नाशिक : आदिवासी भागातील पाझरस्रोत आटले असताना सरकारलाही पाझर फुटेना, अशा पाणीटंचाईच्या भीषण संकटात सापडलेला आदिवासी समाज पाण्यासाठी पायपीट करीत आहे. पाण्यात डुंबण्याचा मनसोक्त आनंद घेणारा उर्वरित महाराष्ट्र ढेकर देऊन गादीवर पहुडण्याची तयारी करीत असतो तेव्हा आदिवासी भागातील महिला धारात काटेकुटे, झुडपे, तुडवत, दगड-धोंडय़ांना ठेचकाळत, डोक्यावर रिकामी घागर घेऊन पाण्याच्या शोधात भटकत असतात. नाशिक जिल्ह्याच्या पश्चिम भागातील सुरगाण्यातील आदिवासी पाडय़ावरचे हे भीषण वास्तव आहे.
धरणांचा जिल्हा म्हणून शेखी मिरवणाऱ्या नाशिक जिल्ह्यात जिथून पाणी पाझरते, ओढय़ा-नाल्यामधून प्रवाहित होऊन धरणात साठते, त्या आदिवासी भागालाच पाण्याची तीव्र टंचाई भासते. हे वास्तव नेहमीचेच. या पाणीटंचाईने कोरडय़ा पडलेल्या घशातून धरण उशाशी, कोरड घशाशी असे उच्चारण करण्याचे त्राणही या महिलांमध्ये राहिलेले नाहीत. सुरगाणा तालुक्यातील आदिवासी पाडय़ावर असलेली भीषण पाणीटंचाई हृदय पिळवटून टाकते. डोक्यावर, कमरेवर हंडी, कळशी, हातात विजेरी घेऊन, पाण्याच्या शोधात निघालेली आदिवासी पाडय़ावरची महिला असे चित्र पाहून कोणालाही दया येईल. परंतु व्यवस्थेला मात्र त्याची फिकीर नसल्याचे पाहून मन अस्वस्थ होते.
सुरगाणा तालुक्यातील मोरडा हा अवघ्या ६०० लोकवस्तीचा पाडा. पिण्यासाठी पाणीच नसल्याने महिलांना हंडाभर पाण्यासाठी दिवस-रात्र भटकावे लागते. दिवसभर काबाडकष्ट करायचे आणि नंतर पाण्याचा शोध घ्यायचा एवढाच दिनक्रम. गावातील विहिरीने तळ गाठला. तासनतास वेळ घालवल्यानंतर एखादा-दुसरा हंडा भरतो, म्हणूनच डोंगर-दऱ्यांची काटय़ाकुटय़ाची वाट तुडवीत या महिलांचा अनवाणी प्रवास सुरू होतो. त्यातच हिंस्र पशूंची भीती दूर करण्यासाठी गावातील तरुण कोणी टेंभे घेऊन तर कोणी भ्रमणध्वनीतील बॅटरीचा उपयोग करून महिलांची पाठराखण करताना दिसतात. या भटकंतीत एखादा झरा सापडला तर विश्वप्रदक्षिणा पूर्ण केल्याचा आनंद महिलांच्या चेहऱ्यावर झळकतो. महिलांची रांग लागते. वर्षांनुवर्षे हीच दुरावस्था ललाटी लेवून त्यांची पायपीट सुरू आहे. केवळ माणूसच नाही तर मुकी जनावरेही या पाणीटंचाईला बळी पडत आहेत. लोकप्रतिनिधी केवळ निवडणुकीवेळी येतात आणि आश्वासन देऊन निघून जातात. पाणीटंचाई तशीच राहाते.
लेकीसुनांचा संघर्ष जुनाच
लग्न करून गावात सून म्हणून आलेल्या नवविवाहितेला चुडा उतरण्याच्या आधी डोक्यावर हंडा घेऊन दाहीदिशा भटकंती करीत पाण्याचा झरा शोधण्याची वेळ येते. हा केवळ मोरडा या एकाच गावाचा प्रश्न नाही. आजूबाजूच्या गळवड, शिरीषपाडा, दांडीची बारी, म्हैसमाळ, देवळा, धुरापाडा, खुंटविहीर, मोहपाडा अशा अनेक गावांची ही समस्या आहे. गावातील लेकींना लहानपणापासूनच पाण्यासाठी संघर्ष करावा लागतो, सुनांना लग्न झाल्यापासून पाण्याच्या खेपा मारायला जुंपावे लागते, म्हणूनच पेयजल योजनेच्या माध्यमातून कायमस्वरूपी पाण्याचा प्रश्न मिटवावा, अशी मागणी होत आहे.