scorecardresearch

वाहनांच्या वेगावर रडारची नजर

महामार्गावरील वाढत्या अपघातामागे वाहनांचा अतिवेग हेही एक कारण असल्याने वेगमर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर लवकरच रडार व्यवस्थेद्वारे लक्ष ठेवण्यात येणार आहे.


महामार्गावर मालेगाव ते चांदवड दरम्यान सर्वाधिक अपघात; ग्रामीण भागात ठरावीक मार्गावर हेल्मेटसक्तीचे पोलीस अधीक्षकांचे संकेत
नाशिक : महामार्गावरील वाढत्या अपघातामागे वाहनांचा अतिवेग हेही एक कारण असल्याने वेगमर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर लवकरच रडार व्यवस्थेद्वारे लक्ष ठेवण्यात येणार आहे. नियम मोडणाऱ्या वाहनांची या व्यवस्थेद्वारे नोंद झाल्यानंतर त्यांना दंड भरावा लागणार आहे, अशी माहिती जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी दिली.
नाशिक तालुका पोलीस ठाण्याच्या सभागृहात सिनिअर जर्नालिस्ट फोरमतर्फे आयोजित कार्यक्रमात पोलीस अधीक्षक पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. या वेळी जिल्ह्यातील रस्ता अपघातांवर नियंत्रणासाठी करण्यात येत असलेल्या प्रयत्नांची माहिती देताना पाटील यांनी रस्ता अपघातास अनेक घटक कारणीभूत असल्याचे सांगितले. जिल्ह्यातील महामार्गावर ९८ अपघात स्थळे आहेत. त्यापैकी काही ठिकाणी रस्त्याचा असमतोलपणा, कुठे दुभाजकांमध्ये अधिक वाढलेली झाडे अपघातांना कारणीभूत ठरत आहेत. संबंधित ठिकाणच्या रस्त्यांचा असमतोलपणा दूर करण्यासंदर्भातील विषय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे मांडण्यात आला आहे.
मालेगाव ते चांदवडजवळील राहुड घाट यादरम्यान जिल्ह्यात महामार्गावर सर्वाधिक अपघातांची नोंद झाली आहे. अपघातांना मानवी चुकाही कारणीभूत असून वाहनांच्या अतिवेगामुळेही बरेचसे अपघात होत आहेत. वाहनांचा वेग मोजण्यासाठी स्पीडगनचा वापर करण्यात येत असला तरी या व्यवस्थेला काही मर्यादा आहेत. त्यामुळे एकाच वेळी अधिक प्रमाणावर वाहनांचा वेग मोजण्यासाठी लवकरच रडार व्यवस्थेचा आधार घेण्यात येणार आहे. या व्यवस्थेचे प्रात्यक्षिक राज्यात सर्वप्रथम नाशिक येथेच घेण्यात आले असून रडारच्या दुतर्फा एक किलोमीटपर्यंतच्या अंतरातील वाहनांच्या वेगासह त्यांच्या क्रमांकाची नोंद घेतली जाणार आहे. वेगमर्यादा ओलांडणाऱ्या वाहनांना दंडाची व्यवस्था करता येणार आहे. यामुळे वाहनांच्या अतिवेगावर नियंत्रण येऊ शकेल.
दुचाकी वाहनधारकांना शहरात ज्याप्रमाणे हेल्मेटसक्ती केली जाते, त्याप्रमाणे ग्रामीण भागात कारवाई करण्यात अनेक अडचणी आहेत. एकेका पोलीस ठाण्यांतर्गत येणारी अनेक गावे, शेतरस्ते या त्यापैकी काही. असे असले तरी किमान महामार्ग आणि राज्यमार्गावर हेल्मेट सक्तीसाठी प्रयत्न करण्यात येणार असून पंपांना हेल्मेट नसेल तर पेट्रोल देऊ नये, अशी नोटीस देण्यात आल्याचे पाटील यांनी नमूद केले. चोरीस गेलेली वाहने सापडल्यानंतर पोलीस ठाण्यात जमा केली जातात. परंतु, आपले वाहन नेमक्या कोणत्या पोलीस ठाण्यात असेल, हे शोधण्यात वाहनधारकांना होणारा मनस्ताप दूर करण्यासाठी एक मेपासून अशा बेपत्ता आणि सापडलेल्या वाहनांची माहिती संकेतस्थळाद्वारे वाहनधारकांना मिळू शकेल, अशी व्यवस्था करण्यात येत असल्याचेही अधीक्षक पाटील यांनी सांगितले.
मालेगाववर विशेष लक्ष
जिल्ह्यात मालेगाव शहर संवेदनशील असल्याने या ठिकाणी शांतता कायम राहावी यासाठी धर्मगुरूंचीही मदत घेण्यात येत असते. मालेगावातील कायदा आणि सुव्यवस्था टिकून राहण्यासाठी आठवडय़ातून शुक्रवार आणि शनिवार या दोन दिवशी आपण स्वत: बैठक घेत असल्याचा उल्लेख अधीक्षकांनी केला. वाढती बेरोजगारी हे गुन्ह्यांचे प्रमुख कारण असल्याचे निरीक्षण त्यांनी नोंदविले.
रौलेट जुगाराबाबत गंभीर
रौलेट जुगारप्रकरणी कैलास शहाविरुद्ध एकूण १३ गुन्हे दाखल असून त्यात खंडणी, फसवणूक यासह आत्महत्येस प्रवृत्त करण्याचाही गुन्हा सामील आहे, शहाविरुद्ध मोक्कान्वये कारवाईसाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू असल्याचे
त्यांनी सांगितले. या वेळी जिल्ह्यातील आपल्या दीड वर्षांच्या आतापर्यंतच्या कार्यकाळात वाखारी हत्याकांड, महिला डॉक्टरची हत्या या प्रकरणांच्या यशस्वी तपासाची तसेच जिल्ह्यात येण्याआधीच्या काही प्रकरणांचीही माहिती अधीक्षक सचिन पाटील यांनी दिली.

मराठीतील सर्व नाशिक ( Nashik ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Radar monitoring vehicle speeds accidents highway malegaon chandwad police wearing helmets rural areas amy

ताज्या बातम्या