पोलिसांचा तातडीने तपास

नाशिक : ऑनलाइन व्यवहारात बनावट  खात्याच्या माध्यमातून दिंडोरी तालुक्यातील जानोरी येथील हायटेक ई.डी.एम. कंपनीला ४६ लाखाहून अधिक रकमेचा गंडा घालण्यात आला. नाशिक ग्रामीण सायबर पोलीस ठाण्यात या संदर्भात तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तातडीने तपास करत कंपनीला त्यांचे पैसे परत मिळवून दिले.

जानोरीच्या हायटेक कंपनीतर्फे चीनमधील सुझोऊ लिस्ट्रॉंक मेकॅनिकल अ‍ॅण्ड इलेक्ट्रिकल कंपनीशी व्यवहारासंदर्भात बोलणी झाली. हा व्यवहार येस बँकेच्या माध्यमातून होणार होता. यासाठी चीनच्या कंपनीने हायटेकला आपला खाते क्रमांक इ मेलद्वारे कळविला होता. २५ जून रोजी संशयितांनी चीनच्या कंपनीचा बनावट मेल तयार करत हायटेकला दुसरा खाते क्रमांक देऊन पैसे त्या खाते क्रमांकावर भरण्यास सांगितले. हायटेकच्या संचालकांनी त्या खात्यावर ४६, ७७, ०३६ रुपये ऑनलाइन पद्धतीने भरले. या व्यवहारानंतर चीन येथील कंपनीचा कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद न आल्याने आपली फसवणूक झाल्याचे हायटेकच्या लक्षात आले.  या संदर्भात नाशिक ग्रामीण सायबर पोलीस ठाण्यात फसवणुकीची तक्रार दाखल करण्यात आली. पोलीस अधीक्षक संजय दराडे यांनी हायटेक कंपनीकडून व्यवहाराचा संपूर्ण तपशील मागविला. येस बँकेच्या नोडल अधिकाऱ्याशी संपर्क साधत कंपनीशी झालेला व्यवहार थांबविण्याची विनंती करण्यात आली. बँकेने व्यवहार रद्द करत ते पैसे हायटेकच्या खात्यावर पुन्हा जमा केले. नाशिक ग्रामीण सायबर विभागाचे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांनी अत्यंत जलदगतीने तपास करत अर्जदाराची रक्कम परत मिळवून दिल्याने कंपनीचे संचालक श्रीकांत शिंदे आणि अन्य पदाधिकाऱ्यांनी आनंद व्यक्त केला.

ऑनलाइन व्यवहार करताना काळजी घ्यावी

कुठलाही आर्थिक व्यवहार ऑनलाइन पद्धतीने करताना कोणालाही बँक खाते, डेबीट, क्रेडिट कार्डची गोपनीय माहिती, संकेतशब्द किंवा भ्रमणध्वनीवर आलेला ओटीपी देऊ नका. रोकडरहित व्यवहार करताना इ वॉलेट अ‍ॅप्लिकेशन वापरत असताना संकेतांक दुसऱ्यांना समजणार नाही, याची काळजी घेणे गरजेचे आहे. आर्थिक व्यवहार सायबर कॅफेमधून किंवा दुसऱ्याच्या संगणकावरून करू नका. ऑनलाइन व्यवहारासाठी ज्या संकेतस्थळाच्या माध्यमातून पैसे देत आहात त्याची सुरक्षाव्यवस्था तपासून घ्या. या संदर्भात तक्रार करण्यासाठी ०२५३-२२००४०८ या क्रमांकावर संपर्क साधावा.