राजकारण आणि साहित्य कधीच वेगळे नाही-कांबळे

नाशिक : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष उत्तम कांबळे यांनी साहित्य संमेलनातील राजकीय नेत्यांच्या उपस्थितीचे समर्थन केले आहे. राजकारण आणि साहित्य हे वेगळे कधीच नसते. संमेलनाच्या निमित्ताने होणाऱ्या वादापासून संयोजन समितीने दूर राहून संमेलन यशस्वी करण्याकडे लक्ष द्यावे अशी सूचना त्यांनी केली.

नाशिक येथे होणारे साहित्य संमेलन उद्घाटक निवड, राजकीय व्यक्तींना व्यासपीठावर स्थान आदी कारणांनी वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. उद्घाटन सोहळय़ास मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे प्रकृतीच्या कारणास्तव अनुपस्थित राहतील हे लक्षात आल्यावर संयोजकांनी महसूलमंत्री  बाळासाहेब थोरात यांना निमंत्रित केल्याचे सांगितले जाते. समारोप सोहळय़ात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार उपस्थित राहणार आहेत. साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर राजकीय मंडळींच्या उपस्थितीची यापूर्वी बरीच चर्चा झालेली आहे. साहित्य महामंडळ यावर नाराजी व्यक्त करण्यापलीकडे जात नाही. बुधवारी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष उत्तम कांबळे यांना नाशिकच्या साहित्य संमेलनाचे निमंत्रण देण्यात आले.

यावेळी संयोजन समितीतील पदाधिकाऱ्यांना संमेलनाच्या निमित्ताने होणाऱ्या वादापासून दूर राहण्याचा सल्ला त्यांनी दिला. प्रसिद्ध लेखक आणि कलावंत नामदेव व्हटकर यांचे हे जन्मशताब्दी वर्ष असून साहित्य संमेलनात त्यांची नोंद घेतली जावी अशी अपेक्षाही कांबळे यांनी व्यक्त केली. यावेळी स्वागत समितीचे उपाध्यक्ष प्राचार्य प्रशांत पाटील, कार्यवाह प्रा.डॉ. शंकर बोऱ्हाडे , संजय करंजकर, सुभाष पाटील, भगवान हिरे हे उपस्थित होते.