आगामी महापालिका निवडणुकीत

नाशिक : चार सदस्यीय प्रभाग रचनेत पक्षाच्या एक-दोन मजबूत दावेदारांच्या बळावर इतरांची नौका पैलतीरी नेण्याची व्यूहरचना आखण्याचे राजकीय पक्षांचे मनसुबे एक सदस्यीय प्रभाग रचनेमुळे अडचणीत येण्याच्या मार्गावर आहे. आगामी निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने एक सदस्यीय प्रभाग रचनेनुसार प्रारूप प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा तयार करण्याची सूचना केली आहे. या नव्या प्रभाग रचनेमुळे राजकीय समीकरणे बदलणार आहेत. अपक्षांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.

महापालिकेत सध्या ३१ प्रभाग असून एकूण १२२ नगरसेवक आहेत. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार नव्या प्र्रारूप आराखड्यात साधारणत: १२२ प्रभागांची संख्या असेल. लोकसंख्येच्या प्रमाणानुसार त्यात काही बदल होऊ शकतात. महापालिकेची स्थापना झाल्यापासून आजवर दोन वेळा एक सदस्यीय, नंतर एकदा त्रिसदस्यीय, एकदा द्विसदस्यीय प्रभाग रचनेनुसार निवडणूक झालेली आहे. गेल्यावेळी चार सदस्यीय प्रभागरचनेनुसार निवडणूक पार पडली. आगामी निवडणुकीत बहुसदस्यीय प्रभाग पध्दतीऐवजी एक सदस्यीय प्रभाग पध्दती लागू केल्याचे आयोगाने म्हटले आहे. त्यामुळे प्रत्येक प्रभाग एक सदस्याचा असेल. प्रभाग रचनेसाठी २०११ च्या जणगणनेनुसार प्रारूप प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा तयार करण्यास सांगण्यात आले आहे.  आगामी निवडणुकीचे वैशिष्ठ्ये म्हणजे सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार इतर मागास प्रवर्गाचे आरक्षण नसेल. त्यामुळे सध्या या प्रवर्गातून नगरसेवक झालेल्या आणि आगामी निवडणुकीच्या रिंगणात उतरणाऱ्यांना खुल्या प्रभागातून रिंगणात उतरावे लागेल.  गतवेळी मनपाची निवडणूक चार सदस्यीय प्रभाग रचनेनुसार झाली. आकारमानामुळे ही प्रभागरचना उमेदवारांची दमछाक करणारी होती. काही राजकीय पक्षांनी या रचनेचा नियोजनपूर्वक लाभ उठविला. दोन-तीन मजबुत दावेदारांच्या जोडीला तुलनेत कमकुवत, नवख्यांना निवडून आणण्याचे नियोजन केले. संबंधितांची जबाबदारी मुख्य दावेदारांवर टाकली गेली. चार सदस्यीय रचनेत प्रभागाचा आकार विस्तारला. काही कामासाठी नेमकी कुणाकडे दाद मागायची, असा प्रश्न नागरिकांना पडायता. प्रभागातील चार सदस्यांमध्ये एकवाक्यता नसेल तर विकास कामे पुढे सरकत नाही. या एकंदर स्थितीत उपरोक्त निर्णयाने राजकीय समीकरणे बदलण्यास हातभार लागणार आहे. मध्यंतरी नाशिक दौऱ्यावर आलेले मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महापालिकेत राजकीय सोयीसाठी बहुसदस्यीय प्रभाग रचना योग्य नसल्याचे म्हटले होते. बहुसदस्यीय प्रभागात कोणता सदस्य लक्ष देतो ते देखील समजत नाही. मतदारसंघात खासदार, आमदार एकच असतो. त्याच प्रमाणे महापालिका निवडणुकीत एकसदस्यीय प्रभाग रचना असायला हवी, असे त्यांनी म्हटले होते.

अपक्षांची संख्या वाढणार

महापालिकेच्या आजवरच्या निवडणुकीवर नजर टाकल्यास एक सदस्यीय प्रभाग रचनेत अपक्षांची संख्या वाढल्याचे दिसून येते. ज्येष्ठ नगरसेवक गुरूमित बग्गा यांनी तो मुद्दा मांडला. महापालिकेची पहिली व दुसरी निवडणूक एक सदस्यीय पध्दतीने झाली. त्या दोन्ही निवडणुकीत अपक्षांची संख्या मोठी होती. २००२ मध्ये त्रिसदस्यीय प्रभाग रचनेमुळे अपक्षांची संख्या घटली. २०१२ मधील निवडणूक द्विसदस्यीय पध्दतीने झाली. त्यावेळी पुन्हा अपक्षांच्या संख्येत वाढ झाली. २०१७ मध्ये चार सदस्यीय प्रभाग रचनेने अपक्षांची संख्या केवळ तीन राहिली. प्रभाग जेवढा मोठा, तितकी अपक्षाची संख्या कमी असे बग्गा यांनी सांगितले.