अशोका बिल्डकॉनकडून मिळालेल्या कोटय़वधीच्या लाचेतून भुजबळ फार्म परिसरात आलिशान राजमहालाची उभारणी झाल्याचा आरोप करत भाजपचे खा. किरीट सोमय्या यांनी स्वत: त्या परिसरात जाऊन उपरोक्त परिसराचे दूरदर्शन घेतले. यावेळी काही गोंधळ उडू नये म्हणून पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त तैनात केला होता. महामार्गावरून पायी चालत आलेल्या सोमय्या यांनी भुजबळ फार्म या खासगी मालमत्तेत प्रवेश केला नाही. त्यांना पोलिसांनी अटकाव केल्याचे सांगण्यात आले. सोमय्या थेट फार्म परिसरात धडकल्याने आजवर फारशा कोणाच्या दृष्टिपथास न पडलेल्या भुजबळ महालाची नव्याने चर्चा सुरू झाली आहे.
केबीसीएल आणि मैत्रेय ग्रुपच्या कंपन्यांनी गुंतवणूकदारांच्या केलेल्या फसवणुकीच्या तपासाची माहिती घेण्यासाठी शुक्रवारी सोमय्या नाशिकमध्ये दाखल झाले. सकाळी त्यांनी पोलीस आयुक्त एस. जगन्नाथन यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली.
त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी सक्तवसुली संचालनालय आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभाग या तपास यंत्रणांनी भुजबळांच्या महालाची १०० कोटी रुपये किंमत गृहीत धरल्याचे नमूद केले.
सार्वजनिक बांधकाम विभागाची धुरा सांभाळत असताना भुजबळांनी अशोका बिल्डकॉन या कंपनीला नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गाच्या विस्तारीकरणासह राज्यातील अनेक रस्त्यांची कामे मिळवून दिल्याचा आरोप सोमय्या यांनी केला. रस्त्याची कामे मिळविणाऱ्या या ठेकेदाराने भुजबळ फाऊंडेशनला कोटय़वधी रुपये दिले.
त्यातील ४० कोटींच्या बँक खात्यातील दस्तावेज मिळाले असून भ्रष्टाचारातून मिळालेल्या पैशांवर या राजमहालाचे बांधकाम झाल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. लोणावळा येथे भुजबळ कुटुंबीयांच्या बंगल्यात हेलिपॅड बांधण्यात आले. त्या ठिकाणी गरम आणि गार पाण्याचे स्वतंत्र जलतरण तलाव आहेत. भुजबळ कुटुंबीय हेलिकॉप्टरने त्या बंगल्यात जात होते. अशोका बिल्डकॉनने नाशिक येथे राजमहाल भुजबळांना बांधून दिला.
त्या मोबदल्यात रस्त्याचे व टोल वसुलीची कामे मिळविली. अशोका बिल्डकॉन या कंपनीच्या व्यवहारांची चौकशी करून संबंधित संचालकांवर कारवाई करावी, अशी मागणी पत्राद्वारे लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, सक्तवसुली संचालनालय, कंपनी मंत्रालय आदींकडे करण्यात आली आहे.
जनतेच्या पैशातून साकारलेल्या भुजबळांचा राजमहाल दाखविण्यासाठी आपण आलो असल्याचे सांगत सोमय्या हे मोटारीने भुजबळ फार्मकडे रवाना झाले. सव्‍‌र्हिस रस्त्यावर मोटार उभी करून ते काही अंतर पायी चालत गेले. सोमय्या या ठिकाणी भेट देणार असल्याने कोणताही गोंधळ होऊ नये म्हणून यंत्रणेने कडेकोट बंदोबस्त आणि लोखंडी जाळ्यांचे अडथळे उभारले होते.
फार्मच्या फलकाजवळून सोमय्या यांनी परिसराचे दर्शन घेतले. खासगी जागेत प्रवेश करणे उचित नसल्याचे काहींनी त्यांच्या निदर्शनास आणून दिले. पोलिसांनी या मुद्यावर आतमध्ये जाण्यास त्यांना आक्षेप घेतल्याचे सांगितले जाते. यामुळे सोमय्या यांनी पुन्हा माघारी परतले.

कसा आहे भुजबळ महाल
जुन्या काळातील राजेशाही महालाशी साधम्र्य साधणाऱ्या भुजबळ फार्ममधील राजमहालात प्राचीन आणि आधुनिक बांधकाम शैलीची ‘समता’ साधण्यात आली आहे. भुजबळ कुटुंबीयांशी संबंधित अगदी मोजक्याच व्यक्तींनी या वास्तूचे दर्शन घेतले आहे. परंतु, ज्यांनी प्रत्यक्षात ही वास्तू पाहिली, त्यांची प्रतिक्रियादेखील नाशिकमध्ये या स्वरुपाची अलिशान वास्तू पाहिली नसल्याची आहे. भुजबळ कुटुंबीयांची शहराच्या मध्यवस्तीत मुंबई-आग्रा महामार्गालगत सिडकोजवळ बरीच मोठी जागा आहे. हा परिसर भुजबळ फार्म म्हणून ओळखला जातो. या संपूर्ण परिसर सात ते आठ फूट उंचीची संरक्षक भिंत आणि त्यालगत उंच उंच झाडांनी वेढलेला असल्याने बाहेरून हा राजमहाल दृष्टिस पडत नाही. आवारातील चंद्राई या जुन्या बंगल्याच्या मागील बाजूस बांधलेली ही वास्तू पाहणाऱ्यांच्या डोळ्यांचे पारणे फेडणारी असल्याचे सांगितले जाते. जवळपास दोन वर्षे तिचे काम सुरू होते. सुमारे ३० हजार चौरस फूट आकाराच्या दुमजली वास्तूचे बांधकाम पुरातन काळातील महालाची प्रचिती देणारे आहे. त्यास जलतरण तलाव, टेनिस मैदान, विस्तीर्ण हिरवळ असा आधुनिक स्पर्शही देण्यात आला आहे. वास्तूत प्रवेश करणाऱ्यांना राजस्थानी वाडय़ात प्रवेश करत असल्याची अनुभूती मिळते. तळ मजल्यावर होम थिएटर, सभागृह, स्वयंपाक गृह, देवघर, तुळशी वृंदावन असा अनोखा संगम साधला गेला आहे. आतमध्ये हिरवळ असून हा भाग छताविना ठेवण्यात आल्याने सूर्यप्रकाश हिरवळीला मिळतो. दुसऱ्या मजल्यावर १० ते १५ विस्तीर्ण शयनकक्षांची व्यवस्था करण्यात आली आहे. उच्च दर्जाचे फर्निचर, विविध कलाकृतीच्या इटालियन मार्बलने सजलेले फ्लोअरिंग आणि डोईवर कौलारू छताचा ताज वास्तूच्या श्रीमंतीत भर टाकते.

‘फिफा’साठी खास विमान
अशोका बिल्डकॉन आणि भुजबळ यांचे घनिष्ठ संबंध किरीट सोमय्या यांनी उघड केले. अशोका बिल्डकॉनचे अशोक कटारिया आणि आशीष कटारिया यांनी भुजबळ कुटुंबीयांना ‘फिफा’चे फुटबॉल सामने दाखविण्यासाठी खास विमानाने परदेशात नेले होते. संबंधितांचे कारनामे जनतेसमोर उघड होणे गरजेचे आहे. अशोका बिल्डकॉन व कटारियांची चौकशी करावी, अशी मागणी संबंधित यंत्रणांकडे करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.