केबीसी घोटाळा प्रकरण
केबीसीच्या भ्रामक साखळी योजनांद्वारे राज्यातील गुंतवणूकदारांची शेकडो कोटींची फसवणूक करणारा मुख्य सूत्रधार भाऊसाहेब चव्हाण आणि त्याची पत्नी आरती या दोघांची न्यायालयाने सात दिवसांसाठी पोलीस कोठडीत रवानगी केली. मुख्य संशयित ताब्यात आल्यामुळे या प्रकरणाची पाळेमुळे बाहेर येण्यास मदत होणार आहे. तपास यंत्रणेने केबीसीच्या संचालकांची ८० कोटींची स्थावर मालमत्ता व बँक खात्यातील रक्कम आधीच जप्त केली आहे. सिंगापूरमध्ये भाऊसाहेबने मालमत्ता खरेदी केली आहे का, केबीसीच्या दलालांना दिल्या गेलेल्या महागडय़ा भेटवस्तू याची छाननी तपास यंत्रणा करणार आहे.
संपूर्ण राज्यात खळबळ उडवून देणाऱ्या केबीसीविरोधात आठ हजार गुंतवणूकदारांनी तक्रारी दिल्या असून संबंधितांची फसवणूक झालेली रक्कम २१० कोटींच्या घरात आहे. भाऊसाहेबने नातेवाईक व दलालांच्या मदतीने भ्रामक योजना मांडून सर्वसामान्यांना आपल्या जाळ्यात ओढले. जवळपास दोन वर्षे सिंगापूरमध्ये फरार झालेला भाऊसाहेब पत्नीसह भारतात येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर नाशिक पोलिसांनी मुंबई विमानतळावर त्यांना अटक केली होती. या दोघांना शनिवारी येथील न्यायालयात हजर करण्यात आले. या वेळी सरकारी पक्षाने भाऊसाहेब हाच संपूर्ण घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार असल्याचे सांगितले. त्याने सिंगापूरमध्ये काही मालमत्ता खरेदी केली असण्याची शक्यता आहे. याशिवाय, केबीसीने पैसा जमा करण्यासाठी दलालांना अतिशय महागडय़ा भेटवस्तू दिल्या होत्या. त्यात आकर्षक टक्केवारी, लॅपटॉप, एक लाखाचे दागिने, परदेश प्रवास, ७५६ ग्राहक मिळविल्यास ५० हजार रुपये महिना वेतन, अडीच हजार ग्राहक केल्यास आलिशान मोटार आदींचा समावेश होता. याची चौकशी करून त्या किमती भेटी जप्त करण्याची कारवाई तपास यंत्रणेला करावयाची आहे.
उपरोक्त तपासासाठी संशयितांना १४ दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली; परंतु चव्हाणच्या वकिलाने त्यास विरोध दर्शविला. सिंगापूरमधील मालमत्तेची माहिती तपास यंत्रणा तेथील सरकारकडून मिळवू शकते. त्यासाठी पोलीस कोठडीची गरज नसल्याचे त्यांचे म्हणणे होते; तथापि न्यायालयाने या घोटाळ्याची व्याप्ती मोठी असल्याचे नमूद करत दोघांना १३ मेपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे निर्देश दिले.