शेतमालाच्या भावातील चढ-उतार लक्षात घेऊन पेठ तालुक्यातील काही आदिवासी शेतकऱ्यांनी उन्हाळ्यात मागणी असणाऱ्या कलिंगडची लागवड केली. मात्र हातातोंडाशी आलेला घास सदोष बियाण्यांनी हिरावला गेला. सहा शेतकऱ्यांचे मिळून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

पेठ तालुक्यातील गावंधपाडा या छोटय़ाशा गावातील सहा शेतकऱ्यांवर हे संकट कोसळले. आठ एकर क्षेत्रात यशवंत गावंडे, शामराव गावंडे, पुंडलिक भुसारे, हिरामण गावंडे, कृष्णा गावंडे आणि पांडुरंग गावंडे या शेतकऱ्यांनी कलिंगडची लागवड केली होती. त्यासाठी सिझंटा कंपनीच्या ‘शुगर क्वीन’ बियाण्यांचा वापर केला. वेलींची सक्षमपणे वाढ व्हावी म्हणून प्लास्टिक कागदाचा वापर, ठिबक सिंचनद्वारे पाणी, मशागत, गरजेनुसार खते नित्यनेमाने दिली गेली. फळांची वाढ होत असताना साखर तयार होण्याच्या टप्प्यात शेतातील वेली अचानक मृतप्राय होऊ लागल्या.

हा नेमका काय प्रकार आहे हे जाणून घेण्याकरिता शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे तक्रार केली. विभागाच्या अधिकाऱ्यांनी राहुरी कृषी विद्यापीठातील तज्ज्ञांच्या देखरेखीखाली कलिंगडच्या शेतीची पाहणी केली असता बियाणे सदोष असल्याचे निष्पन्न झाले. कृषी विभागाने पंचनामा करून तसा अहवालही दिला असल्याचे यशवंत गावंडे यांनी सांगितले.

तत्पूर्वी, कृषी विभागाने बियाण्यांची निर्मिती करणाऱ्या कंपनीला नोटीस बजावत पाहणीवेळी उपस्थित राहण्यास सांगितले होते. संबंधितांनी गावंधपाडय़ातील शेताची पाहणी केली. या बियाण्यांचा वापर करणाऱ्या गावातील शेतकऱ्यांच्या शेतात एकसारखी स्थिती होती. परंतु, बियाण्यांमध्ये कोणताही दोष नसल्याचे सांगून कंपनीने हात वर केल्याची आदिवासी शेतकऱ्यांची तक्रार आहे.

कलिंगड लागवडीसाठी प्रत्येक शेतकऱ्याने एकरी ७० ते ८० हजार रुपये खर्च केला होता. त्यातून एकरी तीन ते साडेतीन लाख रुपये उत्पन्न होईल, अशी प्रत्येकास आशा होती. मात्र उत्पन्न दूरच, गुंतविलेल्या रकमेवरही पाणी फेरले गेल्याची व्यथा शेतकऱ्यांनी मांडली.

साखर तयार होण्याच्या काळात वेली मृतप्राय झाल्या. फळे परिपक्व होऊ शकली नाही. त्यामुळे हे शेत जनावरांना चरण्यासाठी सोडून द्यावे लागले. याच गावातील अन्य एका शेतकऱ्याने दुसऱ्या कंपनीच्या बियाण्यांची एक एकर क्षेत्रात लागवड केली होती.

वर्षभरापूर्वीच्या त्या बियाण्याची मुदतही संपलेली होती. तरीदेखील संबंधिताचे पीक चांगले आल्याचे त्यांनी सांगितले. म्हणजे मुदत संपलेल्या बियाण्यांतून एकाला चक्क उत्पन्न मिळाले तर नामांकित कंपनीच्या बियाण्यांचा वापर करणाऱ्या शेतकऱ्यांना काबाडकष्ट करूनही पदरात काही पडले नाही. संबंधित कंपनी विरोधात आता ग्राहक न्यायालयाकडे दाद मागण्याची तयारी शेतकऱ्यांनी केली आहे.

दरम्यान, शेती व्यवसायावरील संकटे तशी नवीन नाहीत. कधी अस्मानी संकट तर कधी भाव गडगडल्याने नुकसान होत असते. सदोष वा बनावट बियाण्यांची विक्री होऊ नये यासाठी कृषी विभागाची समिती कार्यरत आहे.

आदिवासी शेतकऱ्यांचे नुकसान नेमके कशामुळे झाले, हे कृषी विभागाच्या पंचनाम्यातून अधोरेखित होत आहे, परंतु कंपनीला ते मान्य नाही.

नाशिक जिल्ह्य़ात सुमारे दोन हजार हेक्टरवर ‘शुगर क्वीन’ वाणाची लागवड झाली. कंपनीने सुमारे ३५० किलोहून अधिक बियाण्यांची विक्री केली होती. बियाण्यांत दोष असता तर लागवड करणाऱ्या बहुसंख्य शेतकऱ्यांकडून तक्रारी आल्या असत्या. परंतु पेठ तालुक्यातील तीन ते चार एकरचे क्षेत्र वगळता तसे घडले नाही. त्यामुळे बियाण्यांमुळे कोणताही दोष नाही. पेठ तालुक्यातील संबंधित शेतकऱ्यांनी हे बियाणे नर्सरीतून खरेदी केले. लागवड केल्यानंतर अखेरच्या टप्प्यात उन्हाची लाट आल्यामुळे काही वेलींमध्ये सुकवा निर्माण झाल्याकडे कंपनीच्या प्रतिनिधीने लक्ष वेधले.

बियाण्यांची रोगप्रतिकारक्षमता कमी

शास्त्रशुद्ध पद्धतीने कलिंगडची लागवड करूनही गावंधपाडय़ातील आदिवासी शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. फळात गोडवा निर्माण होण्यासाठी पोटॅश अन्नद्रव्याची गरज भासते. त्याच वेळी वेलीचीही ती गरज असते. या वाणाची रोगप्रतिकारकक्षमता कमी असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याचा अहवाल सादर करण्यात आला आहे. ज्या कंपनीचे हे बियाणे होते, त्यांना बियाणे कायद्यांतर्गत नोटीस बजावत पाहणीवेळी उपस्थित राहण्यास सांगण्यात आले होते. नुकसानग्रस्तांना कंपनी विरोधात ग्राहक न्यायालयात दाद मागण्यास सांगण्यात आले आहे.

शिलानाथ पवारकृषी अधिकारी, पेठ

 

बियाण्यांमध्ये दोष नाही

कंपनीने नाशिक जिल्ह्य़ात ३५० किलोहून अधिक ‘शुगर क्वीन’ कलिंगडच्या बियाण्यांची विक्री झाली होती. जिल्ह्य़ात जवळपास दोन हजार हेक्टर क्षेत्रावर त्यांची लागवड झाली. पेठमधील काही निवडक शेतकरी वगळता कोणत्याही शेतकऱ्याची तक्रार आली नाही. बियाण्यांमध्ये कोणताही दोष नाही. पेठमधील संबंधित शेतकऱ्यांनी नर्सरीतून बियाण्यांची खरेदी केली. लागवड केल्यानंतर अखेरच्या टप्प्यात तापमान वाढल्याने काही वेली सुकल्या.

प्रफुल्ल थोरातप्रतिनिधी, सिझंटा कंपनी

((   पेठ तालुक्यातील गावंधपाडा येथील यशवंत गावंडे यांच्या कलिंगड शेताची अवस्था.  ))