हिरवळीवरील कलात्मक दिवे, महालाच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या दगडी कुंडय़ा आणि त्यातील ‘बोन्साय’ची झाडे, अस्सल सागवानी फर्निचर, महागडी पेंटिंग्ज, कलाकुसरीच्या वस्तू.. भुजबळ फार्मवरील अशा असंख्य दुर्मीळ व महागडय़ा वस्तूंचे मूल्यांकन कसे करणार, हा प्रश्न लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला भेडसावत आहे. या विभागाने सार्वजनिक बांधकाम विभागातील अभियंत्यांच्या मदतीने सोमवारी फार्मवरील ऐश्वर्यसंपन्नतेची मोजदाद सुरू केली असून हे काम लवकर संपुष्टात येईल, अशी स्थिती नाही.

गैरव्यवहाराच्या आरोपावरून कारागृहात असणारे राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्याविरुद्ध बेहिशेबी मालमत्ता जमविल्याच्या संशयावरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागानेही स्वतंत्र गुन्हा दाखल केला आहे. त्या अनुषंगाने भुजबळ यांच्या मालकीच्या मालमत्तेच्या मूल्यांकनाचे काम सुरू करण्यात आले. भुजबळांचे हे अधिकृत निवासस्थानही जप्त होण्याच्या मार्गावर असल्याची चर्चा कर्णोपकर्णी पसरली.  बंगले, राजमहाल, तसेच त्यातील साधनसामग्रीची गणना करून मूल्यांकन केले जाणार असल्याची माहिती मुंबईच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे साहाय्यक पोलीस आयुक्त ज्ञानेश्वर आवारी यांनी दिली.

भलीमोठी संरक्षक भिंत आणि त्यालगत उंच झाडांनी वेढलेल्या परिसरात ३० हजार चौरस फूट आकाराचा हा महाल फारसा कोणाच्या दृष्टीस पडत नाही. महालात २५ खोल्या असून जलतरण तलाव, टेनिस मैदान, विस्तीर्ण हिरवळ असा आधुनिकतेचाही स्पर्श झाला आहे. भुजबळांचे निवासस्थान व बाहेरील मोकळ्या जागेत मौल्यवान वस्तूंची रेलचेल पथकास पाहावयास मिळाली.  इतक्या मोठय़ा संख्येने असलेल्या वस्तूंची मोजदाद करण्यास बराच कालावधी लागणार आहे. त्यातही दुर्मीळ वस्तूंचे मूल्यांकन करण्यासाठी आवश्यकता भासल्यास इतर तज्ज्ञांची मदत घेणे भाग पडणार असल्याचे चित्र आहे.