• पालिकेच्या पुनस्र्थापित समित्यांची २४ जुलै रोजी निवडणूक
  • सतीश कुलकर्णी, भगवान दोंदे, शीतल माळोदे यांना संधी

ण्यात आलेल्या शहर सुधार, विधि व आरोग्य समित्यांच्या सभापती व उपसभापतिपदांसाठी २४ जुलै रोजी निवडणूक होणार आहे. सभापतिपदासाठी भाजपने नव्या-जुन्यांचा मेळ साधताना शहरातील तीनही विधानसभा मतदारसंघातून एका सदस्याला प्रतिनिधित्व देण्याचे निश्चित केले आहे.

समित्यांच्या सभापती-उपसभापतीपदाच्या निवडणुकीचा विषय पावणे दोन महिन्यांपासून भिजत पडला होता. कायदेशीर अधिष्ठान नसल्याचा मुद्दा मांडून काँग्रेसने या समितीला आक्षेप घेतला. सदस्य नियुक्तीचा विरोध धुडकावत सत्ताधारी भाजपने तीनही समित्यांवर तौलनिक बळानुसार एकूण २७ सदस्यांची नियुक्ती केली.

आक्षेप घेणाऱ्या काँग्रेसने आपल्या सदस्यांची नावे दिली नाहीत. त्याचा लाभ मनसेला झाला. ऐनवेळी मनसेच्या तीन सदस्यांची नियुक्ती करीत भाजपने विरोधकांना कात्रजचा घाट दाखविला.

या घडामोडीनंतर प्रशासनाने समित्यांच्या स्थापनेबाबत कायदेशीर मत मागविले. पालिकेच्या वकिलांनी हिरवा कंदील दाखविल्यानंतर सभापती व उपसभापतिपदासाठीच्या निवडणुकीचा प्रस्ताव विभागीय आयुक्तांकडे पाठविला होता. त्यानुसार आता निवडणुकीचा कार्यक्रम निश्चित झाला आहे. अपर आयुक्त जोतिबा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली २४ जुलै रोजी ही निवडणूक होणार आहे. सकाळी साडेदहा वाजता विधि समिती, बारा वाजता शहर सुधार समिती आणि दीड वाजता वैद्यकीय आणि आरोग्य समितीच्या सभापती-उपसभापतिपदासाठी निवडणूक होणार आहे.

तौलानिक संख्याबळानुसार तीनही समित्यांवर भाजपचे वर्चस्व आहे. काँग्रेसने नावे न दिल्याने त्या जागेवर भाजपने मनसेच्या सदस्याला प्रत्येक समितीत स्थान दिले. या समित्यांमध्ये विरोधक अल्पमतात आहे. भाजपने आपल्या सदस्यांना वेगवेगळ्या पदांवर संधी देण्यासाठी या समित्यांची स्थापना केल्याचा विरोधकांचा आक्षेप आहे. तीनही समित्यांवर सभापती, उपसभापतिपदी भाजपच्या सदस्यांची वर्णी लागणार आहे.

महापालिकेत भाजपचे ६६ सदस्य असून पाच वर्षांत जवळपास १५० वेगवेगळ्या समित्यांवर प्रत्येकाला दोन व त्याहून अधिक वेळा संधी मिळणार असल्याचे सानप यांनी नमूद केले.

पदाचे मानकरी

वैद्यकीय साहाय्य व आरोग्य समितीमध्ये भाजपचे सतीश कुलकर्णी, अंबादास पगारे, रुपाली निकुळे, शांता हिरे, छाया देवांग यांचा समावेश आहे. महापालिकेच्या रुग्णालयांची अवस्था बिकट झाली आहे. या स्थितीत बदल करण्याची जबाबदारी ज्येष्ठ नगरसेवक सतीश कुलकर्णी यांच्याकडे सोपविली जाईल. शहर सुधार समितीत भाजपच्या स्वाती भामरे, पंडित आवारे, रुची कुंभारकर, भगवान दोंदे व सुदाम नागरे यांचा समावेश आहे. या समितीच्या सभापतिपदी दोंदे यांना संधी दिली जाणार आहे. विधि समितीचे सभापतिपदासाठी भाजपच्या शीतल माळोदे यांना उमेदवारी दिली जाणार आहे. उपसभापतिपदासाठी हा निकष लावला जाईल.

सर्वाना समान संधी

भाजपच्या प्रत्येक सदस्याला सभापती वा उपसभापतिपदी संधी मिळणार आहे. अर्थात तसे नियोजन भाजपने केले आहे. या संदर्भात शहराध्यक्ष बाळासाहेब सानप यांनी माहिती दिली. यापूर्वी महापौर, उपमहापौर, स्थायी सभापती व इतर पदांची नावे निश्चित करताना नव्या-जुन्या सदस्यांवरून वादंग झाले होते. महापालिकेतील या समित्यांचे पदाधिकारी निवडताना नवा-जुन्या सदस्यांचा मेळ घातला जाईल.  शहरातील तीनही विधानसभा मतदारसंघातील एका सदस्याकडे प्रत्येकी एका समितीचे सभापतिपद सोपविले जाईल. त्यानुसार नाशिक पूर्व मतदारसंघाकडे विधि, नाशिक मध्यकडे वैद्यकीय साहाय्य व आरोग्य तर नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातील सदस्याकडे शहर सुधार समितीचे सभापतिपद दिले जाणार आहे.