लक्ष्मीपूजनच्या दिवशी शहरात फटाक्यांची आतषबाजी सुरू असताना वावरे लेन या अतिशय दाटीवाटीच्या भागातील इमारतीतील सदनिकेतील गच्चीत फटाक्याने आग लागली. अग्निशमन दलाने तातडीने धाव घेऊन आग विझवल्याने जिवित वा वित्तहानी झाली नाही. शालिमारलगतच्या वावरे लेन परिसरात आशियाना इमारत आहे. दुसऱ्या मजल्यावरील सदनिकेच्या गच्चीत सोमवारी रात्री ११ वाजता पेटते फटाके येऊन पडले. त्यामुळे गच्चीतील कपड्यांनी पेट घेतला.

याबाबतची माहिती सुशांत नहार यांच्याकडून मिळाल्यानंतर अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. काही वेळात आगीवर नियंत्रण मिळविल्याने अनर्थ टळला. वावरे लेन हा अतिशय गजबजला व्यापारी आणि रहिवासी परिसर आहे. गावठाण भागातील घरे-इमारती परस्परांना खेटून असल्याने तिथे अशा घटनांवेळी धोका अधिक असतो. सुदैवाने आगीवर लगेच नियंत्रण मिळवल्याने जिवित वा वित्तहानी झाली नाही. दिवाळीच्या मागील दोन दिवसात ही घटना वगळता फटाक्यांमुळे आग लागण्याची घटना घडलेली नाही, असे अग्निशमन दलाकडून सांगण्यात आले.