मराठी नाटक शंभर पावले पुढेच जाणार ; साहित्य संमेलनातील परिसंवादात रंगकर्मीचा विश्वास

‘मराठी नाटक एक पाऊल पुढे, दोन पावलं मागे’ या शीर्षकाच्या परिसंवादात मान्यवरांनी चर्चा केली

नाशिक येथील कुसुमाग्रज नगरीतील साहित्य संमेलनात ओसंडून वाहणारी गर्दी. (छाया : यतीश भानू)

शफी पठाण, लोकसत्ता

कुसुमाग्रज नगरी, नाशिक : मराठी नाटक किंवा रंगभूमीला प्रदीर्घ इतिहास आहे. या रंगभूमीने अनेक संकटे बघितली आहेत. या संकटांचा सामना करताना ती अनेकदा दोन पावले मागे गेली खरी, पण नंतर पुन्हा नव्या जोमाने ती उभी राहिली. करोनामुळे असाच वाईट अनुभव आला. परंतु, आता चित्र बदलत आहे. मराठी नाटक आता शंभर पावले पुढेच जाणार आहे, असा विश्वास रंगकर्मीनी व्यक्त केला.

‘मराठी नाटक एक पाऊल पुढे, दोन पावलं मागे’ या शीर्षकाच्या परिसंवादात मान्यवरांनी चर्चा केली. प्रसिद्ध नाटककार शफाअत खान यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित या परिसंवादात प्रसिद्ध नाटककार चंद्रकांत कुलकर्णी, खासदार अमोल कोल्हे, डॉ. सतीश साळुंखे आणि प्राजक्त देशमुख सहभागी झाले होते. यावेळी चंद्रकांत कुलकर्णी म्हणाले, नाटक आता विशिष्ट वर्गाची मक्तेदारी राहिलेली नाही, त्यात सामाजिक घुसळण झालेली आहे. ‘शांतता कोर्ट चालू आहे’ हे नाटक १६ भाषांमध्ये गेले आहे. हे नाटकाचे पाऊल पुढे पडत असल्याचेच प्रमाण आहे. परंतु, मला एक खंत व्यक्त करायची आहे ती म्हणजे, नाटकाच्या संहितेला अर्धसंहिता म्हणून हिणवले जाते. हे योग्य नाही. माझे प्रकाशकांना आवाहन आहे त्यांनी मराठी नाटक इतर भाषांमध्ये पोहोचविले पाहिजे. विदर्भातील शाम पेठकर, हरिष इथापे सारखी मंडळी शेतकरी विधवांना घेऊन तेरावी सारखे नाटक लिहितात, हे नाटक पुढे जात असल्याचेच चित्र आहे, असे त्यांनी सांगितले. खासदार अमोल कोल्हे यांनी नाटय़क्षेत्रातील अभिजन-बहुजन मुद्दय़ांकडे लक्ष वेधले. अजूनही मराठी रंगभूमी ५० वर्षांआधीच्या भरजरी स्वप्नरंजनातच गुंतली आहे, अशी टीका त्यांनी केली. पण अशी कितीही विघ्ने आली तरी मराठी नाटक हरणार नाही. ते ढाण्या वाघासारखे दोन पावले मागे जाते, पण लगेच चार पावले पुढे येत आपले ध्येय साध्य करते, असेही कोल्हे म्हणाले.

अस्वस्थ समविचारी मंडळींची आज गरज : भटकळ

नाशिक : आणीबाणीविरोधी काही करावे अशा विचारांनी आम्ही एकत्र आलो होतो. आणीबाणी जाहीर झाली तेव्हा काही काळ आम्ही अस्वस्थ झालो होतो. समविचारी मंडळी एकत्र बसू लागलो. आमच्या कामाला वेगळे स्वरूप आले. या गटासाठी मी सुचवलेले ‘ग्रुप ७७’ हे नाव स्वीकारले गेले. हे ‘ग्रुप ७७’ दडपशाहीविरुद्धचे प्रतीक होते. वर्तमानातील देशाची जी स्थिती आहे त्यात ‘ग्रुप ७७’च्या पुनरुज्जीवनाची गरज आहे, असे मत पॉप्युलर प्रकाशनचे मालक व प्रसिद्ध गांधीवादी विचारवंत डॉ. रामदास भटकळ यांनी व्यक्त केले

आज समारोप..

संमेलनाचा समारोप रविवारी ज्येष्ठ साहित्यिक तथा निवृत्त न्यायमूर्ती नरेंद्र चपळगांवकर आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा. शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. हे संमेलन संमेलनाध्यक्षांची अनुपस्थिती, संमेलन मंचावरील राजकीय नेत्यांची वाढलेली उपस्थिती, भाजपच्या नेत्यांनी राखलेले अंतर अशा विविध कारणांनी गाजले. समारोपाच्या दिवशी राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात उपस्थित राहणार आहेत. तत्पुर्वी म्हणजे दुपारी दीड वाजता मुख्य मंडपात वृत्तमाध्यमांचे मनोरंजनीकरण या विषयावर परिसंवाद होणार आहे. त्याचे अध्यक्षस्थान दै. लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर हे भूषविणार असून जयदेव डोळे, विश्वंभर चौधरी, अर्पणा वेलणकर, डॉ. हरि नरके चर्चेत सहभागी होणार आहेत. सकाळी शेतकऱ्यांची दु:स्थिती, आंदोलने, राजसत्तेचा निर्दयपणा – लेखक, कलाकारांचे मौन आणि सेलिब्रिटींची भूमिका या विषयावर परिसंवाद होणार आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व नाशिक बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Theater artist view on marathi drama in the seminar of sahitya sammelan zws

ताज्या बातम्या