नाशिक – दिंडोरी आणि नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी मतदान होणार आहे. दोन्ही मतदारसंघातील वेगवेगळ्या केंद्रांवर नियुक्त पथकांना रविवारी शहरातील विविध ठिकाणांहून मतदान साहित्य वितरीत करण्यात आले. मतदान साहित्य घेऊन केंद्र गाठलेल्या अनेक जणांना केंद्रांमध्ये गैरसोयींना तोंड द्यावे लागले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नाशिक मध्यसाठी दादासाहेब गायकवाड सभागृह, नाशिक पूर्वसाठी मीनाताई ठाकरे क्रीडा संकुल, नाशिक पश्चिमसाठी छत्रपती संभाजी स्टेडियम आणि देवळाली कॅम्प, भगूरसाठी बांधकाम विभागाचे गोदावरी सभागृह या ठिकाणाहून मतदान कर्मचारी पथकाना साहित्य वितरीत करण्यात आले. सकाळी आठपासून साहित्य वितरणास सुरुवात झाली. संबंधितांसाठी चहा आणि अल्पोहाराची व्यवस्था करण्यात आली होती. दुपारच्या जेवणाची सोय मात्र कर्मचाऱ्यांना स्वत:च करावी लागली. साहित्य घेऊन कर्मचारी शहरातील काही मतदान केंद्रांवर पोहोचल्यावर त्यांना अनेक गैरसोयी असल्याचे दिसून आले. मतदान केंद्रांवर साहित्य ठेवण्यासाठी व्यवस्था नव्हती. इतर आवश्यक सुविधा नसल्याने कर्मचाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. दुपारी उशिरा टेबल, खुर्च्या पोहोचल्यानंतर साहित्य ठेवण्यासाठी व्यवस्था झाली.

हेही वाचा – निवडणुकीमुळे ३१३ गुन्हेगारांविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई, नाशिक शहरात तीन हजार पोलिसांचा बंदोबस्त

जेवणाची व्यवस्था स्वत: करण्याची सूचना

नाशिक आणि दिंडोरी मतदारसंघातील मतदान कर्मचाऱ्यांना सकाळी चहा व पोह्याची व्यवस्था करण्यात आली होती. दुपारच्या जेवणाची व्यवस्था आपली आपण करावी, अशी सूचना मिळाल्याने अनेकांची तारांबळ उडाली. काहींनी पोह्यावर दुपारच्या जेवणाची भूक भागवली. महिला कर्मचाऱ्यांनी दुपारच्या जेवणासाठी डबे आणले होते. ते अन्य सहकाऱ्यांबरोबर वाटून खाल्ले.

हेही वाचा – नाशिक मतदारसंघात ओबीसींची मते महत्त्वाची

मनपा शाळा क्र. १६ केंद्रात सुविधांची वानवा

दादासाहेब गायकवाड सभागृहातून मतदानविषयक साहित्य घेतल्यानंतर कर्मचाऱ्यांचे पथक नाशिक मध्य विभागातील संत गाडगे महाराज महापालिका शाळा क्र. १६ या केंद्रावर पोहोचले. त्या ठिकाणी साहित्य मांडणीसाठी टेबल, खुर्च्या नव्हत्या. साडेअकरापासून तीन वाजेपर्यंत कर्मचाऱ्यांना प्रतिक्षा करावी लागली. प्रशासनाकडून मतदान केंद्राची निवड करताना सर्व्हेक्षण करण्यात येते. मात्र बंद असलेली शाळा निवडून मतदान केंद्रासाठी आवश्यक व्यवस्था करण्यात प्रशासन कमी पडले. काही केंद्रांवर विजेची व्यवस्था नसल्याने भ्रमणध्वनी बंद पडले. उकाड्याने अनेकांना जीव नकोसा झाला.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nashik many inconveniences to employees at polling stations ssb