scorecardresearch

वनराईतील कमळ बागेचे उद्या उद्घाटन; ‘आपलं पर्यावरण’ संस्थेचे योगदान

कमळ हे दलदल तसेच उथळ पाण्यातील फूल वनस्पती आहे. गुलाबी, पांढरा या रंगात कमळ फुलते. कमळाचे नैसर्गिक अस्तित्व संपुष्टात येत चालले आहे.

नाशिक : कमळ हे दलदल तसेच उथळ पाण्यातील फूल वनस्पती आहे. गुलाबी, पांढरा या रंगात कमळ फुलते. कमळाचे नैसर्गिक अस्तित्व संपुष्टात येत चालले आहे. निसर्गाचा हा एक जैवविविधतेचा एक महत्त्वाचा भाग आहे. तो अबाधित राहावा, कमळासह इतर जल वनस्पतींची नैसर्गिक पद्धतीने जपणूक व्हावी, लोकांमध्ये त्याविषयी प्रबोधन व्हावे, या दृष्टीने आपलं पर्यावरण संस्थेच्या वतीने दिंडोरी रोडवरील म्हसरुळ येथे कमळ बाग फुलविण्यात आली आहे. म्हसरुळ वन विभागाच्या वनराईत फुललेली ही कमळबाग नाशिककरांसाठी २२ एप्रिल रोजी खुली होणार आहे. सकाळी १०-३० वाजता वन परिक्षेत्र अधिकारी सीमा मुसळे यांच्या हस्ते बागेचे उद्घाटन करण्यात येणार आहे.

आपलं पर्यावरण संस्था आणि वन विभागाच्या मदतीने कमळ बाग निर्माण करण्यात आली आहे. ज्याप्रमाणे वृक्ष, वेली, झुडपे, वनस्पती, जंगलात आवश्यक असतात, त्याच अनुषंगाने जल वनस्पतीचा नैसर्गिक अधिवास गरजेचा आहे. कमळाचा नैसर्गिक अधिवास बऱ्याच ठिकाणी संकटात आला आहे.

काही ठिकाण लोप पावले आहेत. काही ठिकाणी त्याचे अस्तित्व संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे, ते वाचविण्यासाठी लोक जनजागृती होणे गरजेचे आहे. लोकांना या गोष्टीविषयी पाहिजे तसे गांभीर्य अजून नाही. कुठे झाड तोडण्यात येत असेल तर, आपण झाड वाचविण्याचा प्रयत्न करतो. त्याच अनुषंगाने नैसर्गिक कमळ आणि कुमुदिनीचे ठिकाण सुरक्षित करुन त्यांना वाचविण्याची नितांत गरज आहे. कमळ शेतीविषयी प्रबोधनही आवश्यक झाले आहे. निसर्गाच्या या ठेव्याचा आपल्या क्षेत्रात अधिवास वाढवून चांगल्या प्रकारे शेती केली जाऊ शकते. यापासून  उद्योग उभे राहू शकतात. कमळ, पान, फुले, बिया यापासून लोणचे, वेफर्स, कमळकंद (गुलकंद) असे विविध प्रकारचे खाद्य पदार्थ बनवता येतात. ते सर्व पौष्टिक आहेत.

अनेक प्रकारच्या शारीरिक तक्रारीत कमळाचा औषधी उपयोग होतो. कमळाच्या वेगवेगळय़ा भागापासून आयुर्वेदात औषध निर्मिती करतात. म्हणूनच चांगल्या प्रकारे औषध उद्योग उभे राहु शकतात. काही सौंदर्य प्रसाधनांमध्येही कमळाचा वापर केला जातो. अशा सर्व उद्योगांना कच्चा माल कमळ शेतीतून उपलब्ध केला जाऊ शकतो. निसर्ग संवर्धनाबरोबर कमळ शेती उपजीविकेचे एक चांगले साधन होऊ शकते. कमळ बागेत वेळोवेळी अभ्यास दौरे घेऊन याविषयी प्रबोधन करण्यात येणार आहे.

 ‘हरित नाशिक, सुंदर नाशिक अन जैवविविधता समृद्ध नाशिक’साठी सातत्याने कृतिशील प्रयत्न करणाऱ्या आपलं पर्यावरण संस्थेने एक अनोखी संकल्पना, नाशिक पश्चिम वन विभागाच्या सहकार्याने राबविण्याचे योजिले आहे. कधीकाळी नाशिक शहर हे फुलांचे शहर म्हणून ओळखले जात होते. आजही नाशिककर आपली फुलांची आवड जोपासून आहेत. शहरवासीयांची हीच आवड लक्षात घेऊन, आगळय़ावेगळय़ा संकल्पनेचा भाग म्हणून स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षांचे औचित्य साधत राष्ट्रीय फूल म्हणून मान्यता असलेल्या कमळपुष्पाच्या १५० हून अधिक वैविध्यपूर्ण प्रकार असलेली कमळ बाग साकारण्यात आली आहे. २२ एप्रिल रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत बाग नाशिककरांना पाहण्यासाठी खुली आहे. त्यानंतर बाग पाहण्यासाठी पूर्वपरवानगी घ्यावी लागणार असल्याचे आपलं पर्यावरण संस्थेचे शेखर गायकवाड यांनी नमूद केले आहे.

मराठीतील सर्व नाशिक ( Nashik ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Tomorrow inauguration forest lotus garden contribution our environment organization ysh

ताज्या बातम्या