अनिकेत साठे

दुष्काळात मजुरांनी रोजगार हमीच्या कामांकडे पाठ फिरवली असताना दुसरीकडे कधीतरी सुरू झालेल्या आणि नंतर बंद पडलेल्या कामांच्या आकडेवारीने पाच हजारांचा टप्पा ओलांडला आहे. या कामांचा श्रीगणेशा झाला, परंतु वेगवेगळ्या कारणास्तव ही कामे पुढे सरकली नाहीत. कुठे मजूर येण्यास तयार नाहीत, तर कुठे लाभार्थीचे स्वारस्य संपलेले असून केंद्र सरकारने सव्वा पाच कोटींचा कुशल निधी न दिल्याचाही फटका काही कामांना बसला.

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी अधिनियमातील तरतुदींच्या आधारे ग्रामीण कामगारांना अनेक कायदेशीर अधिकार प्राप्त झाले. हक्काच्या चौकटीमुळे प्रत्येक कुटुंबाला दरवर्षी १०० दिवस काम मिळवता येते. परंतु, मजुरांना रोहयोंतर्गत काम करायचे की नाही, अशी साशंकता निर्माण होण्यासारखी स्थिती आहे.

कामे सुरू होत नसल्याच्या तक्रारी नेहमीच होतात. वास्तवात कामे उपलब्ध असताना कोणी मागणी करत नसल्याचा विरोधाभास समोर आला आहे. जिल्ह्य़ात सहा लाखांहून अधिक मजूर क्षमतेची जवळपास १८ हजार कामे शेल्फवर आहेत. मात्र, कामांची तितकी मागणी नाही. सध्या केवळ ११२० कामे सुरू असून त्यावर दैनंदिन सरासरी ८२१२ मजूर काम करत आहेत.

यातील ९० कामे अशी की तिथे मागणी करून नंतर मजूर फिरकलेच नाहीत. १५२ कामे सुरू झाली, पण नंतर मजुरांना ते काम करावेसे वाटले नाही. काही ठिकाणी खुद्द लाभार्थी इच्छुक नव्हते. त्यातील ४० कामे बंद करावी लागली.

कालावधी संपुष्टात येऊनही ३०१ कामे पूर्ण झाली नाहीत. कालावधी पूर्ण होणे बाकी असणारी तीन हजार ५६३ कामे आहेत. फळबाग लागवड, वृक्ष लागवड अशी ही कामे असून त्यांचा दोन ते पाच वर्षांचा कालावधी आहे.

५१४ कामांना भौतिकदृष्टय़ा पूर्णत्वाचे प्रमाणपत्र न मिळाल्याने ती रखडलेल्या यादीत आहेत. काहींचे पंचनामे बाकी तर काही नगरपालिकेकडे वर्ग झाल्याचा प्रशासनाचा अहवाल सांगतो. तांत्रीक कारणाने काही बंद झाली. २९ कामांबाबत तक्रारी आल्याने ती रखडली. केंद्र सरकारकडून कुशल निधी न मिळाल्याने १९२ कामे रखडली आहेत.

रखडलेली कामे शक्य तितक्या लवकर पूर्णत्वास नेण्यासाठी प्रशासनामार्फत पाठपुरावा केला जात आहे. काही कामे कुशल निधीअभावी थांबलेली आहेत. ती पूर्ण करण्यासाठी निधीची मागणी करण्यात आली आहे. कालावधी पूर्ण होणे बाकी असलेल्या कामांची संख्या मोठी आहे. वृक्ष लागवडीसारख्या कामांचा पाच वर्षे तर फळबाग वा तत्सम कामांचा कालावधी दोन वर्ष आहे. ती विहीत वेळेत पूर्ण होतील.

– पल्लवी निर्मळ  (उपजिल्हाधिकारी, रोहयो)