मद्यसेवनासह दप्तरात तंबाखू, गुटखा, अश्लील छायाचित्रे;  पोलीस तपासणीत अनेक गैरबाबी उघड

सिडको परिसरात शाळकरी मुलीवरील सामूहिक अत्याचार प्रकरणाच्या पाश्र्वभूमीवर शहरातील अनेक शाळांमध्ये पोलिसांनी अचानक भेट देत विद्यार्थ्यांची तपासणी केली असता अनेक आक्षेपार्ह गोष्टी समोर आल्या आहेत. काहींच्या दप्तरात तंबाखू, गुटखा व तत्सम पुडय़ा, तर काहींच्या दप्तर व भ्रमणध्वनीत ‘पोनरेग्राफी’सह अश्लील छायाचित्रे आढळली आहेत. यामध्ये मुलीही मागे नसल्याचे दिसून आले असून काही विद्यार्थ्यांनी चक्क मद्यसेवन केल्याचे आढळून आल्याने पोलीस यंत्रणाही आवाक झाली आहे.

शाळकरी मुलीवरील सामूहिक अत्याचार झाल्यानंतर त्याची गंभीर दखल घेत पोलिसांनी शहरातील शाळांमध्ये इंटरनेटचा गैरवापर यावर जनजागृती सुरू केली आहे.  त्यानुसार शाळेला दांडी मारून इतरत्र भटकंती करणाऱ्या विद्यार्थ्यांची शोध घेणे, शाळांमध्ये अचानक भेट देऊन विद्यार्थ्यांच्या दप्तरांची तपासणी करणे आदी प्रकारची मोहीम पोलिसांनी हाती घेतली आहे.

मोहिमेत पोलिसांना भ्रमणध्वनी तपासणीत १४ ते १६ वयोगटातील मुला-मुलींनी हाईक, व्हॉट्स अ‍ॅपवर काही ग्रुप तयार केल्याचे आढळून आले आहे. त्यात मुलींची छायाचित्रे मागविण्यात आली आहेत. त्यात काही आक्षेपार्ह संदेशाची देवाणघेवाण होत असल्याचे पाहण्यास मिळाले. दुसरीकडे, शाळेला दांडी मारून इतरत्र भटकंती करणाऱ्या विद्यार्थ्यांची शोध मोहिमेत गोदा पार्क, सावरकरनगर पुलालगतचा परिसर, फाळके स्मारक, विविध भागातील उद्याने अशा अनेक विद्यार्थ्यांचा शोध घेण्यात आला. यामध्ये शाळा व महाविद्यालयाला दांडी मारून भटकंती करणाऱ्यांना ताब्यात घेण्यात आले. त्याच वेळी त्यांच्या पालकांनाही पोलीस ठाण्यात बोलावत समज देण्यात आली. त्यांना काही सूचना करण्यात आल्या. त्याचप्रमाणे प्रत्येक शाळेत पोलीस अधिकाऱ्यांनी इंटरनेटचा गैरवापर यावर प्रबोधन केले. यामध्ये मुले आणि मुली असे स्वतंत्र विभाग करत त्यांना त्यांच्या या कृतीतील धोके समजावून सांगितले. एक छायाचित्र व्हायरल झाले तर त्यातून होणारी बदनामी, त्याचा गैरवापर याकडे लक्ष वेधण्यात आले. अश्लील संकेतस्थळांवरून माहिती मिळवणे थांबवावे, असे आवाहनही करण्यात आले.  मुलांवर संस्कार ही पालकांची जबाबदारी आहे. आपली मुले नेमकी काय करतात, याविषयी पालकांनी सजग असावे. वेळोवेळी मुलांचे दप्तरे तपासणे, मुलगी साधा पोशाख शाळेत का नेते, मित्रांना घरी बोलावत त्यांची संपूर्ण माहिती ठेवणे, वाचन संस्कृती जोपासताना मुले नेमके काय वाचताय यावर लक्ष ठेवावे, शाळांनी बाहेरील विद्यार्थ्यांना परिसरात येऊ न देणे, मुलांचे वर्तन आणि देहबोली याकडे लक्ष ठेवणे आदी सूचना करण्यात आल्या.

पालक अनभिज्ञ

अंबड प्रकरणानंतर शालेय विद्यार्थ्यांबाबत अनेक गंभीर बाबी समोर येत आहे. आपला पाल्य नेमके काय करतो, शाळा किंवा शिकवणीच्या वेळेत ते कुठे जातात, त्यांच्या दप्तरात काय आहे, भ्रमणध्वनीच्या माध्यमातून ते कोणाच्या संपर्कात आहे याविषयी पालक अनभिज्ञ आहेत. मुलांपेक्षा पालकांचे प्रबोधन करण्याची वेळ आली आहे.

– श्रीकांत धिवरे (पोलीस उपायुक्त)

 

शाळेच्या वेळेत बाहेर भटकंती

शाळेच्या वेळेत अनेक मुले-मुली बाहेर फिरताना आढळून आली. गंगापूर रस्त्यावरील सावरकरनगर पुलालगतच्या परिसरात पोलिसांनी कारवाई केली. या वेळी आढळलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना सूचना देण्यात आली आहे.

– लक्ष्मीकांत पाटील (पोलीस उपायुक्त)