करोनाच्या तिसऱ्या लाटेला तोंड देण्यासाठी ‘आयमा’ची तयारी

करोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेला तोंड देण्यासाठी नाशिक इंडियन मेडिकल असोसिएशनकडून तयारी अंतिम टप्प्यात आली आहे.

नाशिक : करोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेला तोंड देण्यासाठी नाशिक इंडियन मेडिकल असोसिएशनकडून तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. सर्व वैद्यकीय अधिकारी, डॉक्टर, कर्मचारी, सरकारी यंत्रणा, महानगरपालिका आणि नाशिकच्या प्रत्येक नागरिकाला मदत व्हावी यादृष्टीने नाशिक आयमा पुढे सरसावली आहे. वेगवेगळ्या स्तरांवर आवश्यक असणाऱ्या सेवा देण्यासाठी अभ्यासपूर्ण तयारी  करण्यात येत आहे, अशी माहिती आयएमएचे अध्यक्ष डॉ. हेमंत सोननीस यांनी दिली.

लवकरच ‘हॅलो आयमा’  ही करोनाविषयक मदतवाहिनी सुरू होणार आहे. संघटनेचे सभासद  डॉक्टर, वेगवेगळ्या आघाड्यांवर काम करत आहेत. लहान मुलांमध्ये तिसऱ्या लाटेत संसर्ग होण्याची शक्यता जास्त असल्याने आयमाचे सभासद डॉक्टर, बालरोगतज्ज्ञ, संस्थेच्या सहाय्याने पालकांसाठी आणि लहान मुलांसाठी आरोग्यविषयक कार्यक्रम आयोजित करणार आहेत. करोना संबंधी जनजागृती करण्यासाठी भित्तीचित्रे, पत्रके, चित्रफीत, लेख याव्दारे संघटनेचे सभासद नागरिकांचे प्रबोधन करणार आहेत.

करोना आणि करोना नसलेल्या रुग्णालयांचे वैद्यकीय अधिकारी, डॉक्टर आणि कर्मचारी वर्गाच्या विविध समस्यांचे निराकरण करण्यासाठीही संघटना  कटिबद्ध आहे. प्राणवायु प्रकल्प, प्राणवायू पुरवठा, रुग्णांच्या देयक आकारणीतील सुसूत्रता आणि प्राणवायू दरआकारणी च्या नियमांचे योग्य पालन घडवून आणण्यासाठी एका बाजूने सर्व रुग्णालये तर दुसऱ्या बाजूने स्थानिक प्रशासन यांच्यात समन्वय साधण्यासाठी संघटना  प्रयत्नशील आहे.  करोना रुग्णांवरील उपचारांमध्ये होणाऱ्या बदलांची माहिती आणि निर्देश शिकविण्यासाठी अभ्यासवर्गाचे तसेच कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. पुढेही असे कार्यक्रम होणार आहेत. संघटनेचे एक पथक पूर्णपणे करोना तसेच करोना नसलेल्या रुग्णालयांत घडणाऱ्या अनुचित आणि िहसक घटना टाळण्यासाठी रुग्णालये, रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक आणि पोलीस यांच्यात समन्वय साधून संवाद घडवून देण्यासाठी कार्यरत आहे. यासाठी संघटनेचे सचिव डॉ. कविता गाडेकर, उपाध्यक्ष डॉ. नागापूरकर, डॉ. विशाल गुंजाळ, खजिनदार डॉ. विशाल पवार आदींसह कार्यकारिणी सदस्य प्रयत्नशील आहेत. महिला डॉक्टरांमार्फत आयएमएने वृद्धाश्रमात राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांसाठी मोठय़ा प्रमाणात लसीकरण मोहीम राबविली आहे.  वृद्धाश्रमातील ३०० पेक्षा अधिक वयोवृद्ध लोकांना मोफत लसीकरणाची सुविधा उपलब्ध करुन दिली गेली.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Third wave corona coronavirus vaccine ssh

ताज्या बातम्या