नाशिक : कोणी झाडाच्या सावलीत, तर कोणी तात्पुरत्या तंबूत. कोणी चहा, खाद्यपदार्थाच्या टपरीच्या छताखाली, अशी अनेकांना सावली शोधावी लागली. काहींना रणरणत्या उन्हात उभे राहण्याची वेळ आली. त्यांच्यासाठी मग नव्याने काही तंबू ठोकले गेले. तापमानाचा पारा ४० अंशाच्या जवळपास पोहचला असताना पोलीस अधिकारी-जवानांनी उन्हातान्हाची पर्वा न करता मतमोजणी केंद्राची सुरक्षा आणि अनुचित प्रकार घडू नये म्हणून सज्जता राखत कर्तव्य बजावले.

नाशिक, दिंडोरी लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी गुरुवारी अंबड औद्योगिक वसाहतीतील वखार महामंडळाच्या गोदामात पार पडली. मतदान यंत्र आणि केंद्राच्या सुरक्षिततेसाठी त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्था करण्यात आली होती. त्याची जबाबदारी केंद्रीय, राज्य राखीव दलासह स्थानिक पोलीस यंत्रणेकडे होती. मतमोजणीच्या ठिकाणी अर्थात अंतर्गत भागाची जबाबदारी केंद्रीय पोलीस दलाकडे होती. केंद्राचे प्रवेशद्वार आणि आसपासच्या परिसराची जबाबदारी स्थानिक पोलीस यंत्रणेकडे होती. निकालाच्या दिवशी केंद्र परिसरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस आयुक्तालयाने ३०० अधिकारी-कर्मचारी तैनात केले होते. मतमोजणीच्या दिवशी राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांच्या उत्साहाला लगाम घालण्यासाठी केंद्राकडे येणारे रस्ते ठरावीक अंतरावर बंद ठेवले होते.

मतमोजणी केंद्राच्या सभोवताली १०० मीटरच्या परिघात कोणतेही वाहन उभे करण्यास प्रतिबंध करण्यात आला होता. केंद्राचे प्रवेशद्वार आणि बाहेरील भागात स्थानिक पोलीस अधिकारी-कर्मचारी तैनात होते. मतमोजणी केंद्रात निवडणूक आयोगाचे ओळखपत्र असणाऱ्यांना केवळ प्रवेश देण्यात येत होता. रात्रीपासून पोलीस अधिकारी-कर्मचारी परिसरात तैनात झाले होते. मतमोजणीच्या दिवशी त्यांना रणरणत्या उन्हाला तोंड द्यावे लागले. बंद करण्यात आलेल्या रस्त्यांसह केंद्राच्या परिसरात वेगवेगळ्या भागात पोलीस तैनात होते. उन्हापासून संरक्षणासाठी काही ठिकाणी तात्पुरत्या तंबूंची व्यवस्था केली गेली होती. बंदोबस्तासाठी रस्त्यात थांबलेल्यांकरिता तशी व्यवस्था नव्हती. यामुळे दुपापर्यंत संबंधितांना उन्हात उभे राहावे लागले. तापलेल्या वातावरणाची झळ लक्षात आल्यावर अखेर तात्पुरते तंबू उभारले गेले. इतरत्र असणाऱ्या कर्मचाऱ्यांना झाडाची सावली किंवा आसपासच्या चहा-खाद्यपदार्थाच्या टपरीच्या छताचा आधार घ्यावा लागला.