नवीन वर्षांत वेगवेगळ्या भागांत कार्यक्रमाचे नियोजन

नाशिकचे सांस्कृतिक वैभव असलेले महाकवी कालिदास कला मंदिर सध्या नूतनीकरणामुळे बंद आहे. यामुळे रंगकर्मीना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. दुसरीकडे, नाटय़ परिषदेचे काही कार्यक्रमही यामुळे रखडले आहेत. नाटय़ अभिवाचनाचा कार्यक्रम यातील एक. नूतनीकरणामुळे तीन महिन्यांपासून नाटय़ अभिवाचनाचा कार्यक्रम बंद आहे. नव्या वर्षांत अशा अडचणी भेडसावू नये यासाठी नाटय़ परिषद शहरातील वेगवेगळ्या भागांत नाटय़ अभिवाचनाचा कार्यक्रम घेणार असून त्यादृष्टीने नियोजन सुरू आहे.

अखिल भारतीय मराठी नाटय़ परिषद नाशिक शाखा नवोदित रंगकर्मीना हक्काचे व्यासपीठ मिळावे, यासाठी विविध उपक्रम राबवत असते. याअंतर्गत ‘नाटय़ अभिवाचन’ ही संकल्पना पुढे आली. मागील तीन वर्षांपासून नवे जुने रंगकर्मी एकत्र येत आपली एखादी संहिता, नाटकाचे अभिवाचन करतात. प्रत्येक महिन्यातील एखाद्या दिवशी लेखक व अन्य कलावंतांच्या उपस्थितीत अभिवाचनाचा कार्यक्रम रंगतो. यासाठी नाटय़ परिषदेचे सभागृह रंगकर्मीना खुले आहे. केवळ आवाजातील आरोह अवरोह, संवाद फेकीतून ते नाटक उपस्थितांसमोर आकारास येते. यामध्ये दिग्गज मंडळींच्या संहितेचे जसे वाचन होते तसे नवोदित लेखकांच्या संहितेला या ठिकाणी स्थान आहे. या उपक्रमास प्रतिसाद लाभल्यामुळे तीन वर्षांत सात नाटके रंगमंचावर आली आहेत. त्यात राजेश शर्मा यांची दोन नाटके आहेत, मानसी देशमुख यांचे ‘सिंगल’ हे नाटक आहे. नुकत्याच झालेल्या राज्य नाटय़, कामगार कल्याण नाटय़ स्पर्धेत ही नाटके सादर झाली.

अभिवाचनात येणाऱ्या सर्व नाटकाच्या संहिता नाटय़ परिषद नाशिक शाखेच्या संहिता कोशात जमा होतात. यामुळे हौशी रंगकर्मीना हक्काची संहिता मिळते, तसेच लेखकांची संहिता योग्य हातात जाते. मात्र या उपक्रमाला कालिदासच्या नूतनीकरणामुळे खीळ बसली आहे. नाटय़ परिषद शाखेचे सभागृह नूतनीकरणात येत असल्याने अभिवाचन कोठे घ्यावे, हा प्रश्न आहे. तीन महिन्यांपासून हा प्रश्न भेडसावत आहे. यासाठी शहरातील अन्य काही संस्थांशी नाटय़ परिषद शाखेने संपर्क साधला. मात्र त्यासाठी येणारा पाच ते सहा हजारांचा खर्च पाहता त्यात दुसरा एखादा उपक्रम घेता येईल, असा विचार प्रवाह कार्यकारिणीत आहे. हा कार्यक्रम खुला असल्याने लेखक, अन्य मंडळीकडूनही मानधन घेता येत नसल्याने हा खर्च कोणी करावा, हा प्रश्न अनुत्तरित राहिल्याने तूर्तास नाशिक शाखेने अभिवाचनाचा कार्यक्रम स्थगित ठेवला आहे.

नवीन वर्षांत परीघ विस्तारणार

भविष्यात अशी अडचण पुन्हा उद्भवू नये याकरिता नाटय़ परिषद शाखेने आपले कार्यालय सोडून सिडको, इंदिरानगर, पंचवटी, सातपूर, नाशिकरोड या परिसरात विस्तार करण्याचे ठरविले आहे. त्या अनुषंगाने शहरातील अन्य ठिकाणी नाटय़ अभिवाचनाचा कार्यक्रम होणार आहे. स्थानिक लोकांनाही या कार्यक्रमाचा आस्वाद घेता यावा, तसेच परिषदेचा परीघ विस्तारावा ही अपेक्षा आहे.

रवींद्र कदम  (अध्यक्ष, नाटय़ परिषद, नाशिक शाखा)