महापालिका, शिक्षण मंडळ, स्मार्ट सिटी कंपनीलाही झळ, पालिका शिक्षकांचे वेतन तीन-चार दिवसांत होणार

नाशिक : येस बँकेवर रिझव्‍‌र्ह बँकेने लादलेल्या र्निबधाची सामान्य ग्राहकांप्रमाणे महापालिका, शिक्षण मंडळ, स्मार्ट सिटीसारख्या कंपन्यांना कमी-अधिक प्रमाणात झळ बसली. महापालिकेचे येस बँकेत सुमारे ७० कोटी रुपये अडकले. निर्बंधाची माहिती समजल्यानंतर प्रशासनाने तातडीने पावले उचलत येस बँकेत पैसे जाणार नाही, अशी व्यवस्था केली. शिक्षण मंडळाचे येस बँकेत १५ कोटी रुपये अडकले आहेत. शिक्षकांच्या वेतनाची रक्कम या बँकेतील मंडळाच्या मुख्य खात्यातून संबंधितांच्या खात्यात वर्ग केली जाते. येस बँकेवरील र्निबधामुळे मंडळाने शुक्रवारी तातडीने अन्य बँकेत खाते उघडण्याची तयारी केली. पुढील तीन-चार दिवसांत नव्या बँकेतून शिक्षकांच्या खात्यात वेतन जमा केले जाणार आहे. स्मार्ट सिटी कंपनीची मोठी रक्कम अडकण्यापासून राहिली. येस बँकेतील सुमारे साडेचारशे कोटी रुपये बँकेने वर्षभरात अन्य बँकेत वर्ग केले. सध्या कंपनीचे १४ कोटी रुपये अडकले आहेत.

रिझव्‍‌र्ह बँकेने येस बँकेवर निर्बंध लादल्याचा धक्का सामान्य नागरिकांबरोबर बडय़ा आस्थापनांना वेगवेगळ्या प्रकारे बसला. कर संकलनासाठी महापालिकेने ऑनलाइन आणि ऑफलाइन व्यवस्था केली आहे. त्याअंतर्गत येस बँकेशी करारही करण्यात आला.

महापालिकेची येस बँकेत २२ खाती आहेत. यामध्ये ऑनलाइन कर किंवा इतर भरणाही स्वीकारला जात असे. प्राथमिक अंदाजानुसार पालिकेचे या खात्यांमध्ये ७० कोटी रुपये आहेत.

नव्याने या खात्यांमध्ये ऑनलाइन किंवा ऑफलाइन पैसे जाऊ नये म्हणून या खात्यांची माहिती संकेतस्थळ, माहिती फलकावरून हटविली गेली. शिक्षण मंडळाचे मुख्य खाते येस बँकेत आहे. या खात्यात सुमारे १५ कोटी रुपये आहेत. दर महिन्याला मंडळ ९२५ शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारक यांच्यासाठी साडेपाच कोटी रुपये भरत असते. चार ते पाच तारखेला शिक्षकांचे पगार त्यांच्या एसबीआयमधील बँक खात्यात जमा होतात.

र्निबधामुळे शिक्षकांच्या वेतनाचा मुहूर्त टळला. मंडळ वेतनाचे साडेपाच कोटी रुपये भरणार असताना निर्बंध आले. यामुळे पालिका आयुक्तांच्या मान्यतेने शिक्षण मंडळाचे नवीन खाते स्टेट बँक ऑफ इंडियात उघडण्याची प्रक्रिया हाती घेतली गेली. ही प्रक्रिया पूर्ण करून पुढील तीन ते चार दिवसांत शिक्षकांच्या खात्यात वेतन जमा होईल, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

स्मार्ट सिटी कंपनीचे १४ कोटी

स्मार्ट सिटी कंपनीचे येस बँकेत थोडेथोडके नव्हे, तर तब्बल ४३५ कोटी रुपये होते. केंद्र, राज्य शासनासह महापालिकेकडून विविध प्रकल्पांसाठी मिळालेला हा निधी होता. येस बँकेतील घडामोडींवर नजर ठेवून वर्षभरात ही संपूर्ण रक्कम अन्य बँकेत वर्ग करण्यात आल्याचे कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश थवील यांनी सांगितले. येस बँकेत कंपनीचे कर्मचारी वेतन आणि कार्यालयीन कामकाज, खर्चासाठी लागणारी १४ कोटींची रक्कम अडकली आहे.

पैसे काढण्यासाठी ‘येस’ बँकेसमोर रांगा

नाशिक : खासगी क्षेत्रातील आधुनिक बँक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या येस बँकेवर रिझव्‍‌र्ह बँकेने निर्बंध लादल्याने शुक्रवारी ठेवीदार, खातेदारांच्या जिल्ह्य़ातील जवळपास सर्वच १६ शाखांमध्ये रांगा लागल्याचे पाहायला मिळाले. र्निबधाची माहिती समजल्यापासून अनेकांनी एटीएममधून पैसे काढणे तसेच ऑनलाइन पैसे दुसऱ्या खात्यात वर्ग करण्याचा प्रयत्न केला. परंतु तसे व्यवहार झाले नाहीत. केवळ बँक शाखांमधून ग्राहकांना अधिकतम ५० हजार रुपये रोख स्वरूपात देण्याचे काम सुरू ठेवण्यात आले. या शाखांमध्ये गोंधळाची स्थिती होऊ नये म्हणून पोलिसांनी दक्षता घेतली.

येस बँकेवर निर्बंध आणल्याची माहिती समजल्यानंतर ग्राहकांनी एटीएममधून पैसे काढण्यासाठी धावपळ केली. परंतु, एटीएम केंद्र तसेच ऑनलाइनही पैसे काढणे अवघड झाल्याचे ग्राहकांनी सांगितले. जिल्ह्य़ात येस बँकेच्या १६ शाखा आहेत. त्यातील १० शहर परिसरात, तर सहा ग्रामीण भागात आहेत. सकाळपासून सर्वच शाखांमध्ये खातेदार, ठेवीदारांची गर्दी झाली होती. काहींची अधिक रक्कम बँकेत अडकली, तर काहींची वेतनाची रक्कम होती.

मनोज कुमावत हे त्यापैकीच एक. त्यांचे ३० हजार रुपये बचत खात्यात अडकले. सकाळी त्यांनी एटीएममधून पैसे काढण्याचा प्रयत्न केला. पण तो निर्थक ठरला.

ऑनलाइन व्यवहार बंद झाल्याची तक्रार त्यांनी केली. बँकेच्या शाखेत रांगा लागलेल्या होत्या. प्रत्येक ग्राहकाला नियमानुसार पैसे दिले जातील, असे बँकेकडून ग्राहकांना सांगण्यात आले. त्यानुसार पैसे वितरण सुरू होते. रांगेत बराच वेळ उभे रहावे लागणार होते. नोकरीच्या ठिकाणी वेळेवर हजर रहावयाचे असल्याने आपण माघारी परतल्याचे कुमावत यांनी नमूद केले. कॉलेज रोड, नाशिक रोड, सिडको आदी ठिकाणी येस बँकेच्या शाखा आहेत. सर्वत्र दिवसभर ग्राहकांची धावपळ सुरू होती. राहुल खांदवे यांनी आपल्या बचत खात्यातून ३० हजार रुपये काढले. गर्दी असली तरी बँकेकडून सर्व ग्राहकांना नियमानुसार पैसे दिले जात असल्याचे खांदवे यांनी सांगितले.  काहींनी मोठय़ा रकमेच्या ठेवी बँकेत ठेवल्या आहेत. वेगवेगळ्या कारणांसाठी ठेवलेली रक्कम परत मिळेल की नाही याबद्दल संबंधितांच्या चेहऱ्यावर चिंतेचे मळभ दाटले होते. बँक अधिकारी आणि कर्मचारी ग्राहकांना घाबरून जाण्याचे कारण नसल्याचे सांगत होते. सध्याचे निर्बंध महिनाभरासाठी आहेत. रिझव्‍‌र्ह बँकेच्या सूचनेनुसार त्यात बदल होणार असल्याचा दिलासा त्यांच्याकडून दिला जात होता. दरम्यान, येस बँकेच्या शाखांमध्ये गोंधळाची स्थिती निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांनी दक्षता घेतली आहे. शहरातील बँकेच्या शाखांमध्ये पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आल्याचे आयुक्त विश्वास नांगरे यांनी सांगितले.