नागपूर-मुंबई समृध्दी महामार्गाच्या मोजणीला सिन्नर तालुक्यातील शिवडे गावाने जो प्रखर विरोध दाखविला, तेव्हापासून हे गाव राजकीय नेत्यांचे पर्यटन स्थळ बनल्याचे चित्र आहे. ‘प्रसंगी जीव देऊ, पण एक इंचही जमीन देणार नाही’ अशी भूमिका घेणाऱ्या शिवडेतील शेतकऱ्यांनी कुटुंबियांसह शेतात ठाण मांडत प्रशासनाला आजवर मोजणी करू दिलेली नाही. तेव्हापासून या छोटय़ाशा गावाकडे राजकीय नेत्यांची रिघ लागली आहे. त्यात सत्ताधारी शिवसेना व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते जसे आहेत, तसेच विरोधी काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांचाही समावेश आहे. महत्वाची बाब म्हणजे, संघर्ष यात्रेच्या भेटीत हे गाव ऐनवेळी समाविष्ट करण्यात आले. या ठिकाणी भेट देणाऱ्या नेतेमंडळींना शेतकऱ्यांच्या असंतोषालाही तोंड द्यावे लागत आहे.

प्रस्तावित समृध्दी महामार्ग दहा जिल्ह्यांतील ३५३ गावांतून जाणार आहे. ठिकठिकाणी त्यास विरोध होत असताना शिवडे येथे शेतकऱ्यांनी मोजणीचे काम बंद पाडले. तेव्हा नाशिकपासून ३० किलोमीटर अंतरावर असणारे आठ हजार लोकवस्तीचे हे गाव राजकीय पटलावर चमकले. या गावास भेट देण्यास राजकीय नेते आतुर झाल्याचे प्रत्यंतर येत आहे. बळाचा वापर करून मोजणीचा प्रयत्न होत असल्याने निर्माण झालेल्या तणावाच्या पाश्र्वभूमीवर, नुकतीच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खा. राजु शेट्टी यांनी या ठिकाणी भेट देऊन सर्वाच्या व्यथा जाणून घेतल्या. ‘समृध्दी’ मार्गासाठी शेतकऱ्यांच्या बळजबरीने जमिनी घेण्याचा प्रयत्न केल्यास तो महागात पडेल, असा इशारा त्यांनी दिला. तत्पुर्वी, राष्ट्रवादीचे आमदार सिन्नरचे भूमिपुत्र जितेंद्र आव्हाड यांनी गावास भेट दिली होती. तेव्हा एका महिलेने राजकीय नेत्यांनी नंतर सांत्वन करण्यास येण्याऐवजी शासकीय यंत्रणा मोजणीला येते, तेव्हा आमच्या आंदोलनात प्रत्यक्ष सहभागी होण्यासाठी यावे, असे सुनावले. अकस्मात आलेल्या या सल्ल्याने अवघडलेल्या आव्हाड यांनाही मग ग्रामस्थ आवाज देतील, तेव्हा हजर राहण्याचे आश्वासन द्यावे लागले.

राज्यात सुरू असलेली संघर्ष यात्रा सोमवारी नाशिकमध्ये येत आहे. यात्रेच्या प्रारंभीच्या नियोजनात शिवडेच्या भेटीचा अंतर्भाव नव्हता. परंतु, आठवडाभरातील घडामोडींनी अंतिम नियोजनात विरोधी पक्षातील प्रमुख नेत्यांची या गावास भेट निश्चित करण्यात आली. मंगळवारी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, आ. जयंत पाटील, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, समाजवादी पार्टीचे अबु आझमी, शेतकरी कामगार पक्षाचे गणपत पाटील आदी नेते मंडळी गावास भेट देऊन शेतकऱ्यांशी चर्चा करणार आहेत. नाशिक लोकसभा व सिन्नर विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे खासदार व आमदार आहेत. समृध्दी महामार्ग शेतकरी संघर्ष समितीने शनिवारी आयोजिलेल्या मेळाव्यात या पक्षाचे खा. हेमंत गोडसे आणि आ. राजाभाऊ वाजे यांनी गावात हजेरी लावली. कर्जमुक्ती व समृध्दी महामार्गाच्या प्रश्नात सेना दुटप्पी भूमिका घेत असल्यावरून शेतकऱ्यांनी गोडसे यांना धारेवर धरले. समृध्दी मार्गाची जबाबदारी ज्या महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळावर आहे, त्या खात्याची जबाबदारी सेनेच्या एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे. सेनेच्या नेत्यांनी कोरडे सांत्वन करू नये. शेतकऱ्यांना दमदाटी करणाऱ्या अधिकाऱ्यांना जाब विचारा, महामार्गास विरोध असेल तर आपल्या पदांचे राजीनामे द्यावेत, असे सुनावत शेतकऱ्यांनी भाषणात अडथळे आणले. मेळाव्यात गोंधळ होऊ लागल्याने गोडसेंना आपले भाषण आटोपते घ्यावे लागले. पुढील काही दिवसात आ. बच्चू कडू देखील गावास भेट देणार असल्याचे शेतकरी सोमनाथ वाघ यांनी सांगितले. या घडामोडीत भाजपचे जिल्हा परिषद सदस्य वगळता एकही लोकप्रतिनिधी गावाकडे फिरकला नसल्याचे संघर्ष समितीचे पदाधिकारी राजू देसले यांनी सांगितले.