भाजप-मनसेत कुरघोडीचा प्रयत्न

नाशिकच्या सांस्कृतिक क्षेत्राचा मानबिंदू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाकवी कालिदास कला मंदिराच्या लोकार्पण सोहळ्यास राजकीय श्रेयवादाची किनार लाभली.

मनसेच्या कार्यकाळात कलामंदिराच्या नूतनीकरणाची मांडलेली संकल्पना भाजपने नंतर स्मार्ट सिटी योजनेंतर्गत समाविष्ट करत पूर्णत्वास नेली. असे असताना भाजपला एकटय़ाला श्रेय लाटायचे असल्याने उद्घाटन सोहळ्यात राज ठाकरे यांना निमंत्रित करण्याचे औदार्य दाखविले नसल्याचा आक्षेप घेत मनसे पदाधिकाऱ्यांनी कार्यक्रमस्थळी गांधीगिरीच्या मार्गाने आंदोलन केले. सोहळ्यास आलेल्यांना गुलाबपुष्प देऊन नाराजी व्यक्त केली. दुसरीकडे पालिकेची सत्ता मिळाल्यावर महत्वाचा प्रकल्प पूर्णत्वास गेल्याचे श्रेय घेण्याचा भाजपने पुरेपूर प्रयत्न केला.

स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून महाकवी कालिदास कलामंदिर आणि महात्मा फुले कलादालन यांचे लोकार्पण पालकमंत्री महाजन यांच्या हस्ते पार पडले. यावेळी महापौर रंजना भानसी, आमदार देवयानी फरांदे, बाळासाहेब सानप, सीमा हिरे, अखिल भारतील नाटय़ परिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी, नाटय़ संमेलनाच्या अध्यक्षा कीर्ती शिलेदार, आयुक्त तुकाराम मुंडे, स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश थविल आदी उपस्थित होते.

या कार्यक्रमास राजकीय श्रेयवादाचे स्वरूप प्राप्त झाले. महाजन यांनी कालिदास कलामंदीरची सांस्कृतिक केंद्र म्हणून असणारी ओळख नाटय़, संस्कृती, परंपरा यांच्या रुपाने देशभरात व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. कलामंदिराचे नवे रुप राज्यातील कलाकारांना प्रोत्साहन देईल. पंडित पलुस्कर सभागृहाच्या रूपाने आणखी एक हक्काचे व्यासपीठ कलाकारांना लवकरच उपलब्ध करून देण्यात येईल. कला मंदिरांचे पावित्र्य जपण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले. कांबळी यांनी दीर्घकाळ सुंदर नाटय़गृह टिकून राहण्यासाठी प्रत्येकाने वैयक्तिक जबाबदारी स्विकारुन त्याकडे लक्ष द्यायला हवे हे सांगितले. शिलेदार यांनी तांत्रिक बाबतीत कालिदासचे काम कौतुकास्पद असल्याचे मांडले. आयुक्त मुंडे यांनी स्मार्ट सिटी योजनेत देशात प्रथम क्रमांकावर येण्याचा शहराचा प्रयत्न असल्याचे नमूद केले. पर्यटनाला चालना देऊन नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी महानगरपालिका प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले. महापौरांनी लोकार्पण निमित्ताने चार दिवस सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार असल्याचे जाहीर केले.

भाजपकडून दिशाभूल- मनसेचा आरोप

मनसेच्या कार्यकाळात महाकवी कालिदास कला मंदिराच्या नूतनीकरणास मान्यता दिली गेली होती. राज ठाकरे यांना लोकार्पण सोहळ्यास निमंत्रित करावे, त्यांच्या हस्ते लोकार्पण करावे, अशी रंगकर्मीची अपेक्षा होती, असा मनसेचा दावा आहे. श्रेयवादाच्या राजकारणामुळे लोकार्पण सोहळ्यात मनसेला डावलण्यात आल्याचा आरोप पदाधिकाऱ्यांनी केला. भाजपच्या कार्यशैलीविरोधात मनसेच्या कार्यकर्त्यांनी प्रवेशद्वारावर उभे राहून येणाऱ्यांना गुलाबपुष्प देऊन नाराजी व्यक्त केली. भाजपने मनसेच्या सत्ता काळातील विकास कामे हे स्मार्ट सिटीअंतर्गत समाविष्ट केली आहेत. मनसेच्या सत्ताकाळातील कामांचे श्रेय घेऊन भाजप नागरिकांची दिशाभूल करीत असल्याचा आक्षेप मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी नोंदविला. मनसे कामगार सेनेचे प्रदेश चिटणीस अंकुश पवार, नगरसेविका वैशाली भोसले यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.

महाकवी कालिदास कलामंदिर, महात्मा फुले कला दालन लोकार्पण सोहळ्यात पालकमंत्री गिरीश महाजन. समवेत महापौर रंजना भानसी, भाजपचे आमदार आणि इतर