गेल्या काही निवडणुकांमध्ये पक्षाची झालेली वाताहत आणि संघटनेची विस्कटलेली घडी सावरण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे सध्या राज्यभरातील कार्यकर्त्यांची भेट घेत आहेत. त्यासाठी गुरूवारी रात्री राज ठाकरे नाशिकमध्ये दाखल झाले. यावेळी राज ठाकरे यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांशी जमिनीवर बसून संवाद साधला. ‘राज ठाकरे पक्ष बांधणीसाठी वेळ देत नाहीत’, ‘अनेक महिने कार्यकर्त्यांना भेटत नाहीत’, असे टोले अनेकदा विरोधक राज यांना लगावतात. मात्र, नाशिकमध्ये राज यांचे संपूर्णपणे वेगळे रूप पाहायला मिळाले. एरवी मोजक्या नेत्यांच्या गराड्यात असलेल्या राज यांनी जमिनीवर बसून कार्यकर्त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि त्यांच्याशी सविस्तर चर्चाही केली.

राज्यात नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकांमध्ये मनसेला पराभवाचा सामना करावा लागला होता. दरम्यानच्या काळात अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पक्षाला रामराम ठोकला होता. अलीकडेच मुंबईतील सहा नगरसेवकांनीही मनसेला ‘जय महाराष्ट्र’ केला होता. त्यामुळे मनसेपुढे अस्तित्त्व कायम राखण्याचे संकट उभे राहिले आहे. या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर पक्षातील नाराजी दूर करण्यासाठी आणि पक्षाला आलेली मरगळ झटकून पक्षाला नवी उभारी देण्यासाठी राज यांनी ‘नवनिर्माण’ हाती घेतले आहे.

कधीकाळी मनसेचा बालेकिल्ला राहिलेल्या नाशिकमधून या कार्याला गती मिळणार आहे. यावेळी होणाऱ्या मेळाव्यात पक्षाची नेमकी भूमिका राज यांच्याकडून होणार असून येथे मनसेला संजीवनी देण्यासाठी ‘राज’मंत्राची अपेक्षा कार्यकत्यांकडून व्यक्त केली जात आहे. नाशिकमध्ये गेल्या पाच वर्षांत पक्षाने महापालिकेची सत्ताही प्राप्त केली होती. त्या काळात राज यांच्या संकल्पनेतून अनेक प्रकल्पांची संकल्पना मांडण्यात आली. त्यातील काही पूर्णत्वास आले तर काहींना मंजुरी देण्यात आली होती. दरम्यानच्या काळात महापालिकेत सत्तांतर झाले. भाजपने एकहाती सत्ता मिळवली. लगोलग नाशिक महापालिकेचा स्मार्ट सिटी योजनेत समावेश झाला. या योजनेंतर्गत शहराला स्मार्ट करण्यासाठी नावीण्यपूर्ण प्रकल्प साकारण्याचे नियोजन आहे. यासाठी स्थापित प्राधिकरणाने मनसेच्या कार्यकाळात मांडलेल्या संकल्पनांचा प्रामुख्याने अंतर्भाव केला आहे. हा मुद्दा राज ठाकरे यांच्या दौऱ्यात कळीचा ठरणार आहे.