देशातील स्वच्छ शहरांच्या स्पर्धेतील नेत्रदीपक यशाला नाशिक मुकले आहे. नाशिक महापालिकेने केवळ योग्य पद्धतीने माहिती सादर न केल्याने निकषात कमी गुण मिळाले आहेत. त्यामुळे देशात नाशिकला ११ व्या स्थानावर समाधान मानावे लागले आहे. ‘बांधकाम आणि मलब्याचा पुनर्वापर’ या निकषात नियोजनपूर्वक काम असतानाही त्याची माहिती योग्य पद्धतीने महापालिकेला देता आली नाही. अन्यथा पहिल्या तीन क्रमांकात नाशिकचे स्थान असते.

स्वच्छ शहरांमध्ये देशात पहिल्या १० क्रमांकात स्थान मिळवण्यासाठी महापालिकेने सर्व पातळीवर प्रयत्न केले होते. केंद्र सरकारच्या या योजनेत गेल्या वेळी नाशिक ६७ व्या क्रमांकावर होते. यंदा चमकदार कामगिरी करत नाशिकने देशात ११ वे, तर राज्यात द्वितीय स्थान पटकावले. या यशाबद्दल महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्यासह या स्पर्धेसाठी प्रयत्न करणाऱ्या विभागांवर अभिनंदनाचा वर्षांव झाला.

स्वच्छ, कचरामुक्त शहरांच्या मानांकनात गेल्यावेळी नाशिक तीन तारांकित होते. चार वर्षांत प्रयत्न करूनही नाशिकला पहिल्या १० क्रमांकात स्थान मिळवता आले नाही. यंदा थोडक्यात ते हुकले असले तरी मोठी झेप मारली गेली. केंद्र सरकारने गेल्या वर्षीपासून त्रमासिक मूल्यमापन सुरू केले. यात नाशिक महापालिकेला एकच तारा मिळाला होता. यावर महापालिकेने आक्षेपही नोंदविला होता.

या उपक्रमासाठी महापालिकेने अनेक योजना राबविल्या. विविध निकषांच्या आधारे मूल्यांकन झाले. त्यात महापालिकेने सहा हजार पैकी ४७२९ गुण मिळवत ११ वे स्थान मिळवले आहे. सध्याच्या स्थानापेक्षा पहिल्या तीन क्रमांकातही नाशिकचा समावेश होऊ शकला असता. त्यात ‘बांधकाम आणि मलब्याचा पुनर्वापर’ या निकषात योग्य पद्धतीने गुण न मिळाल्याने नाशिक पिछाडीवर पडले.

घंटागाडीचे नियोजन, स्वच्छता, जैविक कचऱ्याची शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट, प्लास्टिकविरोधी कारवाई, नगरसेवकांसह नागरिकांचा सहभाग आदी मुद्दय़ांवर गुणांकन होते. मलब्याचा पुनर्वापर कसा केला जातो, यासाठी स्वतंत्रपणे गुण दिले जातात.  नाशिक महापालिकेला जिल्हास्तरीय निरीक्षण १४४१ (१५००), नागरिकांचा प्रतिसाद १२५५ (१५००), सेवांशी संबंधित प्रगती ११८२ (१५००) आणि प्रमाणपत्रीकरण ७०० (१५००) असे गुण मिळाले आहेत.

नेमके काय घडले ?

मलब्याचा रस्त्यावरील खड्डे बुजविणे वा बांधकामावेळी विशिष्ट भागापर्यंत त्याचा वापर केला जातो. याबाबतची माहिती छायाचित्रासह यंत्रणेला देण्यात आली होती. परंतु, ती माहिती संबंधितांपर्यंत योग्य पद्धतीने पोहचली नाही. कारण त्या निकषात परिपूर्ण असूनही

अतिशय कमी गुण मिळाल्याने देशात स्वच्छ शहरांच्या पहिल्या तीन क्रमांकात येण्याची संधी दुरावली गेली. त्यास महापाालिकेच्या घनकचरा व्यवस्थापक संचालक डॉ. कल्पना कुटे यांनी दुजोरा दिला. या निकषात नेमके काय झाले ते समजले नाही. उपरोक्त निकषाची महापालिका पूर्तता करते. यात ३०० गुण कमी झाले. इतर सर्व निकषात चांगले गुण मिळाले. या निकषात आम्ही कमी पडलो. आगामी टप्प्यात त्या दृष्टीने नियोजन करून पहिल्या तीन क्रमांकात स्थान मिळवण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याच डॉ. कुटे यांनी सांगितले.