मालेगाव: शहरातील चर्च ते टेहरे चौफुली रस्ता कामास होत असलेली दिरंगाई आणि त्यामुळे निर्माण झालेल्या वाहतुकीच्या अडथळय़ामुळे नागरिक त्रस्त झाले असतांना सार्वजनिक बांधकाम विभागाने कानावर हात ठेवल्यासारखी स्थिती आहे. त्यामुळे मालेगावकरांमध्ये रोष निर्माण झाला आहे. यासंबंधीची जबाबदारी निश्चित करून संबंधित अधिकाऱ्यांना निलंबित करावे, अशी मागणी आम्ही मालेगावकर विधायक संघर्ष समितीतर्फे करण्यात आली आहे.

समिती सदस्यांनी अप्पर जिल्हाधिकारी माया पाटोळे यांची भेट घेऊन या संदर्भात निवेदन दिले. जानेवारी महिन्यात या रस्त्याच्या कामाचा मोठा गाजावाजा करत प्रारंभ करण्यात आला होता. पण नंतर हे काम बंद पडले आहे. काम करण्यासाठी ठेकेदाराने जेसीबीद्वारे रस्ता खोदून ठेवल्याने जागोजागी खड्डे तयार झाले आहेत. काही ठिकाणी रस्त्यावर खडी पसरून ठेवण्यात आली आहे. त्यामुळे रस्ता वाहतूक योग्य राहिला नसल्याने वाहनधारकांचीच नव्हे तर, पादचाऱ्यांनाही तेथून जातांना मोठी कसरत करावी लागत असते. चर्च ते टेहरे चौफुली हा कॅम्प भागातून राष्ट्रीय महामार्गाकडे जाणारा रस्ता आहे. सोयगाव परिसरातील २५ ते ३० वस्त्यांनाही वाहतुकीसाठी याच रस्त्याचा वापर करावा लागत असतो. अशा स्थितीत या रस्ता कामास होणाऱ्या दिरंगाईमुळे लोकांना किती हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत, याचा पाढा समितीने अप्पर जिल्हाधिकाऱ्यांसमोर वाचला.

लवकरच पावसाळय़ास सुरुवात होईल. सोयगाव परिसरास दरवर्षी पावसाचे पाणी साचत असते. त्यातच रस्त्याच्या कामाच्या भिजत पडलेल्या घोंगडय़ामुळे नागरिकांच्या अडचणी आणखी वाढतील, याकडे समितीने अपर जिल्हाधिकारी यांचे लक्ष वेधले. शासन धोरणानुसार कामाचा कार्यादेश दिल्याप्रमाणे तत्काळ काम करून घेण्याची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाने पार पाडली पाहिजे होती. परंतु, कर्तव्यातील कसुरता आणि नियोजनाच्या अभावतेमुळे यात नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याची तक्रार समितीने केली आहे. यात दोषी असणाऱ्या अधिकाऱ्यांना निलंबित करावे, या रस्त्याचे काम तातडीने सुरू करावे आणि ते दर्जेदार कसे होईल, याची खबरदारी घ्यावी, अशी मागणीदेखील समितीने केली आहे. याप्रसंगी समितीचे निखिल पवार, प्रा.अनिल निकम, देवा पाटील, सुशांत कुलकर्णी, यशवंत खैरनार, विवेक वारुळे आदी उपस्थित होते.

अर्धवट रस्ता कामाने अपघात, दुखापती

अर्धवट स्थितीत बंद पडलेल्या रस्ता कामामुळे अनेक वाहनांचे अपघात झाले असून अनेकांना दुखापती झाल्याने नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला असल्याचे समितीने म्हटले आहे. पावसाला लवकरच सुरूवात होत आहे. पावसाचे पाणी साचून अडचणींमध्ये भर पडतील, याकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले.