लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

नाशिक : थंडीतील चढ-उतार आणि अधूनमधून झालेला अवकाळी पाऊस यानंतर नाशिकची पावले आता टळटळीत उन्हाळ्याच्या दिशेने पडू लागली आहेत. बुधवारी ३६.५ अंश तापमानाची नोंद झाली. एरवी मार्चच्या अखेरीस तापमान ही पातळी गाठते. मागील वर्षी ३ मार्च रोजी ३१.१ अंश इतके तापमान होते. मार्चअखेरीस तापमानाने ३६ अंशाचा टप्पा ओलांडला होता. याचा विचार केल्यास यंदा उन्हाच्या झळा आधीपासून सहन कराव्या लागत लागत असल्याचे लक्षात येते.

ऋतुमानात सातत्याने बदल होत आहे. दिवाळीनंतर जाणवणारा गारवा दिवाळीआधीच जाणवला होता. उन्हाळ्याच्या हंगामात त्याची पुनरावृत्ती झाली. दोन दिवसांत उन्हाचा तडाखा चांगलाच वाढला आहे. सकाळी दहा वाजेनंतर उन्हाच्या झळा जाणवू लागतात. थंड हवेसाठी प्रसिद्ध असणाऱ्या नाशिकच्या तापमानाने मार्चच्या

प्रारंभी ३६.५ अंशाचा टप्पा गाठल्याने या वर्षी उन्हाळा चांगलाच टळटळीत राहण्याची शक्यता व्यक्त होत आहे. नाशिकच्या तापमानात सर्वसाधारणपणे फेब्रुवारीपासून बदल होतात. उत्तरेकडून वाहत येणाऱ्या वाऱ्यामुळे हा परिसर अनेक दिवस थंडीच्या लाटेत सापडला होता. फेब्रुवारीदरम्यान गारवा हळूहळू ओसरला आणि त्याची जागा उकाडय़ाने घेतली.

मार्चच्या प्रारंभीच दुपारी चटके बसू लागले आहेत. त्यामुळे घराबाहेर जाणे टाळणे क्रमप्राप्त ठरले. बाजारपेठ, सार्वजनिक ठिकाणे,रस्त्यांवरील वर्दळ कमी झाल्याचे दिसून येते. ग्रामीण भागात भारनियमन सुरू असल्याने सर्वसामान्यांच्या जिवाची काहिली होत आहे. रात्री जाणवणारा गारवा अंतर्धान पावला आहे. उकाडा जाणवू लागल्याने उपाययोजना करण्याची तयारी सुरू झाली आहे. उन्हाळ्याच्या तोंडावर विविध कंपन्यांनी विविध साधने बाजारात आणली आहेत. महागडय़ा वातानुकूलित यंत्रणा खरेदीसाठी योजना राबविल्या जात आहेत. वातानुकूलित यंत्र, पंखे, थंडगार पाण्यासाठी माठ, खिडक्यांना पडद्याप्रमाणे बसविल्या जाणाऱ्या वाळा तत्सम साधनांची मागणी वाढली आहे.