नाशिक : सलग दुसऱ्या दिवशी भल्या सकाळी शहर परिसरात अवकाळी पावसाचा शिडकावा झाला. काही मिनिटे रिपरिप सुरू होती. दिवसभर अनेक भागात ढगाळ वातावरण होते. त्यामुळे पाऊस पुन्हा हजेरी लावतो की काय, ही धास्ती कायम राहिली. वाऱ्याचा वेग वाढल्याने असह्य उकाडय़ात काहिसा दिलासा मिळाला. तापमानात एक अंशाने घट होऊन पारा ३६ अंशावर आला आहे. हवामान विभागाने पुढील तीन, चार दिवस अवकाळी पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. त्याची प्रचिती नाशिकच्या काही भागात बुधवारी आली होती. वातावरणात अकस्मात बदल होऊन बहुतांश भागात ढग दाटले होते. चांदवडच्या काही भागात पावसाने हजेरी लावली होती. मनमाड परिसरात शिडकावा झाला होता. दुसऱ्या दिवशी सकाळी त्याने शहरात हजेरी लावली. सकाळी सातच्या सुमारास काही भागात अकस्मात पावसाला सुरूवात झाली. काही मिनिटे झालेल्या शिडकाव्याने रस्ते ओलसर झाले. रात्रीपासून वारा वाहू लागला. त्यामुळे काहिसा दिलासा मिळाला. आदल्या दिवशीच्या तुलनेत तापमान एक अंशाने कमी झाले. अवकाळीच्या सावटाने शेतकरी धास्तावला आहेत.