‘मविप्र’ शिक्षण संस्थेचा पुढाकार

दररोज निर्माण होणारा कचरा आणि त्याचे व्यवस्थापन ही सर्वाची डोकेदुखी ठरत असताना या प्रश्नावर मविप्र शिक्षण संस्थेने खत प्रकल्पाची मुहूर्तमेढ रोवत उत्तर शोधले आहे. केटीएचएम महाविद्यालयाच्या हरीत परिसर उपक्रमाचा भाग म्हणून मुलींच्या वसतिगृहातील जागेत जैवीक व भाजीपाल्याच्या कचऱ्यापासून सेंद्रिय खत तयार करता येईल असा छोटेखानी प्रकल्प कार्यान्वित केला आहे.

या खत प्रकल्पाचे उद्घाटन संस्थेच्या सरचिटणीस नीलिमा पवार आणि केटीएचएम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्ही. बी. गायकवाड यांच्या हस्ते झाले. यावेळी अर्थकेअर डिझाइन्सचे पथक, संस्थेचे शिक्षण अधिकारी डॉ डी. डी. काजळे, प्रा. एस. के. शिंदे, वसतिगृहाच्या अधीक्षिका प्रा. माधुरी गवळी आदी उपस्थित होते. वेगवेगळे उपक्रम राबविण्यात संस्था नेहमी पुढे असते.

या उपक्रमाच्या माध्यमातून संस्थेने पर्यावरण जागरुकता दाखवून दिल्याचे मत मान्यवरांनी व्यक्त केले. गंगापूर रस्त्यावर केटीएचएम महाविद्यालयाचा परिसर मोठा आहे. आसपास संस्थेची इतरही महाविद्यालये आहेत. या ठिकाणी वेगवेगळ्या स्वरूपाचा कचरा तसेच वसतिगृहाच्या उपहार गृहात भाजीपाल्याचा कचरा जमा होतो. त्याचा उपयोग या प्रकल्पाद्वारे सेंद्रिय खत निर्मितीसाठी केला जाणार आहे. हा खत प्रकल्प अभिव्यक्ती मीडिया फॉर डेव्हलपमेंट या सामाजिक संस्थेच्या अर्थकेअर डिझाइन्सने तयार केला आहे.

दोन हजार लिटर क्षमतेचा कंपोस्टर दिवसाला १०० किलो कचऱ्याचे व्यवस्थापन करून त्यापासून प्रति महिना १०० किलो खतनिर्मिती करू शकतो. कचऱ्याचे पर्यावरणपूरक व्यवस्थापन करून खतनिर्मिती करणारा कंपोस्टर कचऱ्याकडे समस्या नाही तर संधी म्हणून पाहायला शिकवतो.