवऱ्यांसह घासलेट, लाकडे अन्य सामान पुरात वाहून गेल्यामुळे त्यांना म्हसरूळच्या अमरधाममध्ये जाण्यास सांगावे लागले. पंचवटी अमरधाममध्ये विद्युत वाहिनीची व्यवस्था आहे. मात्र त्यातही पाणी शिरल्याने तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे ती देखील बंद होती. वाहिनी दुरुस्त करण्याचे कामही बुधवारी सायंकाळपर्यंत सुरू झाले नव्हते.

लाकडे पाण्यात भिजल्यामुळे या कामात अडचणी आल्या. एकीकडे पावसाची रिपरिप तर दुसरीकडे ओली लाकडे, अन्य साधनसाम्रगीचा अभाव यामुळे पार्थिव घेऊन आलेल्या कुटुंबांना शोकाकुल वातावरणात या स्थितीला तोंड द्यावे लागले. या संदर्भात महापालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ. विजय डेकाटे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी आरोग्य विभाग सकाळपासूनच या सर्व ठिकाणी भेट देत असून आवश्यक ते सहकार्य करण्याची व्यवस्था केली जात असल्याचे सांगितले.