नाशिक : नाशिक लोकसभा मतदारसंघात मागील तीन निवडणुकांत प्रमुख राजकीय पक्षांच्या मराठा-ओबीसी समाजातील उमेदवारांमध्ये थेट अटीतटीची लढत झाली होती. यावेळी पक्षांनी ओबीसीऐवजी मराठा उमेदवाराला प्राधान्य दिल्यामुळे या जागेवर मराठा-ओबीसी असा थेट संघर्ष टळून उलट ओबीसी समाजाची भूमिका निर्णायक ठरणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महायुतीतील जागा वाटपातील घोळामुळे ओबीसी नेते छगन भुजबळ यांना महिनाभराच्या प्रतीक्षेनंतर उमेदवारीच्या स्पर्धेतून माघार घ्यावी लागली. शिवसेना शिंदे गटाने खासदार हेमंत गोडसे या मराठा समाजातील उमेदवाराला पुन्हा संधी दिली. महाविकास आघाडीचे राजाभाऊ वाजे आणि वंचित बहुजन आघाडीचे करण गायकर हे दोघेही मराठा समाजाचे उमेदवार रिंगणात आहेत. २००९ ते २०१९ दरम्यानच्या तीन निवडणुकीत नाशिकच्या जागेवर मराठा-ओबीसी समाजातील उमेदवारांमध्ये मुख्य लढत झाली होती. एकदा ओबीसी तर, दोन वेळा मराठा समाजातील उमेदवाराने विजय मिळविल्याचा इतिहास आहे. यंदा उमेदवारीच्या स्पर्धेतून भुजबळांना डावलल्याने ओबीसी समाजाची नाराजी यापूर्वीच उघड झाली होती. प्रमुख पक्षांकडून ओबीसी उमेदवार रिंगणात नसल्याने या समाजाची भूमिका निर्णायक ठरणार आहे.

हेही वाचा >>> भाजपला आता रास्वसं नकोसे – प्रकाश आंबेडकर यांची प्रतिक्रिया

नाशिक लोकसभा मतदारसंघात मराठा आणि ओबीसी समाजातील मतदारांमध्ये ५० ते ७० हजारांचा फरक असल्याचा अंदाज आहे. उभयतांमध्ये प्रदीर्घ काळापासून राजकीय वर्चस्वाची स्पर्धा आहे. २००९ च्या लोकसभा निवडणुकीत एकसंध राष्ट्रवादीचे समीर भुजबळ यांनी मनसेचे हेमंत गोडसे यांना पराभूत केले होते. त्यावेळी मनसेचे गोडसे आणि एकसंध शिवसेनेचे दत्ता गायकवाड हे दोन मराठा उमेदवार रिंगणात होते. मतविभागणीमुळे ओबीसी समाजातील उमेदवाराचा विजय सुकर झाल्याचे मानले गेले.

सामाजिक अभ्यासक संदीप डोळस यांनी आरक्षणावरून राज्यात मराठा-ओबीसी वादामुळे निर्माण झालेल्या स्थितीवर बोट ठेवत नाशिक लोकसभेतील जातीय समीकरण मांडले. मतदारसंघात मराठ्यांच्या खालोखाल ओबीसी समाज आहे. रिंगणात प्रमुख उमेदवार मराठा समाजाचे असल्याने मतांचे विभाजन होईल. त्यामुळे ओबीसी मतदारांची भूमिका महत्त्वाची ठरणार असल्याचे त्यांनी लक्षात आणून दिले.

जातीय समीकरण

नाशिक लोकसभा मतदारसंघात २० लाख ३० हजार १२४ मतदार आहेत. यामध्ये सहा लाखाच्या आसपास मराठा तर, साडेपाच लाख ओबीसी मतदार असल्याचा अंदाज आहे. आदिवासी पावणे तीन लाख तर, दलित आणि मुस्लीम समाजातील प्रत्येकी दोन लाख आणि उच्चवर्णीय समाजातील दीड लाखाच्या आसपास मतदार आहेत.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Obc votes are important in nashik constituency zws