राष्ट्रवादी काँग्रेसने सोमवारी कांदा तसेच टोमॅटो पिकाला हमीभाव जाहीर करावा, या मागणीसाठी शेतकऱ्यांसोबत रास्ता रोको आंदोलन केले. देवळा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर महामार्गावरील चौफुलीवर ठिय्या दिल्याने वाहतुकीचा खोळंबा झाला. आंदोलनकर्त्यांनी गळ्यात कांद्याच्या माळा घालत लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.

कांदा तसेच टोमॅटोसह सर्व शेतमालाचे असणारे अस्थिर भाव शेतकऱ्याच्या हतबलतेत भर घालत आहेत. कांद्याला ४०० ते ६०० रुपये आणि २० किलो टोमॅटोच्या जाळीला अवघे ५० रुपये कवडीमोल किंमत मिळाल्याने शेतकऱ्यांच्या संतापात दिवसागणिक भर पडत आहे. या विरोधात आवाज उठविण्यासाठी सोमवारी जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने उमराणे येथील बाजार समिती समोर महामार्गावर शेतकऱ्यांसोबत रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. आंदोलनाचे नेतृत्व जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. रवींद्र पगार यांनी केले. या वेळी अ‍ॅड. पगार यांनी कांद्याच्य् निर्यात धोरणाबाबत युती सरकारच्या धरसोड वृत्तीमुळेच भारतीय कांद्याला मागणी कमी झाली असल्याचा आरोप केला. युतीचे सरकार शुद्धीवर आणण्याची गरज असून शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ सरकारने आणली आहे. सरकारने कांद्याला किमान अडीच हजार रुपये हमीभाव जाहीर करावा, अशी मागणी त्यांनी केली.

आंदोलनासाठी जमलेली गर्दी पाहता अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी मोठय़ा प्रमाणावर बंदोबस्त ठेवला होता. या वेळी कांद्याला हमीभाव मिळालाच पाहिजे, यासह केंद्र आणि राज्य सरकारच्या विरोधात निषेध व्यक्त करून आंदोलकांनी घोषणाबाजी  केली. काही आंदोलनकर्त्यांनी गळ्यात कांद्याच्या माळा घालत सर्वाचे लक्ष वेधले. दोन तास सुरू असलेल्या आंदोलनामुळे वाहतुकीचा खोळंबा झाला. या वेळी कार्याध्यक्ष विष्णुपंत म्हैसधुणे, जिल्हा परिषद सदस्य यशवंत शिरसाठ, सदस्या डॉ. भारती पवार, नूतन आहेर, महिला जिल्हाध्यक्ष प्रेरणा बलकवडे आदी उपस्थित होते.