मनमाड : राज्यातील विजेची मागणी आणि पुरवठा यातील तफावत भरून काढत चार-पाच दिवसांपासून राज्यातील भारनियमन बंद करण्यात ऊर्जा विभागाला यश आले आहे. राज्यात भारनियमन नसल्याचे ऊर्जामंत्री एकिकडे सांगत असताना महावितरणच्या मनमाड  येथील प्रशासनाने मात्र शहरासाठी संभाव्य भारनियमनाचे वेळापत्रक जाहीर केल्याने मनमाडकर हादरले आहेत. व्यापारी, व्यावसायिक संभाव्य भारनियमनामुळे धास्तावले आहेत.

राज्यातील वीजनिर्मिती आणि मागणी यात तफावत आहे. मागणीपेक्षा वीजनिर्मिती कमी प्रमाणात होत असल्याने राज्यात भारनियमन करण्यात येत असून मनमाड  शहर अंतर्गत येणाऱ्या एकूण सहा जनित्रांचे भारनियमनाचे वेळापत्रक महावितरणच्या उपविभागीय कार्यालयाने प्रसिध्द केले आहे. मनमाड उपविभागाअंतर्गत येणारे गावठाण, शहरी जनित्र या सर्व जनित्रांची झालेली वसुली, त्यावरील वीज हानीनिहाय वर्गवारी करून त्यानुसार शहराचे संभाव्य भारनियमनाचे वेळापत्रक महावितरणने जाहीर केले. परंतु, सदरचे भारनियमन हे ज्या वेळी संपूर्ण राज्यातील वीज निर्मितीची परिस्थिती बिकट असेल त्याचवेळी करण्यात येईल, असे महावितरणचे म्हणणे आहे. महावितरणने संभाव्य भारनियमनाचे वेळापत्रक जाहीर केले असले तरी त्याची अमलबजावणी वरीष्ठांच्या आदेशानुसारच केली जाईल. विजेची मागणी आणि पुरवठा यात तफावत निर्माण  झाल्यास भारनियमन केले जाईल. अजून त्याची अमलबजावणी सुरू झालेली नाही. दरम्यान वीज भारनियमनातून तूर्त दिलासा मिळाला असला तरी कोळसा टंचाईमुळे भारनियमनाचे संकट कायम आहे. कोळसा टंचाई आणि वाढत्या मागणीमुळे राज्यात वीज संकट निर्माण झाले आहे. भविष्यातही ते उद्भवण्याची शक्यता असल्याने महावितरणने त्याआधीच संभाव्य वेळापत्रक जाहीर केल्याने मनमाडकरांनी चिंता व्यक्त केली आहे.

संभाव्य भारनियमनाचे वेळापत्रक

  •   प्रभावित क्षेत्र- हनुमान नगर, स्वामी  विवेकानंद नगर, मालेगांव नाका, चांदवड रोड, पाटील पेट्रोलपंप, डॉ.आंबेडकर चौक, गणेश नगर, बोर्डीग एरिया, चांदवड रोड या भागात सोमवार, मंगळवार, बुधवार पाच ते सात आणि १०.३० ते १२ तर, गुरूवार, शुक्रवार, शनिवार, रविवार चार ते सहा आणि १२ ते १.३०.
  •   प्रभावित क्षेत्र- पाकिजा कॉर्नर, सिध्दार्थ कॉलनी, तेली गल्ली , राजवाडा, चंदनवाडी, डिसुजा मैदान, ग्रामीण रुग्णालय , स्टेट बँक आणि पोस्ट एरिया, न्यु बोहरी कंपाऊंड, सानप कॉम्प्लेक्स, पूजा अपरटमेंट  या भागात सोमवार, मंगळवार, बुधवार पाच ते सात आणि १०.३० ते १२ तर, गुरूवार, शुक्रवार, शनिवार, रविवार चार ते सहा आणि १२ ते १.३०
  •   प्रभावित क्षेत्र- हुडको, बुधलवाडी, केकाण नगर, दरगुडे वस्ती,मााधव नगर, शिवाजी नगर, छोटा गुरूद्वारा, केआरटी हायस्कूल, सिध्दीविनायक नगर, आनंद विहार परिसर, गणेशकुंड  या भागात सोमवार, मंगळवार, बुधवार ४.३० ते ६.३० आणि तीन ते पाच तर, गुरूवार, शुक्रवार, शनिवार, रविवार २.३० ते ४.३० आणि १.३० ते ३.३०.
  •   प्रभावित क्षेत्र- कॅम्प विभाग, शाकुंतल नगर, आनंदवाडी, डमरे कॉलनी, कॅम्प नं.एक आणि दोन, रमाबाई नगर, भारत नगर, वेलंकणी नगर, जनार्दन नगर, आदर्श नगर, अयोध्दा नगर, नगरचौकी, श्रावस्ती नगर, एम .जी.रोड, डॉ.आंबेडकर रोड, नेहरू रोड, स्टेशन रोड या भागात सोमवार, मंगळवार, बुधवार ४.३० ते ६.३० आणि तीन ते पाच तर, गुरूवार, शुक्रवार, शनिवार, रविवार २.३० ते ४.३० आणि १.३० ते ३.३०.
  •   प्रभावित क्षेत्र- शांती नगर, महानंदा नगर, अनकवाडे, मनमाड  अर्बन भाग दोन, शिवाजी नगर (एक), हुडको, ५२ नंबर, पल्लवी  मंगल कार्यालय, शिवाजी नगर नं.दोन, फुले  चौक  या भागात सोमवार, मंगळवार, बुधवार ४.३० ते ६.३० आणि तीन ते पाच तर, गुरूवार, शुक्रवार, शनिवार, रविवार २.३० ते ४.३० आणि १.३० ते ३.३०. याप्रमाणे आहे.

वरीष्ठांकडून भारनियमन करावे, अशा सूचना अद्याप आलेल्या नाहीत. यापुढे भारनियमन करायचे झाल्यास ते वेळापत्रकाप्रमाणे करण्याचे नियोजन आहे.

– एस. बी. शिंदे (शहर अभियंता, महावितरण, मनमाड)